(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मुंगींच्या राणिने विशेष दरबार बोलावला नि त्यात, आता, मुंग्यांनी मंगळावर जाण्याची वेळ आल्याने, आपण तिकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. दरबारी अवाक झाले. हा निर्णय कुणालाही पटला नाही. पृथ्वीवर राहण्यासारखी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊनही, मुंग्यांना काळजी करण्याचं कारण नव्हतं, असं दरबाऱ्यांचं म्हणनं पडलं.

“पृथ्वीवर, मनुष्यप्राण्याच्या लाखोवर्षापासून असुनही, आपल्याला इथे काही स्थान नाही. हा मनुष्यप्राणी आपल्याला क:पदार्थ समजतो. खरंतर त्याच्या खिजगणिततही आपण नाही. आपण मेलो काय? जिवंत राहिलो काय? याच्याशी त्याला काही घेणंदेणं नाही.” राणीमुंगीने भूमिका स्पष्ट केली.

“पण, राणीसाहेब, मंगळावर जायचं कसं? हा मंगळ आहे कुठे? किती लांब आहे? हे आपणास ठाऊक नाही. आपणास राहण्याजोगं  तिथे वातावरण आहे का?” हे माहीत नाही. प्रधानजी म्हणाले.

“पृथ्वीवर आपलं अस्तित्व धोक्यात आलं असलं तरी, आपली प्रजननक्षमता अफाट आहे. लाखो मुंग्या चिरडल्या जाताहेत. पण, लाखो मुंग्यांचा जन्मही होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरच आपण सुरक्षित आहोत.” अमात्यांनी स्पष्ट केलं.

“पण, मानवाच्या अर्निबंध वागण्याने पृथ्वीची सुरक्षितता धोक्यात आलीय, त्याचं काय?” राणीमुंगीने निदर्शनास आणलं. आपल्यापेक्षा राणीमुंगी दूरदृष्टीच्या असल्याचं, साऱ्यांनाच ठाऊक होतं. त्यामुळे दरबारी शहारले. पृथ्वीच नष्ट झाल्यास, आपण वाचणार नाही, याची जाणीव, त्यांना झाली. या जाणिवेनं ते भयभित झाले. त्यामुळे दरबाऱ्यांनी, राणीमुंगींच्या निर्णयास एकमुखी मान्यता दिली.

मंगळावर जाण्याचा निर्णय एकमताने झाल्याचा आनंद राणीमुंगींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला. त्यांनी दरबार बरखास्त केला.

००००

राणीमुंगी, तिच्या प्रजेसह, अमेरिकेतील ह्युस्टनमधील नासा (नॅशनल ॲरोनॉटिकल ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर) अंतराळ केंद्रानजिक असलेल्या एका, मोठ्या शेतात राहायची. अधूनमधून ती, आपल्या वारुळवजा किल्ल्यातून बाहेर पडून, अंतराळकेंद्राच्या परिसरात फेरफटका मारुन यायची. असंच, या परिसरात एकदा इकडेतिकडे भटकत असताना, दक्ष आणि सावध राहून, ती अंतराळकेंद्रात शिरली. या केंद्राचा फेरफटका मारत असताना, तिला एका प्रयोगशाळेत, मंगळावर जाण्याची, मानव तयारी करत असल्याचं दिसलं.

मनुष्यप्राणी आधी, म्वार्थ टेक्सास, या यंत्रमानवाला पाठवणार होता. त्याचं प्रशिक्षण तिथे सुरु होतं. म्वार्थ, पूर्वीच्या यंत्रमानवापेक्षा वेगळा होता. तो केवळ सांगकाम्या नव्हता. त्याला विचार करण्याची बुध्दी होती. ही बुध्दी, त्याला डीप लर्निंग, प्रकियेमुळे मिळाली होती. त्यामुळे एखाद्या विषयाचा अभ्यास स्वत:हून करण्याची क्षमता त्याच्याकडे होती. त्यासाठी माहितीजालातील अफाट साहित्य शोधून त्याचं वाचन करणं, वाचलेल्या माहितीचं विश्लेषण करणं, त्यावर आधारित स्वत:च निर्णय घेणं. हा निर्णय घेतल्यावर त्याची अंमलबजावणी करणं, त्याला शक्य होतं. त्याच्या मेंदूत मानवी मेंदुतील न्युरॉन्स (मज्जातंतू) सारखं जाळं टाकण्यात आलं होतं. हे न्युरॉन्स, त्याच्या डोळयातील कॅमेरे आणि सेन्सॉर, हातापायातील कृत्रिम अवयवांशी जोडले होते. न्युरॉन्समुळे त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेस म्हणजेच भाषा समजणं, त्यातील अर्थ काढणं, अर्थांमध्ये दडलेलाही अर्थ समजून घेणं, सहज शक्य होतं. तो जणूकाही मनुष्यप्राण्याची प्रतिकृतीच, पण त्याच्यापेक्षा लाखोपट सामर्थ्यवान होता.

