(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 बाप्पा,आज तुम्ही नेहमीपेक्षा खूप आनंदात दिसता आहात.तेजोमयीनं बाप्पांना विचारलं.

अगं, मी नेहमीच आनंदात असतो.बाप्पा उत्तरले.

          नाही,पण तुम्ही आज थोडं जास्त आनंदी दिसता.आमच्या भाषेत सांगायचं म्हंटल तर आनंद प्लस दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर, तेजोमयी म्हणाली.

अरे वा,तुला चेहरा पण वाचायला येतो म्हणायचा.तू उत्तम भविष्यवेत्ती होऊ शकशील हं तेजू,बाप्पा हसत हस्त म्हणाले.

तसं नाही हो..तुम्ही दुसरीकडेच विषय नेता आहात हं बाप्पा..

तुला खरच सांगतो, मी नेहमीच आनंदी असतो.अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळतो.मन सुखावून जातं.आता काल रात्रीचच बघन ना..तुमच्या गॅलरीच्या बागेत ब्रम्हकमळ फुललं.तू बघितलस कां ते..

आई सांगत होती त्याबद्दल..

ती सांगत होती नि तू इकडून ऐकून तिकडे सोडून देत होतीस..

मी समजले नाही बाप्पा..

अगं,ब्रम्हकमळाचं झाडं तीन चार वर्षापूर्वी आईनं आणलं होतं.किती प्रेमानं त्याची देखभाल केली.जोपासनपा केली.या झाडाला वर्षातून एकदाच फूल येतं.कळी रात्रीच उमलते आणि नि सकाळी कोमजते.या झाडाला कळी आल्यापासून आई तुला सांगत होती ना की ब्रम्हकमळाला कळी आलीय,तू ती उमलतान बघ.कळीचं फुलात रुपांतर होण्यात बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो…बरोबर..

होय बाप्पा..

मग तू काय केलस...

बघते बघते असं म्हणाले..

कळीचं फुलात रुंपातर होणं बघणं तर बाजूलाच राहिलं,काल संध्याकाळी जेव्हा ब्रम्हकमळ फुललय हे सांगायला आई तुझ्याकडे आली तेव्हा,तू तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलस..

सॉरी बाप्पा..

अगं, त्यावेळी आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होतास तू. मात्र तू आपली बसली होतीस त्या टीव्हीतल्या पोगोपुढं.टीव्ही काय पळून जात होता की काय?

सॉरी बाप्पा..

तू ऐकल नाहीस. पण मी मात्र ब्रम्हकमळाला डोळे भरुन पाहिलं. अगं तुझ्या हाताच्या पंजाएवढं, छान श्वेतवर्णीय हे फूल. रेशमासारख्या त्याच्या पाकळया आणि मंद मंद अनोखा सुगंध.फुलाचा तुरा तर कापसापेक्षा मऊ..वा वा …मी कितीतरी वेळ बघतच राहिलो.न्याहळत राहिलो..तो आनंद कदाचित माझ्या चेहऱ्यावर दिसत असावा..तुमच्या आजच्या भाषेत आनंद प्लस..बाप्पा म्हणाले.

          बाप्पांनी तेजोमयीला ब्रम्हकमळाची महती सांगितल्यावर तिला तिची चूक कळली.ती पटकन गॅलरीतल्या बागेकडे पळाली.ब्रम्हकमळ कोमेजून गेलं होतं.कोमेजलेली कळी सुध्दा किती सुंदर आणि मनमोहक दिसत होती.तिला वाईट वाटलं.आईचं ऐकायला हवं होतं असं तिला राहून राहून वाटू लागलं.ती लगेच आईकडे गेली आणि तिने आईला सॉरी म्हंटलं.

कशासाठी गं..आईनं विचारल…

     अगं ते ब्रम्हकमळाचं.

त्याचं काय झालं?.

तू काल रात्री ब्रम्हकमळाच्या उमलण्याबद्दल सांगत होतीसना..तेव्हा मी ऐकून न ऐकल्यासारख केलं..

