(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मुकाभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्‍ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४०० कलावंतांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे. योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पध्दतीनेच करावा लागतो. अर्जाचा नमूना संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीचे विषय

पुढील कलाप्रकारांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो- (अ) सुगम शास्त्रीय संगीत– (१) ठुमरी, (२) दादरा, (३) टप्पा, (४) कव्वाली, (५) गझल, (६) कर्नाटकी शैलीवर आधारित सुगम संगीत, (८) रविंद्र संगीत, (९) नझरुल गिती, (१०) अतुलप्रसाद

(ब) लोककला- (१) लोकनृत्य, (२) लोकसंगीत, (३) लोकगीत, (४) लोकरंगमंच, (५) पारंपरिक आणि देशी कला, (६) कठपुतळी

(क) दृष्यकला- (१) शिल्पकला, (२) चित्रकला, (३) सर्जनशील छायाचित्रणकला, (५) मातीकला, (६) ग्रॅफिक्स. (ड) रंगमंच- (१) दिग्दर्शन, (२) अभिनय. (इ) भारतीय शास्त्रीय नृत्य- (१) भरतनाट्यम, (२) कथ्थक, (३) कुचिपुडी, (४) कथकली, (५) मोहिनीअट्टम, (६) ओडिसी/नृत्य आणि संगीत, (७) मनिपुरी/नृत्य आणि संगीत, (८) थांगता, (९) छाऊ /नृत्य आणि संगीत, (१०) सत्रीया नृत्‍य, (११) गौदिया नृत्य. (ई) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत- कंठ आणि  वाद्य. (फ) कर्नाटकी शास्त्रीय संगीत-कंठ आणि  वाद्य

विस्तृत यादी

(१)बाहुली नाट्य (Puppet Theatre)

(१)सावलीच्या बाहुल्या (Shadow Puppets) –रावणछाया – ओडिशा, चामड्याच्या बाहुल्या – महाराष्ट्र, थोल पावाकूथू – केरळ, थोलू बोम्मलाट्टम – तामिळनाडू, थोलू बोम्मलाट्टम – आंध्र प्रदेश, तोलागु गोम्बे अट्टा – कर्नाटक

(२) काठी किंवा दोरीच्या बाहुल्या (Rod/String Puppets)- पुतुलनाच – पश्चिम बंगाल, कठपुतली – राजस्थान, गोम्बेअट्टा – कर्नाटक, पावाकुथू – केरळ, बोम्मलाट्टम – तामिळनाडू, सखी- कुंधी – ओडिशा, काळसूत्री बाहुल्या – महाराष्ट्र, चादर-बदर – बिहार

(३)  हातमोज्यांच्या बाहुल्या (Glove Puppets)- गुलाबो-सिताबो – उत्तर प्रदेश, पावा कथकली – केरळ

 

(२)पारंपरिक रंगभूमी (Traditional Theatre)

(३) भक्ती संगीत (Devotional Music)- हरिकथा किंवा कथाकलाक्षेपम्, थेवरम्, तिरुपुगळ, कवडिचिंदू, महाराष्ट्रातील भजन आणि अभंग, विविध धार्मिक पंथांची गीते, संकीर्तन – मणिपूर, बाऊल – बंगाल, दिव्यप्रबंधम् आणि अरैयसेवई

(४) लोकसंगीत (Folk Music)- सर्व प्रदेशांतील महिलांची गीते, मुलांची व मुलांनी गायलेली गीते, महाकाव्यांशी संबंधित गीते, विविध जातींची गीते, सर्व प्रदेशांतील मातृदेवीशी संबंधित गीते, विविध प्रकारच्या लावण्या – उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक,गवळण – महाराष्ट्र, कुरवांजी गीते – दक्षिण भारत, कलगी-तुरा – विविध प्रदेशांतील (नागेशी, हरदेशी – कर्नाटक),गोरवांची गीते (कलगी-तुरा),गोंधळ – कर्नाटक व महाराष्ट्र, बिंगी पाडा (अंतिके, पंतिके), तत्वगीते (एकतारी मेळा),किन्नरी जोगींची गीते, काणे-पाडा, गीगीपाडा, गुंडिका पाडा, जोकुमार गीते, डोंबुई दासांची गीते (बॅलड), निळा गाऱ्याची गीते, पंढरीची भजने, रिवायतची गीते (प्रश्नोत्तर) आणि मर्सिया कहाणी

(५) लोक व आदिवासी वाद्यवृंद (Folk and Tribal Musical Instruments)- सामूहिक वादन: पंचमुख वाद्य, करडी, माजलू, वळगा, चिट्टी, मेला, छाकरी, अंजुमन इत्यादी

(६) इतर पारंपरिक कला प्रकारपेना इसेई – मणिपूर,लोकसंगीत (जातीय संगीत),मांड – राजस्थान, राणामाल्येम – गोवा, देवधनी – आसाम, चंदायनी – मध्य प्रदेश, भांड जसन – काश्मीर,थेय्यमथुरा,तिबेटी चित्रकला व लाकूडकामाचा अभ्यास – तिबेटीयन वर्क्स अँड आर्काइव्हज, धर्मशाळा

 

अटी आणि शर्ती

या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षाचा आहे. या कालावधीत संबंधित कलावंताने आधी घेतलेले प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याची निवड केली जाते. मान्यताप्राप्त संस्थेतील गुरुंकडे अधिक प्रगत प्रशिक्षणाची सुविधा असते. शिष्यवृत्तीच्या कालावधीत कलावंतास खडतर प्रशिक्षण घ्यावे लागेल. सैध्दांतिक ज्ञानप्राप्तीसाठी वेळ दिल्यानंतर या कलाकारास दररोज किमान तीन तास सराव करणे बंधनकारक आहे.

