(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतातील विमानसेवेचा अतिशय झपाट्याने विस्तार होत आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन या संस्थेच्या अंदाजानुसार २०२५ पर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हवाई वाहतुक क्षेत्रातील देश होऊ शकतो. विमानतळांची संख्या वाढत चालल्याने त्यांच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढणार आहे. याक्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत.

() पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन्स.

हा अभ्यासक्रम राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिर्व्हसिटीने सुरु केला आहे. केंद्रिय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारे हे केंद्रिय विद्यापीठ आहे. या संस्थेव्दारे हवाई उड्डाण क्षेत्रातील विविध विषयांचे शिक्षण – प्रशिक्षण दिले जाते.

हा अभ्यासक्रम जीएमआर एव्हिशन ॲकॅडेमीच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. कालावधी – १८ महिने. १२ महिन्यांचे सैध्दांतिक शिक्षण, कॅम्पसमध्ये दिले जाते. ६ महिन्यांची इंटर्नशीप जीएमआरव्दारे संनियंत्रित करण्यात येणाऱ्या विमानतळावर करावी लागते. अर्हता – ५५ टक्के गुणांसह कोणत्याही  विषयातील पदवी. राखीव संवर्गासाठी गुण मर्यादा- ५० टक्के. ३१ जुलै रोजी उमेदवांराचे कमाल वय २५ वर्षे. अभ्यासक्रमाच्या २०० जागा असून शासनाच्या नियमानुसार संबंधित संवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. अंतिम निवड समूह चर्चा आणि मुलाखतीव्दारे केली जाते.

काय शिकाल?

विमानतळाचे सुव्यवस्थित संनियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याचे तंत्र विद्यार्थ्यांनी अवगत करावे यासाठी पुढील विषय घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे – (१) पॅसेंजर फ्लो, (२) विमानाचे धावपट्टीवरील संनिंयत्रण/ हाताळणी, (३) उपकरणांची सुरक्षा प्रकिया, (४) उपकरणांची हाताळणी आणि देखभाल अहवाल, (५) सुरक्षेची जाणिव, (६) प्रवाशांच्या बॅगांची विविध उच्चतांत्रिक पडताळणी प्रणालीव्दारे हाताळणी, (७) प्रवेश/ शिरकाव नियंत्रण – लोक आणि वाहने, (८) प्रवाशांचा विमानातील प्रवेश, (९) सीसीटीव्ही संनियंत्रण, (१०) विशेष गरजा असणाऱ्या प्रवाशांचे संनियंत्रण आणि त्यांची देखभाल, (११) प्रवासी संनियंत्रण प्रकिया, (१२) चेक इन आणि डाक्युमेंटेशन (कागदपत्रे) प्रकिया, (१३) व्यवसाय विश्लेष, (१४) दर्जा सल्लामसलत, (१५) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, (१६) संसाधने आणि क्षमता नियोजन – लँडसाड/ एअरसाड, (१७) व्हिज्युएल डॉकिंग गायडंस सिस्टिम, (१८) फॅमिलायरेझन ऑफ टर्मिनल ऑपरेशन, (१९) नियामक संस्थांची भूमिका, (२०) हवाई उद्योगाची ओळख, (२१) अहवाल लेखन, व्यवसाय संवाद आणि हवाई उद्योगासाठी त्याचा उपयोग, (२२) संपर्क आणि संवादाची मुलभूत तत्वे, (२३) संपर्कातील अडथळे, (२४) शारीर भाषेचा उपयोग, (२५) कार्गो टर्मिनलचा उदय आणि उत्क्रांती, (२६) कार्गो टर्मिनल हाताळणाऱ्यांची (ऑपरेटर) भूमिका

इतर अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन एव्हिएशन सर्व्हिसेस ॲण्ड एअर कार्गो – हा कौशल्य निर्मितीस प्राधान्य देणारा अभ्यासक्रम आहे. अर्हता – कोणत्याही विषयातील १२ वी. ३१ जुलै रोजी कमाल वयोमर्यादा २१ वर्षे. या अभ्यासक्रमाला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या १२ वीमधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. अंतिम निवड ही मुलाखतीव्दारे केली जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी – तीन वर्षे. यामधील एक वर्षे एव्हिएशन कंपन्या किंवा कार्गो कंपन्यांमधील अप्रेंटिसशीपचे आहे. अप्रेंटिसशीपच्या कालावधीत दरमहा ९ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते.

संपर्क – राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी, फुरसतगंज, अमेठी, उत्तरपद्रेश- २२९३०२, संकेतस्थळ – rgnau.ac.in, ईमेल-info@ rgnau.ac.in