रॉबिन्सनमामाचं मालकीनबाईंवर बारीक लक्ष असे. विशेषत: तिच्या खाण्यापिण्यावर तर अधिकच. कारण, मार्गारेट मावशीच्या मदतीनं त्याला, शिल्लक राहिलेल्या खादाडीवर ताव मारता येत असे. मालकीनबाईंना एक पदार्थ भारी म्हणजे भारीच आवडायचा. दिवसातून एकदातरी त्यांच्या आहारात, बटाट्यापासून तयार केलेला एखादा पदार्थ असायचाच. असा वेगळा पदार्थ नसल्यास, किमान उकडलेला बटाटा, नक्कीच असलाच म्हणून समजा.
मालकीनबाईंचं, हे बटाटा प्रेम कमी होण्याचं काही नावच नव्हतं. उलट त्या आता दुपारीही बटाटा चीप्स वगैरेवर ताव मारत. एके दिवशी मालकीनबाई झोपी गेल्यावर रॉबिन्सनने , मावशीला, मालकीनबाईंच्या बटाटा प्रेमाविषयी विचारलच.
“गधड्या, तुला काय करायचय? मालकीनबाई बटाट्यावर प्रेम करोत नाही तर फटाट्यावर… त्यांचं घर, त्यांचा बटाटा आणि त्याचं पोट! तुझ्या पोटात कां बरं दुखायला लागलं.”
“मावशे अगं, त्या इतकं बटाटे खातात, नि त्यांच्यामुळे आपल्यालाही खावं लागतं. या बटाट्यांनी अगदी विट आणलाय बघ. तुला नाही का वाटत तसं.”
“माम्या, मला तू आवडतोस म्हणून काय मी तुला गट्टम करते का? नाहीना. आपल्या काय आवडतं, हे महत्वाचं नाही, मिळतं ते महत्वाचं.”
“बरं मावशे बरं, माझा मुद्दा, काय गिळायला मिळतं, याच्याभोवती फिरत असला तरी, मालकीनबाईंचं बटाट्यांवरचं प्रेम एव्हढं उतू कां जातं, याचा उलगडा नको का व्हायला?”
“हं, तुला नेमकं काय जाणून घ्यायचय?”
“मावशे, अगं जे नेहमीच करते ते. तुला सगळया प्रश्नांची उत्तर ठाऊक असतातना. मग याचंही उत्तर तुझ्याकडे असेलच की.” मामा, मावशीसोबत लाडीगोडी करत म्हणाला.
“तुझी बटाटातृष्णा मिटवल्याशिवाय, तू काही शांत बसायचा नाही, सांगावच लागेल याचं उत्तर तुला.” असं बोलून मावशीने डोळे मिटले. दोन मिनिटांनी हसऱ्या चेहऱ्याने तिने मामासमोर डावा पंजा केला. मामाने उजवा पंजा समोर करुन टाळी दिली. अशी टाळी म्हणजे उत्तराची हाळी, हे समिकरण मामाला पाठ झालं होतं. त्यामुळे डोळयात तेल घालून तो मावशीकडे बघू लागला.
मावशी सांगू लागली, “माम्या, या प्रश्नाचं उत्तर मालकीनबाईंच्या आळसात दडल्याचं माझ्या लक्षात आलंय.”
“म्हणजे काय?”
“अरे, मालकीनबाईंना सगळयाच गोष्टिंचा फार कंटाळा! भाजी कापण्याचा तर त्याहून अधिक. पण बटाट्याचं तसं नाही.”
“म्हणजे?”
“अरे, बटाटा उकडला की तो सोलायला फारच सोपा असतो.”
“असं का?”
“त्याचं एक शास्त्र आहे.”
“याने की भानगड!”
“माम्या, शास्त्र गडबड करु शकते, भानगड नाही.” मावशी रागावून म्हणाली.
“सॉरी मावशे, पण उकडलेल्या बटाट्याला सोलण्यात कोणतं बरं, शास्त्र दिसलय, तुला.”
“अरे, बटाटा हा मुळात एक कंद. त्यामुळे त्याची साल आणि त्याचा गाभा, यांच्या पेशिंच्या रचनेत व त्यांच्या रासायनिक घटकांमध्ये बराच मोठा फरक आहे.”
“अच्छा!”
“तर, बटाट्याचा गाभा, हा पॅरेन्कायमल जातीच्या पेशिंपासून बनला असतो. त्यामुळे त्यात अन्नाची साठवण अगदी सहजतेने होते. या पेशिंची आवरणं सेल्युलोजची बनलेली असतात. पेक्टिन, हे रसायन म्हण किंवा गोंद म्हण या पेशिंना एकमेकांसोबत घट्ट जखडून टाकतो. साल मात्र बुचाच्या पेशीसारखी असते. त्याच्या आवरणात मोठ्या प्रमाणात लिग्निन आणि सुबेरिन रसायनांचा समावेश असतो. यामुळे पेशिला शक्ती प्राप्त होते. कच्च्या बटाट्यात साल आणि गाभा यांच्या पेशी पेक्टिनने एकमेकांसोबत जोडलेल्या असल्याने, त्यांना एकमेकांपासून अलग करणं कठीण जातं.”
“मग बटाटा उकडल्यावर काय होतं?”
“बटाट्याला उकडण्यासाठी त्याला उष्णता द्यावी लागते. या उष्णतेमुळे पॅरेन्कायमल पेशीचं स्वरुप बदलतं. या पेशिंना जोडणारं पेक्टिन फुगून ते मोडलं जातं. पेशी मउ होतात. त्यामुळे एकमेकांपासून अलग होतात नि त्याचवेळेस सालीशी घट्ट जखडून टाकणारा बंध कमजोर होतो.”
“समजलं समजलं…” मावशीला मध्येच थांबवत मामा म्हणाला.
“गधड्या काय समजलं?”
“हेच की, बटाट्याचा गाभा आणि साल एकमेकांपासून बाजूला सारायला फारसं श्रम लागतच नाही.”
“वा, क्या बात है मामू, महाज्ञानी मावशीचा हुषार भाचरा शोभतोस हं! तुला अगदी बरोबर कळलं. बटाटा उकडला तरी सालीमधील शक्ती कायम राहते, त्यामुळे ती एकसंध सोलून काढता येते.”मावशी उत्तरली.
“याचा अर्थ, मालकीनबाईंनी त्यांच्या आळसावरचा उतारा, बटाट्याच्या प्रेमात पडून असा शोधला म्हणायचा. ग्रेट!”
“काही ग्रेटब्रिट नाही. तू बघत राहा, एके दिवशी या, खा खा बटाट्यामुळे, मालकीनबाईच बटाटासारख्या टम्म फुगायच्या.” मार्गारेट छद्मीपणे हसत म्हणाली. “म्हणजे तुला सोलायला सोप्प कां?” मामा डोळे मिचकावत, चिरक्या आवाजात पुटपुटला. मावशीने त्याच्यापुढे टाळीसाठी उजवा पंजा समोर केला.
सुरेश वांदिले