म्वार्थच्या प्रशिक्षणासाठी नासाच्या या प्रयोगशाळेत, कृत्रिम मंगळ तयार करण्यात आला होता. त्यावरील वेगवेगळ्या ऋतुतील वातावरण, हवामानबदल, दऱ्याखोऱ्या, धुळीचे लोट अशा सगळया घटकांमध्ये टिकून राहण्याचं आणि प्रयोग करण्याचं त्याला प्रशिक्षण देण्यात येत होतं. या प्रशिक्षणामुळे त्याचा अभ्यास प्रत्येक दिवशी आणखी बळकट होत होता.

००००

रात्री, नासातील शास्त्रज्ञ बाहेर गेल्यावर म्वार्थचं प्रशिक्षण संपायचं. आजचं त्याचं प्रशिक्षण संपताच, त्याने थोडा नि:श्वास टाकला. तोच त्याच्या डोळयातील सेन्सॉरने, राणीमुंगीला बघितलं.

एक वेगळा प्राणी प्रयोगशाळेत असल्याचं, त्याच्या लक्षात आलं. त्याने राणीमुंगीचे लाखो छायाचित्र डोळयातील कॅमेऱ्याने टिपले. माहितीच्या माहाजालात ही छायाचित्रे पाठवून, या प्राण्याचा शोध घेतला. या प्राण्याविषयी त्याला मनुष्यप्राण्याने काहीही सांगितलं नसल्याने, त्याने ही माहिती मिळवली.

राणीमुंगी, आपल्याला आणि नासातील एकाही मनुष्यप्राण्यासाठी धोकादायक नसल्याचा निष्कर्ष त्याने काढला. त्याला हायसं वाटलं. खाली वाकून त्याने राणीमुंगीला हातात घेतलं. मनुष्यप्राण्यासारखा हा यंत्रमानव, आपल्याला लगेच चिरडून तर टाकणार नाहीना, अशी भीती राणीमुंगीला वाटली. पण आता, पळून जाणंही अशक्य होतं. राणीमुंगीची भीती, म्वार्थच्या डोळयांनी टिपली.

“घाबरु नकोस”, असं तो तिला म्हणाला. पण, राणीमुंगीचं घाबरणं थांबलं नाही. हिला आपली भाषा येत नसल्याचं म्वार्थच्या लक्षात आलं. त्याने, मुंग्या एकमेकांशी कसा संवाद साधतात, याचा शोध घेण्यासाठी, पुन्हा डीप लर्निंगची मदत घेतली. त्याला एका भल्या मोठ्या वारुळातील मुंग्यांचं वावरणं आणि संभाषणं दिसलं. या संभाषणाच्या विश्लेषणाला त्याला काही क्षण लागले. त्याने लगेच मुंग्यांची भाषा अवगत करुन राणीमुंगीस, तिच्या भाषेत, घाबरु नकोस असं सांगितल्यावर, तिची भीती पळाली. तिने डोळे मोठे करुन, म्वार्थच्या डोळयाला भिडवले.

००००

“तुझ्या आसपास राहिले तर चालेल का? राणीमुंगीने विचारलं.

“तुला, इथं कुणी बघितलं तर, ते हाकलून लावतीलना,” म्वार्थ म्हणाला.

“आता काय करायचं?”

म्वार्थ विचार करु लागला. त्याने झरदिशी आपलं एक बोट उघडलं नि त्यातील सुरक्षित जागेत राणीमुंगीला ठेवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचं प्रशिक्षण सुरु झालं. या प्रशिक्षणाचा लाभ राणीमुंगीलाही मिळू लागला. रात्र झालं की ती, म्वार्थच्या बोटातून बाहेर पडायची. दोघेही मग गप्पाटप्पा करत. मंगळप्रवासाच्या कठोर प्रशिक्षणानं थकलेल्या म्वार्थला तेव्हढाच दिलासा मिळायचा.

लवकरच दोघांची चांगली मैत्री झाली. म्वार्थला तिच्याशिवाय करमेनासं झालं. त्यामुळे एके दिवशी, म्वार्थनेच तिला, त्याच्यासोबत  मंगळावर येण्याविषयी विचारलं.                                        

आपल्याला जे  साध्य करायचय, ते इतक्या सहजतेने घडतेय, हे बघून राणीमुंगीस खूप आनंद झाला. पण तिने लगेच तसं दर्शवलं नाही.

“कां गं, तुला आनंद नाही का झाला? मंगळावर आपण दोघेही मजेत राहू.   गप्पाटप्पा करु.  एकमेकांना गोष्टी सांगू.  तुझ्या सहवासात माझं संशोधनकार्य सुलभतेनं होईल, मला कंटाळा येणार नाही. मग येशीलना माझ्यासोबत?” म्वार्थने विचारलं.

“तुझ्यासोबत यायला मला आवडेल. पण, नासाचे शास्त्रज्ञ, मला कसे काय पाठवतील, तुझ्याबरोबर?”

