“ मी नाम्या!
मी खूप भाग्यवान समजते स्वत:ला. कारण, अगदी लहानपणीच माझ्या हातात स्मार्टफोन आला. तसा तो,आजकाल बहुतेक सर्वच मुलांच्या हाती येतो म्हणा. या स्मार्टफोनचं मला वेड लागलं. त्यातले गेम्स मी, तासनतास खेळत बसायचे. असं खेळता खेळता मला, “माइनक्रॅफ्ट”, हा खेळ गवसला. त्यात मी दिवसेंदिवस रंगून जाई.
मी स्वत:ला भाग्यवान याचसाठी म्हंटलं की, माझ्या आईबाबांनी या मोबाइल वेडाला हाटहूट केलं नाही की माझ्या हातून मोबाइल हिसकावून घेतला नाही. त्यामुळे मला अगदी मोकळेपणानं, ‘माइनक्रॅफ्ट’वर लक्ष केंद्रित करता आलं. तेव्हा मी होते ५ वीत. ९ वर्षाची गोडुली, आईबाबांची लाडुली!
मी लाडुली झाले कारण, ज्या माइनक्रॅफ्टने मला वेड लावलं, तो डिजिटल खेळ, अभ्यासातील कोणताही विषय समजण्यासाठी उपयोगी पडू शकतो, हे माझ्या लक्षात आलं. केवळ लक्षात आलं असं नव्हे, तर मी या ‘माइनक्रॅफ्ट’चा उपयोग करुन लिखीत शब्दांमध्ये असलेला अभ्यासाचा विषय खेळाव्दारे समजावून सांगू लागले. मोबाइलचं हे वेडं असं मला ज्ञानवर्धक करुन गेलं.
सध्या मी आहे, १२ वीत. लुधियानातील, सत पॉल मित्तल शाळेत शिकते. अर्थातच गणित हा माझा आवडता विषय! ‘माइनक्रॅफ्ट’ खेळातील माझी गती आणि विविध विषय समजावून घेण्यासाठी करत असलेला त्याचा वापर बघून, मायक्रोसॉक्ट कंपनीने मला, ‘माइनक्रॅफ्ट स्टुटंड ॲम्बॉसिडर (विद्यार्थी सदिच्छा दूत)’ म्हणून सामील करुन घेतलय. विद्यार्थ्याला कोणताही विषयघटक कठीण वाटत असल्यास किंवा समजत नसल्यास, मी, ‘माइनक्रॅफ्ट’चा उपयोग करुन, तो घटक खेळाच्या स्वरुपात समजावून देते. आतापर्यंत मी, असे ५०० मॉड्युल्स आणि ट्युटोरिअल्स तयार केले असून ते सगळे इंटरनेटवर बघता येतात. असे १०० व्हीडियो मी ऑनलाइन टाकले आहेत.
करोनातील टाळेबंदिच्या काळात, मी संगणकाची, पॉयथान आणि इतर भाषा शिकायला लागले. मी ॲबॉड क्रिएटिव्ह एज्युकेटर सर्टिफिकेशनचे एक आणि दोन प्रमाणपत्र प्रशिक्षण प्राप्त करणारी पहिली व्यक्ती ठरले. त्यामुळे मला ‘ट्रडसेटर’ असा बिल्ला (बॅज)दिला गेला. मग, कोडिंगने भारावून टाकल्यानं, माझं सुरु झालं कोडिंग एके कोडिंग. या नव्या वेडाचा मला फायदाच झाला. ‘माइनक्रॅफ्ट’च्या मदतीने मी कोडिंग शिकवू शकते, याचा मला आत्मविश्वास आला. मग काय, शिकवू लागले की, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि ज्याला ज्याला कोडिंग कठीण वाटत असेल, त्या सर्वांनाच.
माझं शिकवणं आवडल्यानं, माझ्या शाळेच्या प्राचार्यांनी शाळेतील चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांना, ‘माइनक्रॅफ्ट’, शिकवण्याची संधी दिली. तेव्हा मी अवघी ११ वर्षाची होते. तुम्हाला म्हणून सांगते. लहान तोंडी मोठा घास समजून नका हं, प्लिज! कारण शिक्षकांनीसुध्दा, कोडिंगसाठी मला, त्यांचा गुरु केलं. माझ्या शाळेतील शिक्षकांना तर, मी एका महिन्यात प्रशिक्षित केलं.
