पर्यटन/यात्रा व्यवस्थापन विषयातील पदवी स्तरीय अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा आहे. म्हणजे करोनाची स्थिती नियंत्रणात येईपर्यंत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी आपले शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण करु शकतात. हे अभ्यासक्रम चालवणाऱ्या चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यास सैध्दांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा उत्तम मेळ साधला जाऊन करिअरच्या संधीही मिळतील.
संस्था आणि अभ्यासक्रम
(1) मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स (बीएमएस) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील 12 वी उत्तीर्ण. प्रवेश-चाळणी परीक्षेव्दारे.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात यात्रा/प्रवास आणि पर्यटन आढावा, भारतीय संस्कृती आणि पर्यटन, पर्यटन भुगोल आणि कार्यप्रणाली, इंग्रजी संवादकौशल्य, आंतरराष्ट्रीय पर्यटन, पर्यटन सेवा आणि उत्पादने, हवाई वाहतूक शुल्क आकारणी आणि तिकिटे, आतिथ्य सेवा व्यवस्थापन, पर्यटन तंत्रज्ञान आणि जागतिक वितरण कार्यप्रणाली, देशी आणि परदेशी पर्यटनाचे नियोजन, हवाई वाहतूक व्यवस्थापन, पर्यटन नियोजन आणि विकास, पर्यटनातील सध्याचे प्रवाह,आदी विषय घटकांचा समावेश आहे.
संपर्क- विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००९८, दूरध्वनी- ९७०२१४२१९१, ईमेल- gicedenqury@giced.mu.ac.in, संकेतस्थळ- giced.co.in
(2) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट – ही संस्था आणि भारत सरकार आणि तेलंगणा सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने स्थापन करण्यात आली. संस्थेमार्फत पर्यटन आणि आतिथ्यसेवा विषयातील ज्ञान शाखेचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. संशोधन कार्यास प्रोत्साहन दिले जाते. अभ्यासक्रम– (1) बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन ट्रॅव्हल ॲण्ड हॉस्पिटॅलिटी. कालावधी – चार वर्षे. अर्हता-कोणत्याही ज्ञानशाखेतील 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा शासनमान्य 3 वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम किंवा 3 वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांमध्ये 5 टक्के सुट. प्रवेश- मुलाखतीव्दारे.
करिअर संधी– हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील ठिकाणी करिअर संधी मिळू शकतात. ट्रॅव्हल एजन्सी आणि टूर ऑपरेशन्स, हॉटेल आणि संबधित हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, राज्य पर्यटन विकास विकास मंडळात सुपरवायझर, रिसॉर्ट्स आणि स्पॉ केंद्रातील व्यवस्थापन, भारतीय आणि आंतराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापनासाठी कार्यकारी पद /उप व्यवस्थापक, सुविधा व्यवस्थापन आणि व्यवस्थापन सेवा पुरवठादार संस्थेतील सुपरवायझर, इव्हेंट सुविधा व्यवस्थापनातील साहाय्यक/कार्यकारी पद, परराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ पुरवठा साखळीचे सुपरवायझर, हॉटेल व्यवस्थापन आणि अन्नपदार्थ कला शिक्षण संस्थेत अध्यापक , उद्योजक.
संपर्क – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, टेलेकॉम नगर, गाचीबावली, हैदराबाद- ५०००३२, तेलंगणा, दूरध्वनी- ०४०-२३०००४७२, ईमेल-director@nithm.ac.in, संकेतस्थळ- nithm.ac.in
एमबीए इन ट्रॅव्हल ॲण्ड हॉस्पिटॅलिटी– कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील 50 टक्के गुणांसह पदवी. राखीव संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये 5 टक्के सुट. उमेदवारांची निवड मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, मुलाखत आणि समूह चर्चा या तीन घटकांमध्ये मिळालेल्या गुणांवर केली जाते.
पर्यटन, प्रवास/यात्रा, आतिथ्यशीलता आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उद्योजक व शिक्षण तज्ज्ञांच्या साहाय्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पर्यटन व्यवसाय/उद्योगासाठी आवश्यक नेतृत्व कौशल्याची निर्मिती व्हावी यासाठी, अभ्यासक्रमात विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर, हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक,अन्न पदार्थ आणि शितपेये संचालक, ऑफिस व्यवस्थापक, मनुष्यबळ व्यवस्थापक, इव्हेंट नियोजक, पर्यटक एंजट्स, समूह पर्यट सुविधा पुरवठदार इत्यादी सारख्या करिअर संधी मिळू शकतात.
(3) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंसेस (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) – बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटिज मॅनेजमेंट. कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम केल्यावर इव्हेंट मॅनेजमेंट, फॅसिलिटिज मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, बँकिंग ॲण्ड फायनांस, कस्टमर रिलेशनशीप ॲण्ड केअर, सेल्स ॲण्ड मार्केटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेट या क्षेत्रात करिअर करता येते. पुणे विद्यापीठांतर्गत हा एकमेव अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमातील विषय घटकांव्दारे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक, प्रशासकीय, तांत्रिक आणि आंतरसंबधीय कौशल्याची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. चौथ्या सत्रात 20 आठवडयांची औद्योगिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये 5 टक्के सुट.
अशी असते परीक्षा
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 100 गुणांची ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. यामध्ये इंग्रजी भाषा कौशल्य, कार्यकारणभाव (रिझनिंग), सामान्य ज्ञान, सेवा क्षेत्राविषयी कल, सांख्यिकी कौशल्य, या विषय घटकांवर प्रश्न विचारले जातात.
संपर्क – डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंसेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे- ४११००७, दूरध्वनी- ०२०-२५६९३३८०, -pumba.in, ईमेल- pumba.bbahfm@gmail.com