या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या प्रत्येक कलावंतास दोन वर्षासाठी दरमहा ५ हजार रुपयांची शिष्‍यवृत्ती दिली जाते. याव्दारे त्याने आपल्या दैनंदिन गरजा, पुस्तक खरेदी, प्रवास खर्च, इतर साहित्य, प्रशिक्षण शुल्क आदी भागवावेत अशी अपेक्षा आहे.

अर्हता-

संबंधित कलावंताने आपल्या कला क्षेत्रातील गुरुंकडे किंवा संस्थेकडे किमान पाच वर्षाचे प्रशिक्षण घेतलेले असावे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना संबंधित गुरु किंवा संस्थेचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल. ही शिष्यवृत्ती प्रगत प्रशिक्षणासाठी असल्याने संबंधित कलावंताने आपल्या कलेत ‍किमान प्रभुत्व मिळवलेले असावे. ही शिष्यवृत्ती नवशिक्या कलाकारांसाठी नाही. खडतर प्रगत प्रशिक्षणासाठी आपण तयार असल्याचा पुरावा संबंधित कलाकारास द्यावा लागेल. संबंधित कलाकाराचे वय एक एप्रिल रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

 

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत (छायाचित्रासह) पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

  • शैक्षणिक पात्रतेची (पदवी, पदविका, डिप्लोमा इत्यादी) व अनुभवाची स्‍वसाक्षांकि प्रत. मूळ कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत जोडू नयेत.
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (मॅट्रिक्युलेशन) किंवा त्यास समकक्ष वयाचा पुरावा (ज्योतिषशास्त्रीय पत्रिका वगळून) याची एक स्‍वसाक्षांकित प्रत.
  • एक पासपोर्ट आकाराचे अलीकडील छायाचित्र.
  • चित्रकला, शिल्पकला किंवा अनुप्रयुक्त कला (Applied Arts) क्षेत्रातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कलाकृतींच्या छायाचित्रांच्या स्‍वसाक्षांकित प्रती सादर कराव्यात.
    दृश्यकलेसाठी किमान शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स किंवा समकक्ष असावी.
  • जर उमेदवार एकापेक्षा अधिक क्षेत्रांसाठी अर्ज करू इच्छित असेल, तर प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा.

निवड प्रकिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना तज्जांपुढे आपली कला सादर करावी लागेल किंवा मुलाखत द्यावी लागेल. मुलाखत किंवा कला सादरीकरणाची वेळ तारीख आणि ठिकाण उमेदवारांना ईमेलव्दारे कळवले जाते. उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाते. निवड यादी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कळवलेही जाते.

संपर्क– सेंटर फॉर कल्चरल रिर्सोसेस ॲण्ड ट्रेनिंग, १५ ए, सेक्टर ७, व्दारका, नवी दिल्ली-११००७५, दूरध्वनी- ०११-२५०७४२५६, संकेतस्थळ- https://indiaculture.gov.in/award-scholarships-young-artists-different-cultural-fields

०००

फेलोशीप

भारत सरकारच्या सेंटर फॅार कल्चरल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग या संस्थेमार्फत नृत्य संगीत नाटक, जादू, कठपुतळी, जादू, कठपुतळी, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, कोरिव काम, कुंभार काम, भित्तीचित्रकला, सर्जनशील लेखन आदी सांस्कृतिक बाबींच्या प्रगत संशोधनासाठी दरवर्षी  दिल्या जातात. या फेलोशीप दोन प्रकारच्या आहेत.

(१) ज्युनियर फेलोशीप- या अंतर्गत दरमहा १० हजार रुपयांची फेलोशीप दिली जाते. उमेदवाराचे वय २० ते ४० या दरम्यान असावे. (या उमेदवारांचा जन्म १ एप्रिल १९९३ ते ३१ मार्च २०००च्या दरम्यान झालेला असावा.) या फेलोशपीची संख्या २०० आहे.

(२) सिनिअर फेलोशीप – ही प्रगत सांस्कृतिक संशोधनासाठी दिली जाणारी फेलोशीप आहे. ही फेलोशीप शिष्यवृत्ती नृत्य, संगीत, नाटक, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, भित्तीचित्रकला, सर्जनशील लेखन, जादू, कठपुतळी इत्यादी क्षेत्रांतील अनुभवी कलाकार व संशोधकांसाठी दिली जाते. अर्जदाराचे वय ४० वर्षांपेक्षा अधिक असावे (उदा. २०२५-२६ साठी १ एप्रिल १९८३ पूर्वी जन्म झाला असावा.), संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचे प्रशिक्षण गुरु/संस्थेकडून घेतलेले असावे. या फेलोशिप अंतर्गत दोन वर्षासाठी दरमहा २० हजार रुपये अर्थसाहाय्य दिलं जातं. या फेलोशीपची संख्या २०० आहे.

अर्ज प्रक्रिया

प्रत्येक फेलोशीपसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. अर्ज संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२५ आहे. संपर्क- https://ccrtindia.gov.in/

इच्छुकांना आपल्या प्रकल्पाविषयी १००० ते १५०० शब्दांमध्ये सारांश हिंदी, इंग्रजी द्यावा लागतो सर्जनशील लेखनकलेतील प्रस्ताव मातृभाषेत द्यावा लागतो. यामध्ये प्रकल्पाचे स्वरूप, उद्दिष्ट, पद्धती, कालावधी, अपेक्षित परिणाम याची माहिती असावी.

सुरेश वांदिले