आमच्या कॉलनीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या झाडावर वर्षभर साम्राज्य असतं ते कावळ्यांचं. दिवसभर इकडून तिकडे उडून आले की ते या झाड्यांच्या फांद्यावर बसून कावकाव करतात. भूक लागली की पुन्हा उडतात. काही हुषार कावळे किचनच्या खिडकीजवळ येऊन आई-आजी-मावशीशी सलगी करतात. त्या खायला देतात. पाणी प्यायला देतात.
अशारितीने या झाडांवर कावळ्यांचं उत्तम चाललं असताना काही दिवसांपूर्वी हिरव्या रंगाचे ,लाल चुटूक चोच असलेले आणि झुबकेदार शेपटी असलेल्या पोपटांचं आगमन झालं. कावळ्यांच्या भाऊगर्दीत ते त्यांच्या वेगळया रंगामुळे आणि आकारामुळे चांगलेच उठून दिसू लागले. त्यामुळे सर्वांच्याच आकर्षणाचे विषय झाले. लहान मुलांना ते फार आवडले. मोठयांनी कौतुकांनी त्यांचे फोटो काढले.
०००
काहिंना शंका आली की कावळ्यांनी या पोपटांना हाकलून लावलं तर? पण तसं काही झालं नाही. कावळ्यांनी पोपटांकडे लक्ष दिलं किंवा पोपटांनी कावळ्यांकडे लक्ष दिलं नाही.
कावळे त्यांचं कार्य करत होते तर पोपट त्यांच्या विश्वात मग्न होते. कावळ्यांनी पोपटांच्या न्याहरी किंवा भोजन कार्यक्रमावर अतिक्रमण केलं नाही की त्यांच्याकडे जाऊन कावकाव केली नाही. काही दिवसांनी पोपटांची संख्या चांगलीच वाढली. त्यामुळे झाडांची शोभाही वाढली.
०००
कॉलनीत एके दिवशी सोसायटीची सभा झाली. कॉलनीतल्या झाडांवर पोपटांच्या आगमनाबद्दल सदस्यांनी आनंद व्यक्त केला. या बैठकीला माझी आजीही उपस्थित होती.
“झालं ते खूपच छान झालंय. असेच अनेक रंगीबेंरंगी पक्षीसुध्दा या झाडांवर येऊ शकतात. मात्र, काळुंद्र्या कावळ्यांच्या कलकलाटामुळे आणि गर्दिमुळे येत नसावेत. तेव्हा आपण कावळ्यांना हाकलून लावलं पाहिजे.” अशी चर्चा या बैठकित झाली.
“कावळ्यांना हाकलून तर बघाच तुम्ही. अरे, ते कॉलनीत आहेत म्हणून बरीच स्वच्छता असते. त्यांच्या कावकावीचा मोठा दिलासा मिळतो आम्हास. तुम्ही आणि तुमची मुलं आमच्याशी मोजकं आणि तोलून- मोजून बोलता. ते खिडकीजवळ येऊन कावकाव करतात. आम्ही काही बोललो तर ते ऐकतात. वारंवार बोलूनबोलून त्यांना आम्ही काय म्हणतो, हे कळायला लागलं असावं. ते आमचे खरे साथीदार. त्यांचा आधार वाटतो आम्हास. त्यांनी तुम्हास काही त्रास दिलाय का? पोपटांना त्रास दिलाय का? इतर पक्षांना येऊ नको म्हणून सांगितलं का? पोपटांचा आकार मोठा म्हणून तुम्हाला ते दिसले. पण बरेच छोटे-छोटे रंगीबेरंगी पक्षी झाडावर येतात. काही क्षण बसतात. पानं खातात नि जातात. त्यांना काही कावळयांनी हाकलून लावलं असं मला दिसलं नाही. कावळे त्यांच्या फांद्यावर राहतात. ते पोपटांकडे ढुंकूनही बघत नाही. कावळ्यांना एकाच जागेचा कंटाळा येत नाही. पोपटांना आज इथे राहावसं वाटतं, मात्र, उद्या तसं वाटेलच असं नाही. त्यांना एका ठिकाणी राहण्याचा कंटाळाच येत असावा. त्यामुळे याआधीही आलेले पोपट दोनतीन दिवसाच्यावर थांबले नाहीत. तुम्ही आता कावळ्यांना हाकलून लावलं तर पोपटही पळून जातील आणि इतर पक्षीही येणार नाहीत. कावळयांच्या कावकावीशिवाय कॉलनी ओकीबोकी होईलच पण झाडंही दु:खी झाले तर…त्या दु:खातच या झाडांचं बरं वाईट झालं तर…”आजी या बैठकीत भरभरुन बोलली.
“झाडांचं बरं-वाईट म्हणजे गं? अध्यक्षांनी आजीस विचारलं..
“बरं वाईट म्हणजे, अरे, आपल्याला जसा एकमेकांना लळा लागलेला असतो तसा झाडांनाही या कावळ्यांच्या स्पर्शाचा लळा लागलेला असलेच की नाही. झाडांवरचे पक्षी हे त्यांचं टॉनिक असू शकतं. ते तुम्ही काढलं तर त्यांचं काय होईल ते तुम्हीच ठरवा.” आजी म्हणाली.
आजीची ही मात्र अचुक लागू पडली.
ज्येष्ठ मंडळींना बरंच कळतं. आपल्याला कुठे वेळ आहे, एवढं सगळं जाणून घेण्याचा. तेव्हा आजीच्या म्हणण्यानुसार आपण काही कावळ्यांना हाकलून लावायचं नाही. ते राहिले काय किंवा नाही काय? अशी बैठकीत चर्चा झाली.
त्यानंतर कावळयांना हाकलून देण्याचा कार्यक्रम काही कॉलनीत कुणी घेतला नाही. चार दिवस नव्हाळीचे संपल्यावर पोपटांची टोळी अचानक एके दिवशी गायब झाली.
या झाडांवर नंतर असेच कधीतरी पोपट, घारी, नावही माहीत नसणारे रंगीबेरंगी पक्षी ,खारुताई येत राहिले आणि जात राहिले. आमच्या हक्काच्या घरी कां आलात, म्हणून कावळ्यांनी आकांडतांडव केल्याचं कुणाला दिसलं नाही.
कॉलनीतल्या आजी- आया-मावशा सर्वजण कावळ्यांच्या कावकावित आनंदानुभव घेत राहिले….घेत आहेत….
सुरेश वांदिले