तिचे बाबा देसिंघु पुंडी श्रीनिवासन आणि आई जेसिथा विजयन हे दोघेही अभियंते आहेत. पण, त्यांनी आपल्या लेकिला तुही आता या सुरक्षित करिअरकडे वळ असा काही सल्ला दिला नाही की गळ घातली नाही. तिची पोहण्यातली गती आणि कला बघून त्यांनी तिला सतत प्रेात्साहनच दिले. २०१८ मध्ये तिने सहज गंमत म्हणून किंवा टाइमपास म्हणून पोहायला सुरुवात केली. तेव्हा ती सहा वर्षाची होती. सुरुवातीला तिला पाण्याची खूप भीती वाटायची पण सततच्या सरावाने ही भीती कुठल्याकुठे पळून गेली. तिच्यात काहीतरी वेगळाचा स्पार्क असल्याचं तिचे प्रशिक्षक बी.एम मधुकुमार यांच्या लक्षात आलं. त्यांनी मग तिला पोहचण्याच्या ‘टाइमपास’पासून बाजुला करुन यामध्येच जास्तित वेळ खर्ची घालण्याचा सल्ला दिला. तिनेही तो मनापासून मानला. पोहण्याच्या या सरावाने ती चांगली सराईत झाली.
पण, आता एक नवीच समस्या उद्भवली. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठीही ती नाखुश असायची. पण, आई-बांबाच्या सततच्या आग्रहाखातर, ती पुढे छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. या स्पर्धेत तिला पदकंही मिळू लागली. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्याची तिची नावड दूर झाली. इतकी की, कोणत्याही स्पर्धेत पदक जिंकायचेच, या इर्षेनेच ती उतरु लागली. त्यातून पुढे तिने इतिहास रचला. एकापोठापाठ एक स्पर्धा, विक्रमांसह जिंकू लागली.
याची सुरुवात, २०२३च्या राष्ट्रीय कनिष्ट जलतरण स्पर्धेतून झाली. तिच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धे तिला भाग घ्यायला लावला. या स्पर्धेत तिने १०० मीटर, २०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धा जिंकल्या. त्याही नव्या विक्रमांसह. दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतही तिला भाग घेण्याची संधी मिळाली. २०२३ मध्ये गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरण स्पर्धेत तिने सात सुवर्णपदकं पटकावले. अशा राष्ट्रीय स्पर्धेत एकाच वेळी, सात सात सुवर्णपदकाची कमाई करणारी ती सर्वात तरुण खेळाडू ठरली. २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत तर तिची कामगिरी सर्वांनाच अचंभित करणारी ठरली. या स्पर्धेत तिने ११ पदकांची लयलूट केली. यात ९ सुवर्ण, एक चांदिचा आणि एक कांस्य पदकाचा समावेश होता. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पर्धकाचा सन्मान तिला प्रदान करण्यात आला. २०२४ मध्ये पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या पथकात तिचा समावेश होता. २०० मिटर फ्रीस्टाइल पोहण्याचा स्पर्धेत तिने भाग घेतला. यात तिला मनोजोगते यश मिळाले नाही. पण ती भारतीय क्रीडापटुंमध्ये सर्वात तरुण किंवा सर्वात लहान खेळाडू ठरली. २०२३ मध्ये हँगझोवू येथील आशियायी स्पर्धेतही तिचा सहभाग होता. त्यातही ती सर्वात तरुण खेळाडू तरी. २०२४ मये कर्नाटक मिनी ऑलिंपिक आणि कर्नाटक कनिष्ट जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. २०२४ मध्ये, ती ५४व्या सिंगापूर राष्ट्रिय एज ग्रुप स्पर्धेतही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. सध्या ती बेंगळुरुच्या केंद्रिय विद्यालयात १० वीमध्ये शिकते आहे.
तर, अशी ही धिनीदी देसिंगघू. वय वर्षे १५. हल्ली मुक्काम बेंगळुरु.
सुरेश वांदिले