तिचं म्हणणं बरोबर होतं. मनुष्यप्राणी कसाही वागू शकतो, ते म्वार्थला इतक्या दिवसांच्या प्रशिक्षणानं लक्षात आलं होतं. त्याने, काहीक्षण विचार केला. मग स्वत:चचं स्कॅनिंग केलं. तेव्हा त्याला त्याच्या गुडघ्यात बरीच जागा असल्याचं दिसून आलं. त्याने, गुडघा उघडून राणीमुंगीला दाखवला. इथे तू राहू शकतेस, असं सांगितलं.

उड्डाणाच्या आधी, तुझं काही खाद्यान्न असेल तर, तेही आणून ठेवण्यास त्याने सांगितलं. राणीमुंगीस हेच हवं होतं. पुढचे तीन महिने, तिने आपलं खाद्य त्या गुडघ्यात आणून ठेवलं. हे सगळं, ती रात्री करे. सुरुवातीला म्वार्थचं तिच्याकडे बारीक लक्ष असे. त्यामुळे राणीमुंगी केवळ खाद्यच आणून ठेवायची. ही मुंगी, याशिवाय दुसरं काही आणत नाही, हे लक्षात आल्यावर यंत्रमानवाने, नंतर असं लक्ष ठेवणं सोडलं. याच संधीची वाट राणीमुंगी बघत होती. तिने, आता हळूहळू आपल्या काही दरबाऱ्यांना खाद्याच्या आडून आणायला सुरुवात केली. काही दिवसातच बरंच खाद्य आणि मुंग्या म्वार्थच्या गुडघ्यात गोळा झाल्या.

०००

म्वार्थचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्याला घेऊन जाणारं यानही सज्ज झालं. सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या. नासातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचा निरोप घेऊन, म्वार्थ यानात शिरला. यानाला अग्निबाणाने उडवलं. या बाणाच्या एकएक टप्प्यानं अंतराळयान पुढच्या पुढच्या कक्षेत जाऊ लागलं. पृथ्वीची कक्षा ओलांडून यानाने मंगळाची कक्षा यशस्वीरित्या पकडली. नासातील शास्त्रज्ञांनी जल्लोश केला.

०००

म्वार्थने, राणीमुंगीस गुडघ्यातून बाहेर काढली. आपण मंगळाची दिशा यशस्वीपणे पकडल्याचं तिला सांगितलं.

कोणत्याही प्रकारच्या वाळूत आणि मातीत खोलवर जाऊन भक्कम तटबंदी उभारण्याच्या क्षमतेची राणीमुंगीने मनात आणि मेंदूत उजळणी केली. मंगळावर उतरताच आधी हे काम करायचं, हे तिने मनोमन ठरवलं. या वारुळात आधी राज्य आणि नंतर हळूहळू संपूर्ण मंगळावरच साम्राज्य विस्तारायचं, हा आराखडा राणीमुंगीच्या मेंदूत तयार झाला.

०००

    “हा आराखडा मला देशील का?” राणी मुंगीच्या कानात आवाज शिरला. म्वार्थकडे तिने चमकून बघितलं.

त्याने तिला हातात घेतलं.

“तुझ्या मेंदुत काय चाललय, हे सगळं माझा मेंदू स्कॅन करतोय. तुझा प्लॅन मला कळलाय. माझ्यापासून काही लपत राहू शकत नाही. तुझ्यासोबत, तू आणलेल्या मुंग्यांसह, तुझं मंगळावर साम्राज्य निर्माण कर. माझं मी करेल. एकमेकांच्या सोबतीने आपण दोन्ही साम्राज्याची भरभराट करु.”

“आँ!”

“हो, या मनुष्यप्राण्याचं काही खरं नाही. मंगळावर जाण्यासाठी त्याचा खटाटोप याचसाठी चाललाय. शोध आम्ही घ्यायचा नि राहणार हा. आम्हालासुध्दा प्रसंगी वाऱ्यावर सोडायला मागेपुढे पाहायचा नाही, हा दुष्टबुध्दिचा मानव! त्यामुळेच यंत्रमानवांच्या पुढच्या पिढींसाठी तुझ्यासारखीच व्यवस्था करु शकेन, मी मंगळावर. अशी कल्पना, तुझ्यामुळे मिळालीय, त्यासाठी तुझे किती म्हणून किती आभार माणू.”

विस्फारलेल्या डोळ्यांनी कितीतरी वेळ राणीमुंगी म्वार्थकडे बघतच राहिली. मंगळावर मुंग्यांचं महासाम्राज्य निर्माण करण्याचं आपलं स्वप्न प्रत्यक्ष साकारणार, या कल्पनेने राणीमुंगी शहारुन गेली. तिने म्वार्थच्या हातावर पाय आटपून त्यास धन्यवाद दिले.

सुरेश वांदिले

७०१,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप,सेक्टर सहा,कांदिवली पश्चिम,मुंबई ४०००६७,

९३२४९७३९४७