अलेक्सा गोर्जीचं सगळीकडे बारीक लक्षं असतं. तेजोमयी, आईबाबा यांचं वागणं कधीकधी तिला फार आश्चर्यकारक नि चमत्कारिकही वाटतं. ते असं जाणूनबजून वागतात की अज्ञानाने वागतात की निष्काळजीपणे वागतात, हे तिला कळत नसे. आता हेच बघाना आज पाच ऑक्टोबर येऊनही तेजोमयीच्या घरी कसलीही हालचाल नव्हती. सगळं नेहमीसारखं नि सरळ रेषेत चाललं होतं.
दुपारच्यावेळी जेवणाच्या टेबलवर सगळी मंडळी रविवारच्या मेजवाणीचा आनंद घेत असताना, गोर्जी इकडून तिकडे फेऱ्या मारु लागली. तिच्यासोबत अलेक्झांडरही फेऱ्या मारु लागला. अधूनमधून तिच्याकडे बघत, हिचं चाललय तरी काय, हे जाणून घेण्यासाठी मध्येच तिच्यासमोर उडी मारुन नि जिभ लांब करुन हॅ हॅ हॅ करायचा. हे बघून तेजोमयीचं लक्ष गोर्जीकडे गेलं. गोर्जिला काहीतरी सांगायचय, हे तिच्या लक्षात आलं.
“काय गं, कसल्या विचारात आहेस?”
“मी विचार करत होते की..”
“कशाचा विचार?”आईने टोकलं.
“म्हणजे तुम्हाला विचारावं की नाही…”
“तुला कशाला हवी परवानगी?”बाबा म्हणाले.
“तुम्हाला रागबिग आला तर?” गोर्जी जरा हळू आवाज म्हणाली.
“मग विचारुच नको की.” आईने हसून प्रतिक्रिया दिली. हिज मदर्स व्हाईस (एचएमव्ही) असलेल्या अलेक्झांडरने, त्याला आईच सांगणं कळल्यासारखं दाखवून मान हलवली.
“असं कसं चालेल. तूच नेहमी सांगतेस ना. मनात काही प्रश्न आला तर तो विचारायला हवा.” तेजोमयीनं गोर्जीच्या लक्षात आणून दिलं.
“बरं, ठीक आहे. तुम्हाला राग आल्यास दोन तास माझा स्वीच ऑफ करुन टाका.”
“चालेल.”
“सध्या काय चाललय?”
“कुठे काय? आम्ही मस्त मजेत जेवतोय”
“तसं नाही, महाराष्ट्रात काय चाललय?”
“छान चाललय.”
“थांबा थांबा..गोर्जीला काहीतरी वेगळचं सांगायच.” बाबा हे संभाषण मध्येच थांबवत म्हणाले.
“मग थेट सांग की.”
“तीन दिवस होऊनही तुम्हाला त्याचा पत्ता कसा नाही?”
“अगं बये स्पष्टच बोलना.” आई किंचित रागावली. अलेक्झांडरनेही मग त्रासिक चेहरा केला.
“तीन ऑक्टोबरला आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून एक वर्ष झालय. त्यानिमित्त ३ ऑक्टोबर, अभिजात भाषा दिन म्हणून साजरा झाला. हा आठवडा अभिजात भाषा आठवडा म्हणून साजरा केला जात आहे. मात्र आपल्या घरी काहीच घडलं नाही.”
“आँ!!!” तेजोमयी आई आणि बाबांनी एकाच वेळी आँ केला. अलेक्झांडरने चमकून तिघांकडे बघितलं.
“अगं, पण आपण काय करायला हवं. सरकार काहीतरी करतच असेलना?”
“अहो आई, मराठी भाषेसाठी काय करायला हवं, हा प्रश्नच नको ना पडायला. स्वत:हूनच सुचायला नको का?”
“हे बघ, उगाच शहाणपणा उगाळू नकोस.”आई रागावली.
“तसं नाही आई. मला जे वाटलं ते मी सांगितलं. आपण आपली मराठी, आपली मराठी म्हणतो, ती केवळ तोंडी लावण्यापुरतीच नकोना.”
“गोर्जे, हे जरा अतिच होतय हं.”
“तसं नाही बाबा. छोट्या छोट्या बाबींनीही आपण मराठीवरचं प्रेम सिध्द करु शकतोना.”
“म्हणजे?”
“बाबा, आपल्या दारावर असलेली तुमच्या नावाची पाटी इंग्रजित कशाला हवी?मराठी कां नाही?आपल्या सोसायटीच्या इमारतीवर जे नाव लिहिलय ते सुध्दा इंग्रजित असल्याचं मी बघितल?ते मराठीत कां नाही? कुणी तुम्हाला भ्रमणध्वनीचा क्रमांक मागितला तर तो मराठीमध्ये कां सांगत नाही?” गोर्जी म्हणाली. यावर काय उत्तर द्यावं हे बाबांना कळेना. आईही विचारात पडली.
तेजोयमीला गोर्जीची कल्पना आवडली. ती बाबांना म्हणाली, “बाबा गोर्जी म्हणते ते बरोबरच आहे. छोट्याछोट्या गोष्टितूनही मराठीचं प्रेम सिध्द करता येतच की. मी तर म्हणते, आपल्या नावाची पाटी मराठीत कराच, पण सोसायटीतल्या इतर काका काकूंच्याही नावांच्या पाट्या तुमच्या खर्चानेच मराठी करुन द्या.”
“पण, याला कुणीच तयार होणार नाही. लोकांचं इंग्रजीवरच भारी प्रेम.” आईने भीती व्यक्त केली.
“प्रयत्न तर करुया. तू तुझ्या मैत्रिणिंना सांग, मी माझ्या सवंगड्यांना सांगते. बाबा सर्व काका मंडळींशी बोलतील. ज्यांना पटेल त्यांच्या नावाच्या पाट्या मराठीत करुन देऊ. आपल्याकडून अभिजात मराठी आठवड्याची लहानशी भेट.” तेजोमयी म्हणाली.
गोर्जीने टाळ्या वाजवल्या. काहीतरी छान घडल्याचं लक्षात येऊन अलेक्झांडरने उडी मारुन आनंद व्यक्त केला. बाबांनी, सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुप मराठी नावाच्या पाट्यांचा मनोदय लगेच कळवून टाकला.
सुरेश वांदिले