(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या घरी बाप्पाचं आगमन धुमधडाक्यात  झालं. बघताबघता सातआठ दिवस निघून गेले. या दिवसात घरातील वातावरण मंगलमय होऊन गेलं. सकाळसंध्याकाळ पूजा, फुलांची आरास, सुगंधी अगरबत्ती-धुपाची दरवळ, वेगवेगळया पदार्थांचे मोदक, दर्शनासाठी येणाऱ्यांची वर्दळ यामुळे घर गजबजून गेलं.

पूजा झाल्यावर आईबाबा आणि तेजोमयीसोबत अलेक्झांडरही दोन पायावर बसून बाप्पांना नमस्कार करायचा. एखादं फुल हळूवारपणे तोंडात पकडून बाप्पांच्या चरणी वाहायचा. हे बघून अलेक्सा गोर्जीला अलेक्झांडरचं कौतुक वाटायचं.

बाप्पा, बुध्दीची देवता असल्याचं, तिला माहितीच्या महाजालातून कळलंच होतं. “म्हणजेच ज्ञान देणारी देवता,  असचना”, ती बाप्पांकडे बघत पुटपुटली. बाजुलाच असलेल्या तेजोमयीच्या ते लक्षात आलं. तिने विचारलं,

“काय झालं?”

“कुठे काय?”

“बाप्पांकडे बघत असताना, तू पुटपुटल्याचं मी ऐकलय. नाही म्हणून नकोस. बाप्पा रागावतील. होनारे अलेक्झू?” बाजूलाच रेंगाळणाऱ्या अलेक्झांडरकडे बघत तेजोमयी म्हणाली. बरोब्बर, अशा आशयाची मान पठ्ठ्याने हलवली. गोर्जीला हसू आलं. तिच्या मनातलं आता सांगणं भागच होतं.

“बाप्पा बुध्दीची देवता आहेत, याचा अर्थ ते ज्ञानाची देवता, असचना.”

“ते सगळ्यांनाच ठाऊक. नवं काय त्यात?”

“नवं काही नसलं तरी, जे जे ज्ञान देतात, तेते सगळेच बुध्दीची देवता नाही का होत?”

“नाही. बुध्दीची देवता एकच. म्हणजे आपले बाप्पा. हो ना हो बाबा,” तेजोमयीनं बाबांना विचारलं. ते तत्काळ हो म्हणतील असं तेजोमयीला वाटलं. पण तसं काही झालं नाही. तेजोमयीच्या प्रश्नाला बाबा उत्तर कां देत नाही बाँ, असं अलेक्झांडरला वाटून तो त्यांच्यासमोर उभा ठाकला. जीभ काढून हॅ हॅ हॅ करु लागला. बाबांचं उत्तर यायला उशीर होतोय, हे बघून गोर्जीने विचारलं,

“चुकलं का माझं?”

“तसं नाही. पण तू जे म्हणालीस की, जे ज्ञान देतात ते सर्व बुध्दीची देवता, त्याने जरा मला विचारात टाकलं.”

“म्हणजे?” आई आणि तेजोमयीनं, एकाचवेळी आश्चर्य व्यक्त केलं.

“त्याचाच विचार करतोय. पण, आधी गोर्जीच्या मनातलं समजून घेऊयाना.”

गोर्जीने काहीक्षण डोळे मिटले. डोळे उघडल्यावर तिने सगळ्यांना पुस्तकांच्या कपाटाकडे नेलं. त्याकडे लक्ष वेधत, म्हणाली,

“ही पुस्तकं ज्ञानाची भंडार आहेत. ती वाचल्याने तुमची बुध्दी अधिक तीक्ष्ण होते. बुध्दीला धार येते. तुम्हाला नव्या गोष्टी कळतात. थोडक्यात काय, आजच्या भाषेत तुम्ही स्मार्ट होता.”

“गोर्जे, यात नवल काय? ते सगळ्यांनाच ठाऊकाय.”आई जांभई देत म्हणाली.

“आई, ते बरोबर असलं तरी, आपण बाप्पांची मनोभावे पूजा करतो, तसं काही या पुस्तकांचं करत नाहीना.”

“म्हणजे, यांना हळद-कुंकू, फुलं वाहायचे का?”तेजोमयीनं विचारलं.

“तसं कुठे म्हंटलय मी. पुस्तकांची मनोभावे पूजा म्हणजे त्यांचं मनापासून एकाग्रचित्तानं वाचन करणं, समजून घेणं, पुस्तकातलं लक्षात ठेवणं, स्वत:मध्ये सतत सुधारणा करणं.”

“अच्‍छा, असं आहे तर…” बाबा मोठा श्वास घेत म्हणाले. अलेक्झांडरने चमकून त्यांच्याकडे बघितलं.

“तुम्हाला गोर्जीचा उपदेशामृत पटला म्हणायचा.” आईने प्रतिक्रिया दिली. बाबा हसले.

“बाप्पाच, बरे बुवा आपले. हारफुलं गंध वाहिलं की झाली त्यांची पूजा. शिवाय उपदेश फुपदेशची भानगड नाही.”

“याचा अर्थ, बाप्पांची पूजा सोप्पी नि पुस्तकांची पूजा कठीण का?” गोर्जी बोलून गेली.

“तसं नाही पण…” तेजोमयी म्हणाली.

“आपण उगाच कां चर्चा करतोय? ज्याला जे करायचं ते तो करेलना.” आई म्हणाली. अलेक्झांडरने मान हलवून पाठिंबा दिला.

“आई, तुमचं म्हणणं योग्यच आहे, पण आपण बाप्पांची दहा दिवस पूजा करतो. त्यानंतर ते त्यांच्या घरी निघून जातात, असं आपल्याला वाटतं.”

“अगं, वर्षानूवर्षांची हीच परंपरा. तुला काय वेगळं वाटतं.” बाबांनी विचारलं.

“बाबा, मला वाटतं बाप्पा या पुस्तकांच्या स्वरुपात म्हणजेच विद्येच्या देवतेच्या रुपात इथेच राहतात, २४ तास नि ३६५ दिवस! ” गोर्जी एका दमात बोलून गेली.

बाप्पांचा वेगळाच पैलू आईबाबा आणि तेजोमयीच्या लक्षात आला. बाबांना गोर्जीचं कौतुक वाटलं. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाप्पांची नवी व्याख्या तेजोमयीलाही आवडली. अभ्यासाचीच नव्हे तर इतरही पुस्तकं ही ज्ञानदेणारी विद्येची देवता असून त्यांच्यात बाप्पांचा निवास असतो, हे तिच्या लक्षात आलं. यापुढे पुस्तकांचं पठण-मनन-चिंतन, बाप्पांइतकच मनोभावे करणाचा निर्धार तिने केला.

सुरेश वांदिले