(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“या मार्गेटलीचं काही कळतच नाही बुवा. त्या नेपोटल्या-फिपोटल्यावर एवढी खार खाऊन असते. पण आज म्हण्ये त्याला काँग्रेटस द्यायला जावू. येडी झालीय मार्गी. नेपोटल्या काय हिला थँक्यू म्हणणार का? की त्याचं हाडूक देणार हिला चघळायला? उलट आयतीच मेजवाणी चालत आली म्हणून तो थयथय नाचायचा. हिलाही पोटात नि तिच्यासोबत मलाही दातात! छे, छे मी नाही होऊ देणार असं एकावर फ्री. नाही होऊ देणार मी…” रॉबिन्सन उंदीर मामा स्वत:शीच पुटपुटला. आभाळ कोसळो नाही तर पृथ्वी दुभंगो, काही झालं तरी मार्गेटलीसोबत नेपोटल्याला भेटायला जायच नाहीच्च. रॉबिन्सनने स्वत:लाच बजावलं. तेव्हढ्यात मार्गारेट मांजरी मावशीचा आवाज आला…

“रॉब्या तयार झालासना तू. मी कधीचीच वाट बघतेय तुझी.”

“मावशे, मी नाही येणार तुझ्यासोबत.”

“गधड्या कां येणार नाहीस? आपण चांगल्या कामासाठी चाललोत ना.”

“अगं मावशे, त्या नेपाटल्याला भेटणं म्हणजे स्वत:हून आगिच्या स्वाधीन होणं, हे तुला कसं कळत नाही. आणि काय ग मावशे त्याने कोणता असा मोठा पराक्रम गाजवला की त्याच्याबद्दल तुझं प्रेम इतकं उतू चाललय? तुझा काही दुसरा डावफाव तर नाहीना?”

“रॅाब्या, तुझ्या इटुकल्या मेंदूत कुठून आलाय डावफावाचा उजवा विचार?” मावशी ओरडली. बिळाच्या बाहेर आला नाहीस तर मालकीनबाईंना सांगून बिळ बुजवून टाकीन, अशी धमकीही दिली. ही दुष्टाटली काहीही करु शकते, हे ठाऊक असल्याने मामा बळेबळेच बिळाच्या बाहेर आला. तो बाहेर येताच मावशीने त्याच्या कानाला जोरदार चावा घेतला. तो वेदनेने विव्हळू लागला.

“मावशे मावशे किती जोराने चावलीस. माझा जीव चालललाय ना.”

“तू माझ्यासोबत नेपोटल्याला काँग्रेट्स द्यायला आला नाहीस तर खरोखरच तुझा जीव घेईन राब्या.” मावशी दात दाखवत म्हणाली.

“येतो येतो मावशे, पण आधी मला हे तर सांगना की तू त्या तुझ्या शत्रूनंबर एक नेपाटल्याचं कौतुक करण्यासाठी एव्हढी उतावीळ कां झालीस? असा कोणता तीर मारलाय त्याने?”

“अरे रॉब्या, त्याने भीम पराक्रम गाजवलाय. एक मोठ्ठा गुन्हेगार सापडून दिलाय त्याने.”

“म्हणजे काय केलं? नेपोटल्याकडे ही शक्ती आली तरी कुठून?”

“सांगते सगळं सांगते. बस जरा माझ्या बाजूला.” मावशीने मामाला बाजूला बसवलं. त्याच्यासाठी चीजचा एक तुकडा आणला. तो पोटात गेल्यावर मामाला तरतरी आली. मावशी काय सांगते याकडे तो कान देऊन ऐकू लागला.

“अरे हा नेपोटल्या किंवा त्याचे भाईबंद कुत्रोबा — देवाने त्यांना एक खास गंधज्ञानशक्ती दिलीय.”

“कोणती गं?”

“अरे या डॉगीजना म्हणजे कुत्रोबांच्या काही जाती मानवापेक्षा साधारण २० ते ६० पट जास्त सूक्ष्म वास ओळखू शकतात. काही कुत्रोबांच्या जातींमध्ये तर १२५ ते ३०० दशलक्ष गंधग्राहक पेशी (ओलफॅक्ट्री रिसेप्टर्स) असतात, तर मनुष्यात फक्त सुमारे ५ ते ६ दशलक्ष असतात. त्यामुळे हे कुत्रोबा अगदी क्षीण वाससुद्धा ओळखू शकतात.”

