बराच वेळ झाला तरी, अलेक्सा गोर्जीचा आवाज आला नाही, म्हणून तेजोयमी तिच्याकडे गेली. गोर्जी डोळे मिटून बसलेली तिला दिसली. तेजोमयी आल्याचं गोर्जीला कळलच नाही. तेजोमयीने तिच्या डोक्यावर टकटक केलं, तेव्हा भानावर येऊन तिने डोळे उघडले.
“गोर्जे, दिवसाढवळ्या स्वप्न बघणं बरोबर नाही. रात्रीच्या अंधारातच स्वप्न चांगली दिसतात.” तेजोमयी हसत म्हणाली.
“पण तेजो, तुला कुणी सांगितलं मी स्वप्न बघत होते म्हणून.”
“मग डोळे मिटून काय करत होतीस? तू स्वप्नात इतकी दंगली होतीस की, मी आले तरी तुला काही पत्ता नव्हता.”
“हो का? सॉरी. पण मी स्वप्न बघत नव्हते.”
“मग टाइमपास करत होतीस का?”
“मी जरा शोध घेत होते.”
“नवीन पिझ्झ्याच्या दुकानाचा का?चल लगेच ऑर्डर बूक कर बघू.”
“तेजू पिझ्झा आणि बर्गरपेक्षाही बरच काही महत्वाचं असतं.”
“बरं बाई, काय महत्वाचा शोध घेत होतीस तू?”
“सांगू की दाखवू?”
“अरे हाँ, तुझ्या मेंदूत असणाऱ्य, ‘फ्लिकी’ (fliki) सॉफ्टवेअरमुळे तुझ्या कल्पनेवर आधारित व्हीडिओच बनू शकतेस की. मग तेच कर.” तेजोमयी म्हणाली. गोर्जीने डोळे मिटले. जे काही मनात होते ते तिने ‘फ्लिकी’ला सांगितलं. काही क्षणात व्हिडिओ तयार झाल्याचे सिग्नल ‘फ्लिकी’ने गोर्जीला दिले. गोर्जीने लगेच आपला मेंदू ब्ल्यूटूथेने टिव्हीशी जोडला. तेजोमयीने टीव्ही सुरु केला.
समोर एकएक दृष्य येऊ लागलं….
५१ हजार २०० वर्षापूर्वीची ही घटना. इंडोनेशिया देशातील सुलावेसी नावाचं बेट. इथे त्याकाळातील माणसं करंपुआ गुहकडे जात होती. गुहेत पोहचल्यावर त्यांनी गुहेच्या छतावर चित्र काढायला सुरुवात केली. आधी त्यांनी डुक्कर काढलं. मग, त्याच्या आजूबाजूला तीन मनुष्यप्राणी. त्या तिघांना बघून ते डुक्कर घाबरले. या तिघांपुढे आपला निभाव लागणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी तो गयावया करु लागला. त्या तिघांनी हास्याचा गडगडाट केला. “आयती मेजवाणी कशी सोडायची?” त्यातला एकजण म्हणाला. एकाने भाला काढला. डुक्कर आणखीनच घाबरले. पण त्याचवेळी त्याला आईची एक शिकवण आठवली, ‘संकटाच्या वेळी घाबरायचं नसतं, शक्ती कमी पडत असल्यास युक्तीनं काम करायचं असतं.’ डुक्कराच्या मनातील भीती कमी झाली. आपल्याला उडी मारता येत असल्याचं त्याला आठवलं. त्याने भाला धरलेल्या व्यक्तीवर छलांग मारली. हे अनपेक्षितपणे घडल्यानं तो भालाधारी दुसऱ्या व्यक्तीवर जाऊन पडला. त्याचा भाला त्या व्यक्तीच्या पोटात गेला. त्याने मोठी किंकाळी दिली. याने घाबरुन ते दोघेही पळून गेले. “जे आपले मेजवाणी करायला आले होते, तेच आपल्यासाठी मेजवाणी सोडून गेल्याचे बघून डुक्कर आनंदी झाले.”हे दृष्य संपताच तेजोमयी काहीतरी विचारणार, तोच पडद्यावर वर्ष उमटले, २०२५!
आजच्या काळातील संशोधक, लिआँग करंपुआंग गुहेत गेले होते. त्यातील एकाने गुहेच्या छतावरील चित्रांवर एका यंत्रातून लेसर किरण टाकलं. या यंत्रात लेसर ॲब्लेशन युरेनियम सिरीज डेटिंग, ही अत्याधुनिक यंत्रणा होती. या यंत्रणेतून बाहेर पडलेल्या लेसरकिरणांनी चित्रावर नैसर्गिकरित्या जमलेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या थरांचे डेटिंग केलं. त्यातून चित्राचं वय कळलं ५१ हजार २०० वर्षे!
व्हीडिओ संपतासंपता एक ओळ आली. “ही होती माणसाने सांगितलेली किंवा चित्ररुपातील जगातील पहिली कथा.”
व्हिडीओ संपला. गोर्जीने तेजोमयीकडे बघितलं.
“म्हणजे तू पहिल्या कथेचा शोध घेण्यासाठी ध्यान लावून बसली होती म्हणायची.”
“मी नाही लावला शोध. तुम्हा मानवातील संशोधकांकडे याचं श्रेय जातं. मी फक्त बघत होते.”
“गंमतच म्हणायची.”
“होना, याआधी स्पेनमधील एल कास्तिलो गुहेत ४० हजार ८०० वर्षापूर्वीचं कथाचित्र आणि सुलावेसितील गुहेत ४३ हजार ९०० वर्षापूर्वीचं शिकारचित्र मिळालं होतं. आता हे त्याआधीचं म्हणजे सर्वात जुनं कथाचित्र मिळालं. ही कमाल सेशोधक मंडळी कशामुळे करु शकतात हे सांगू शकशील का?”
“कशामुळे?”
“मानवास सारखं काहीतरी शोध घ्यावा वाटतो. मग, त्यासाठी धडपड करतो. धडपड म्हंटली की अभ्यास आला. त्यातून नवं ज्ञान मिळवतो, तंत्रज्ञानाचा शोध लावतो. मग त्याचा उपयोग करुन असं काहीतरी भन्नाट शोधतो.”
“जसा अलेक्सा गोर्जीचा शोध लागला, तसचना?” तेजोमयीने हसतहसत टाळीसाठी गोर्जीकडे हात समोर केला.
सुरेश वांदिले