हात्तीच्या..अगं त्याचं एवढं काय वाईट वाटून घ्यायचं..पुन्हा येतील की फुलं त्याला..

वाईट नाही गं..पण कळीचं फुलात रुपांतर होण्याचा आनंद मला घेता आला नाही ना.. आई यावर काहीच बोलली नाही.हसून आपल्या कामाला लागली.

000

आईचं ऐकलं नाही म्हणून ती आपल्याला रागवेल असं तेजोमयीस वाटलं.पण तसं काही झालं नाही.याचं तिला आश्चर्य वाटलं.ती तडक बाप्पांकडे आली.तिच्याकडे बघून बाप्पा हसायला लागले.

कां हो बाप्पा,तुम्हाला हसायला काय झालय?

अगं आईचा नि तुझा संवाद ऐकला की मी आत्ताच..

तेच तर सांगायचं होतं तुम्हाला..आई रागावेल असं वाटलं होतं मला.

अगं आई रागावली नाही,याचं दु:ख होतय का तुला.कमाल आहे हं तेजू. ज्या गोष्टीचा आनंद घ्यायचा, तो घ्यायचा नाही,अन नको त्या गोष्टीचं         दु:ख करत बसायचं.

पण बाप्पा..

अगं कशासाठी रागावयं,कधी रागवायचं हे आईला बरोबर कळतं. त्यामुळे तू नको त्या कारणासाठी वाईट वाटून घेऊ नकोस.नि दु:खी प्लस होऊ नकोस.ही तुमची आजची भाषा ना..बाप्पा हसत हसत म्हणाले.

 

000

ब्रम्हकमळ प्रकरणानंतर तेजोमयीनं आईच्या सांगण्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करण्याचं सोडून दिलं. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तिच्या लक्षात आलं. आपण त्या सर्व काळजीपूर्वक ऐकून तसचं वागतो तर आई किती खुष होते. कुरकूर नाही की धपाटा नाही. वंडरफूल, तेजोमयी स्वत:शीच बोलली आणखी खुष झाली.

बाप्पांनी तिला या आनंद प्लसचं कारण विचारलं..

तुम्हाला कसं कळलं बाप्पा..

अगं मी बाप्पा असल्याचं मध्येच कां विसरुन जातेस तू..

सॉरी बाप्पा..

बरं ते जाऊ दे..ब्रम्हकमळाचा धडा तुला मिळाला हे महत्वाचं.अगं आई-बाबा ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतात ना,त्या आपल्याच हिताच्या असतात.आपल्याला वाटतं त्यांचं बॉसिंग चाललय.म्हणून आपण तिकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो बरेचदा. आपल्याला वाटतं काय पराक्रम करतोय आपण.कधी कधी आपण वाटतं ते उगाच लुडबूड करतात .वाटतं की नाही?

कधी कधी..तेजोमयी उत्तरली..

पण ते तसं नसतं..आईबाबांना काय गरज पडलीय त्याची.आपलं मूल शहाणं व्हाव.आजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्मार्ट व्हावं,त्यांचं ज्ञान चौफेर व्हावं,ते कायम आनंदी रहावं,त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा घ्यावा हे कळावं, असतं त्यांना वाटत असतं.बरोबर न..

होय बाप्पा..

असच तुझ्या मनात चाललं होतं की नाही..

होय बाप्पा..

बघ तू आईचं किंचितसं ऐकायला लागलीस नि आई किती खुष् झालीत ती..आईच्या चेहऱ्यावरचा आनंद, प्लस प्लस झालेला दिसतोय ना तुला..आपल्या आई-बाबांना, जी मुलं आनंदी करतात ती बाप्पांना खूप आवडतात.

म्हणजे मी सुध्दा..

अगं तू तर माझी तेजू प्लस आहेस..बाप्पा हसत म्हणाले.

तेजोमयीनं बाप्पाच्या पायावर मस्तक ठेवले.

सुरेश वांदिले