(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये मूलभूत संशोधनास चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी, अणुउर्जा विभागाने भुवनेश्वर येथे, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (नायसर)  आणि मुंबई येथे, सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायंस (सीएइबीसी), या संथांची स्थापना केली. दोन्ही संस्थांमध्ये पाच वर्षे कालावधीचा इटिग्रेटेड अभ्यासक्रम चालवला जातो. नायसर संस्थेचा अभ्यासक्रम होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूशी संलग्नित आहे तर सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापठाशी संलग्नित आहे.

विज्ञान शाखेत संशोधन कार्यात  आत्यंतिक रस, तीव्र आवड आणि गती असणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी या दोन्ही संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवर्जून प्रयत्न करायला हवेत. या दोन्ही संस्थांमध्ये जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, संगणक केंद्रे, उत्कृष्ट ग्रंथालये आहेत. विद्यार्थ्यांना सर्व सुविधांनी युक्त अशा वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना विविध शाखांचे ज्ञान प्रज्ञान केले जाते. ते करताना आंतरज्ञानशाखीय शैक्षणिक प्रणालीचे तत्व अंगिकारले जाते. विद्यार्थ्याला संशोधन प्रकल्पावर कार्य करावे लागते. अनुभवी प्राध्यापक आणि संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मूळ (ओरिजिनल) विषयावर संशोधन करण्याची संधी दिली जाते.

 

सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायंस, ही संस्था मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आहे. या संस्थेची स्थापना २००७ साली अणुउर्जा विभाग आणि मुंबई विद्यापीठाने संयुक्तपणे केली.  संस्थेत पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रम, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये करता येतो. शिवाय पीएचडी करण्याचीही सुविधा आहे. अत्याधुनिक, लवचिक अशा विषयघटकांचा समावेश इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. याचा मुख्य भर प्रात्यक्षिकांवर असून विश्लेषणात्मक आणि समस्यांचे निर्धारण करणारे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, यासाठी विषयघटकांची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठ, आयआयटी, भाभा अणुसंधान केंद्र, टाटा मुलभूत संशोधन संस्थांमधील सर्वोत्कृष्ट अध्यापकांना बोलावले जाते. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने, या अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी साहाय्य केले आहे. ही संस्था स्वायत्त आहे.

हा अभ्यासक्रम यशस्वीपणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील संधी मिळू शकतात- (१) भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरच्या प्रशिक्षणासाठी थेट मुलाखतीस निवड केली जाते . (२) देश विदेशातील नामांकित संस्थांमध्ये पीएचडी अभ्यासक्रमासाठी सुलभतेने निवड होऊ शकते. (३) भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये, वैज्ञानिक म्हणून कार्य करु शकतात. (४) पीएचडी प्राप्त केल्यावर नामांकित राष्ट्रीय संस्थांमध्ये अध्यापनाची संधी मिळू शकते. (५) कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करण्याची संधी मिळते.

प्रवेश प्रकिया

दोन्ही संस्थांमधील, अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, नॅशनल एन्ट्रन्स फॉर स्क्रिनिंग टेस्ट (नेस्ट) ही परीक्षा घेतली जाते. ही संगणकाधारित, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची परीक्षा आहे. पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र, या चार विषयांचे चार विभाग असतात. प्रत्येक विभागात ६० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला चार गुण दिले जातात. प्रत्येक विभागात काही चुकलेल्या उत्तरांसाठी गुण कपात (निगेटिव्ह मार्किंग)केली जाते. एकूण गुण १८०. या परीक्षेतील कोणतेही तीन विभाग सोडवता येतात. मात्र नेस्ट व्यवस्थापनाने, चारही विभाग सोडवण्याची सूचना केली आहे. ज्या कोणत्या तीन विभागात सर्वोच्च गुण मिळतात, तेच अंतिम गुणांकनासाठी ग्राह्य धरले जातात. गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्रश्न हे ११ वी आणि १२ वीच्या एनसीइआरटी – (नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग/ सीबइएसइ- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) अभ्यासक्रमांवर आधारित असतात.  महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक बोर्डाचा ११ वी व १२वीचा अभ्यासक्रम साधारणत: असाच आहे.  ज्या विषयघटकांचा समावेश या अभ्यासक्रमात नसेल, त्याचा अभ्यास मात्र एनसीइआरटी/सीबीएसइच्या पुस्तकांतून करावा. विषयघटकांची यादी नेस्ट परीक्षेच्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. ती एकदा नजरेखालून घालणे योग्य ठरेल. www.nestexam.in या संकेतस्थळावर नेस्ट परीक्षेच्या प्रत्येक विषयाचे घटक बघता येतात. हा अभ्यासक्रम उच्च श्रेणिचा असल्याने त्याच्या प्रवेशासाठी चुरस असते. विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयाच्या मूलभूत ज्ञानाच्या आकलनाची पातळी जोखणारी ही परीक्षा आहे. त्यामुळेच एनसीइआरटी/सीबीएसइ किंवा राज्यशासनाच्या १२ वी बोर्डाचा विज्ञान विषयांचा समजून-उमजून अभ्यास करणे आवश्यक ठरते. विज्ञान विषयातील सर्व घटकांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. 

