(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हेमामालीनी, माधुरी दीक्षित, उस्ताद तौफिक कुरेशी आणि तो यांच्यात काय साम्य असेल? तो अतिशय मधुर बासरी वाजवतो आणि त्याने या तिनही मान्यवरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साथसंगत केली आहे. या कलाकारांसमवेत त्याची जुगलबंदी रंगली आहे.

तो बासरी वाजवतो तेव्हा, ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध होतात. अनेकांनी तर त्याला आतापासूनच “कान्हा”, “गोपाल” असं संबोधायला सुरुवात केलीय.

त्याला इतकी सुमधूर बासरी वाजवता येतं, हे कित्येक दिवस त्याच्या घरच्यांनाही कळलं नाही. जेव्हा कळलं, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने हे बासरीवादन कुणाकडून शिकलं नि कधी? याची उत्सुकता सगळ्यांना लागली. हळूहळू हे रहस्य उलगडत गेलं. त्याचे बाबा लोकेनाथ रॉय हे चांगले प्रतिष्ठित बासरीवादक. ते, त्यांच्या मुलीला बासरी शिकवत. त्यावेळी हा, ते सगळं मन लावून ऐकायचा नि मग तितक्याच मन:पूर्वक बासरी वाजवून बघायचा. एके दिवशी त्याने घरच्यांना, आपलं बासरीतलं कौशल्य दाखवलं. या सुंदर वादनाने सगळे जण थक्क झाले. त्याचं वय तेव्हा होतं अवघं साडेचार वर्षाचं. पाच वर्षांचा असताना, पंडित तन्मय बोस यांच्या, ‘कल के कलाकार’ या सार्वजनिक कार्यक्रमात त्याने पहिल्यांदा बासरी वादन केलं. सहा वर्षाचा असताना त्याच्या बासरीवादनाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. यामध्ये, त्याने पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार यांच्या घरातील सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमात बासरी वाजवली होती. या व्हिडियोने सगळयांचं लक्ष वेधून घेतलं.

संबंध भारतभर त्याला लोकप्रियता मिळाली ती, ‘हुनरबाज: देश की धडकन’ या रियॅलिटी शोमधून. या कार्यक्रमात सर्वोच्च दहामध्ये त्याचा समावेश झाला होता. या कार्यक्रमाचे परीक्षक होते, सुप्रसिध्द अभिनेते मिथून चक्रवर्ती, निर्माते-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री परिणिता चोप्रा. मिथून चक्रवर्ती त्याच्या बासरीवादनाच्या कलेने इतके प्रभावित झाले की त्यांनी त्याला, “उस्ताद” ही पदवी बहाल केली. त्यावेळी त्याचं वय होतं अवघं  दहा वर्षे.

त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा स्पार्क असल्याचं सगळयांना जाणवलं. मग त्याच्या बाबांकडेच तो बासरी शिकू लागला. त्यात तो इतका पारंगत झाला की त्याला मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी बोलावणं येऊ लागलं. अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही त्याने आपली कला सादर केली. शांघाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या समारोपाच्या दिवशी त्याचं बासरी वादन झालं. २०१८ मध्ये, सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्या नृत्य आणि संगीत अकादमीमार्फत आयोजित ‘वसंतोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमात त्याला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. २०२३ च्या, ‘खेलो इंडिया युथ गेम्स’च्या शुभारंभाच्या कार्यक्रमातही त्याच्या बासरीवादनाने सर्वांना मोहून टाकलं.

सगळ्यांना नादब्रम्हाचा अनुभव  देणाऱ्या, ‘त्याला’ संगीतातील अतिशय प्रतिष्ठित अशी, भारतरत्न एम.एस.सुब्बालक्ष्मी फेलाशीप मिळालीय. ही फेलोशीप मिळणारा तो सर्वात लहान कलावंत ठरला आहे. याशिवाय त्याला २०१७ साली नादब्रम्ह पुरस्कार, २०१८ साली मास्टर मोहन पुरस्कार, २०२१ साली बायजू यंग जिनियस ट्रॉफी, सामा बाल पुरस्कार, एशियन-आफ्रिकन आयकॉनिक पुरस्कार, २०२२ साली कल्की गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलय.

तर, असा हा अनिरबन रॉय. वय वर्षे १५. हल्ली मुक्काम-कोलकता.

सुरेश वांदिले