“आँ!”

“हाँ! शिवाय वेगवेगळे गंध ओळखून ठेवण्याची आणि गुन्हेगारी तपासात त्यांचा माग काढण्याची एक खास कला असते, तिला ‘फॉरेन्सिक ऑडोरॉलॉजी’ म्हणतात.”

“अगं असं असेल तर मग प्रत्येकच कुत्रोबाने गुन्हेगाराला शोधलं असतं ना! हाडकाच्या वासाशिवाय त्यांना काही समजत तरी असेल का?”

“रॉब्या, तुझं म्हणणं बरोबरच आहे. पण ज्या कुत्रोबांना गंध किंवा वाास ओळखण्याचं खास प्रशिक्षण दिलं जातं, ते आपल्या या नैसर्गिक शक्तीचा योग्य वापर करु शकतात.”

“तुला कसं कळलं ते?”

“अरे, मी परवा मालकीनबाईंसोबत तिच्या पोलीस भाच्याकडे गेले होते. पोलीस मैदानाजवळ त्यांचं घर आहे. मालकीनबाई बोलत असताना मी हळूच मैदानात गेले. बघते तर काय — हा नेपोटल्या तिथेच! मी घाबरलेच, पण त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं.”

“तिथे कशाला गेला मरायला हा?”

“अरे, तिथे त्याचं प्रशिक्षण चालू होतं. मी पाहिलं की प्रशिक्षकाने त्याच्या हाताला लागलेला थोडासा घाम एका लोखंडी वस्तूवर पुसला आणि ती वस्तू मैदानात कुठेतरी लपवून ठेवली. मग त्या प्रशिक्षकाने त्याच्या घामाजलेला हात नेपोटल्याला आणि इतर कुत्र्यांना हुंगवला.”

“कशासाठी?”

“मलाही हाच प्रश्न पडला! मग समजलं की त्या हाताचा जो गंध आहे, तो कुत्र्यांच्या मेंदूत ‘ओलफॅक्टरी बल्ब (olfactory bulb)’ नावाच्या भागात साठवला जातो. नंतर हा संकेत हिप्पोकॅम्पस आणि इतर स्मरणभागांपर्यंत पोहोचतो — म्हणून कुत्रोबा त्या विशिष्ट वासाला ओळखून ठेवतात.”

“मग काय होतं?”

“मग त्यांना मैदानात सोडलं जातं. ते नाकानं गंध घेत घेत त्या लपवलेल्या वस्तूपर्यंत बरोबर पोचतात. त्यांची स्मरणशक्ती आणि गंधज्ञान दोन्ही जबरदस्त असतं.”

“वंडरफूल!”

“हो ना! या प्रशिक्षित कुत्रोबांची ही गंधशक्ती इतकी अचूक असते की त्यांचा वापर मादक पदार्थ, स्फोटके, मृतदेह किंवा इतर संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी पोलीस आणि सैन्य दोन्ही करतात. काहीवेळा युद्धातही हे प्रशिक्षित कुत्रोबा बाँब आणि दारुगोळा शोधताना स्वतःचा जीव धोक्यात घालतात, पण सैनिकांचे प्राण वाचवतात.”

“ओह माय गॉड!”

“आपला शत्रू असलेल्या नेपोटल्यानेही असाच पराक्रम परवा गाजवला. म्हणून मी म्हणते — त्याचं कौतुक करायला हवं. मन मोठं ठेवायला हवं.”

“मावशे, आपण भलेही मन मोठं करू गं, पण त्याचं मन छोटं नि जबडा मोठाच राहिला तर काय?” रॉबिन्सन थरथर कापत म्हणाला नि चटदिशी बिळात शिरला.

मावशीला जागेपणीच नेपोटल्याचा जबडा आठवला. “तो गच्चकन चावला तर सरळ रॅबिजची इंजेक्शन्स घ्यावी लागतील!” या कल्पनेने तीचं धैर्यच पळालं. तिने नेपोटल्याला ‘काँग्रेट्स’ द्यायचा विचार ताबडतोब सोडून दिला.