परीक्षेचा कालावधी- साडेतीन तास. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर  

अर्हता आणि पात्रता

२०२३ आणि २०२४ आणि २०२५ साली १२ वी विज्ञानशाखेतील परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी, नेस्ट परीक्षा देऊ शकतात. यंदा नेस्ट परीक्षा २२ जून २०२५ रोजी होणार आहे. २०२३ आणि २०२४ दोन्ही वर्षाच्या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समजा चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नसल्यास, त्यांनी या परीक्षेचा अभ्यास करुन, त्यात चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांगासाठी गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट.

दिशा शिष्यवृत्ती

या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरवर्षी ६० हजार रुपयांची,  “दिशा” (डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी-इन्सेंटिव्ह स्किम फॉर होलिस्टिक सायन्स एज्युकेशन ॲण्ड ऑगमेंटेशन) शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय दरवर्षी उन्हाळी संशोधन प्रकल्पासाठी २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

प्रवेश मिळालेल्या पहिल्यावर्षीच ही शिष्यवृत्ती लागू होते. मात्र पुढील वर्षांमध्ये, परीक्षेतील निर्धारित गुणांकांचा दर्जा राखला नाही तर, त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजनेपासून बाद केले जाते. मात्र, हा विद्यार्थी पुढील वर्षी निर्धारित गुणांकाच्या परिघात आल्यास, त्याला पुन्हा शिष्यवृत्ती लागू केली जाते. या परीक्षेव्दारे नायसर येथे २०० विद्यार्थ्यांना आणि सीइबीएस येथे ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात.

संपर्क- (१) चिफ कुआर्डिनेटर, नेस्ट २०२१, एनआयएसईआर, भुवनेश्वर, पोस्ट ऑफिस, जतनी खुर्दा- ७५२०५०, ओडिशा, ईमेल- nest-exam@niser.ac.in, (२) सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, नालंदा, नॅनो सायन्स इमारतीच्या विरुध्द बाजूला, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२-२६५३२१३२, ईमेल-info@cbs.ac.in, संकेतस्थळ- cbs.ac.in

०००

इंडियन असोशिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायंस

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी, इंडियन असोशिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायंस, ही स्वायत्त संस्था, संशोधन कार्यास प्राधान्य देणारा, इंटिग्रेटेड बॅचलर्स-मास्टर्स प्रोग्रॅम इन सायंस (बीएस-एमएस), हा अभ्यासक्रम चालवत असते. हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून तो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणकशास्‍त्र या विषयांमध्ये करता येतो.

पहिल्या तीन सत्रांमध्ये, या विषयांच्या मुलभूत बाबी शिकवल्या जातात. चौथ्या सत्रापासून विद्यार्थ्यांना या विषयांपैकी एक मुख्य विषय अध्ययनासाठी निवडता येतो. सातव्या सत्रापासून थेट संशोधन कार्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ८ जून २०२५ रोजी, युजी प्री इंटव्ह्यू स्क्रीनिंग टेस्ट (युपीएसटी) घेतली जाईल. या परीक्षेतील गुणांवर आधारित मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. त्यानंतर या अभ्यासक्रमासाठी ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

अर्हता – या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी बाहेर पडता येते. त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी प्रदान केली जाते.

संपर्क – २ ए आणि २ बी, राजा एस.सी मल्लिक रोड, कोलकाता— ७०००३२, ईमेल-helpdesk@iacs.res.in, संकेतस्थळ- www.iacs.res.in, दूरध्वनी-०३३-२४७३४९७१

सुरेश वांदिले