हे आपणास, उत्तम जमतं असं लक्षात आल्यावर, मग मी माझं ध्येयवाक्य ठरवलं, “इच वन, टिच टेन.” बघता बघता गेल्या सहा वर्षात मी १५ हजार व्यक्तींना मोफत कोडिंग प्रशिक्षण दिलं. त्यासाठी मेककोड, पायथॉन, स्काइप, टीम्स, झूम आणि गुगल मीट, यासारख्या तंत्राचा उपयोग केला. यामध्ये ५ हजाराहून अधिक शिक्षकच होते. अर्थातच माझा अधिकाधिक भर मुलींवर असतो, हे विशेषत्वांनं सांगावसं वाटतं.
विज्ञान (एस-सायंस), तंत्रज्ञान (टे-टेक्नॉलॉजी), अभियांत्रकी (इ-इंजिनीअरिंग) आणि गणित (एम-मॅथेमॅटिक्स) म्हणजेच, ‘स्टेम’ गटातील मुलींचा एक कोडिंग क्लब, मी तयार केलाय. यात १०० मुली आहेत. इतर मुलामुलींनासुध्दा असे कोडिंग क्लब सुरु करण्यासाठी मी मदत करते. डिजिटल गेम आणि ‘स्टेम’ तत्वज्ञान एकत्र करुन करुन मी हवामान बदल, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि लैंगिक असामनता यावर समाजमाध्यमातून जनजागृती करायला लागले. समाजमाध्यमावरचा माझा, वावर अनेकांच्या लक्षात आला. त्यामुळे बऱ्याच विज्ञापीठांमध्ये आणि इतर शाळांमध्येही ‘माइनक्रॅफ्ट’, शिकवण्यासाठी मला बोलवण्यात येऊ लागलं.
‘इच वन,टीच टेन’, यावर माझा विश्वास असल्यानं, ते मी सिध्द करुन दाखवलं. याचा लाभ केवळ भारतीयानांच नव्हे तर जगभरात कित्येकांना झाला. हा माझा प्रवास मी मग, “इच वन,टीच टेन,जर्नी कंटिन्युअस”, या पुस्तकरुपानं शब्दबध्द केला. हे पुस्तक लिहिण्यासाठी मला दीड वर्षं लागलं. हे पुस्तक ॲमेझॉनवर मिळतं बर का? ते तुम्ही अवश्य वाचा नि, ‘प्रत्येक व्यक्ती,दहास शिकवी’,या मोहिमेत सहभागी व्हा.
आपण, असं काही आगळंवेगळं केलं की, पुरस्कार आणि बक्षीसंसुध्दा आपल्या दिशेने येऊ लागतात. वार्के फाउंडेशनच्या, ग्लोबल स्टुडंट फायनालिस्टच्या पहिल्या ५० मध्ये, माझा क्रमांक लागला. न्युयार्क ॲकॅडेमी ऑफ सायंसची, सर्वात तरुण सदस्य म्हणून माझी निवड झाली आणि ‘१०००गर्ल्स फ्युचर’, या मोहिमेत मला सामील केलं गेलं. २०२२ मध्ये, कॅनेडाच्या, द कोबलस्टोन कलेक्टिव्ह संस्थेने घेतलेल्या, माइनक्रॅफ्ट एज्युकेशन एडिशन अर्थ डे, या स्पर्धेची मी विजेता ठरली. २०२३ साली, मी ग्लोबल स्टुडंट प्राईज, या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मला भेटला. २०२१ साली “डायना” पुरस्कार मिळाला. २०१८ साली, युनेस्को वर्ल्ड युथ मल्टिमीडिया कॉम्पिटिशनमध्ये मला यश मिळालं. या स्पर्धेत मी, माइनक्रॅफ्टमधील धड्यांचं आभासी वाचनालय तयार केलं. २०२४ च्या जानेवारी महिन्यात, ‘बेट युनायटेड किंगडम एडटेक कॉन्फरंस’मध्ये, प्रमुख वक्ता म्हणून मला निमंत्रित केलं गेलं. या ठिकाणी ३० हजार शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले.
डिजिटल प्लॅटफॉर्मचा असा सुंदर उपयोग करत असल्याचं बघून, माझ्या आईबाबांचा उर अभिमानाने भरुन येतो. त्यांनी मला लहानपणापासून पाठिंबा दिला. मोबाइल गेमिंगध्येच मी सदैव गुंतलेली असते, यासाठी मला न रागवता त्यांनी, गेमिंगचं वेड माझ्यासाठी कसं फायदेशीर ठरेल, माझा विकास कसा होईल, माझ्या ज्ञानात कशी वाढ होईल हे बघितलं. माझं आईबाबा दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. म्हणजे ते स्वत: खूप खूप व्यग्र. पण म्हणून काही त्यांनी, माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. माझ्यासाठी बरोबर वेळ काढून मला मार्गदर्शन केलं.
आपलं वेड, हे व्यसन होऊ न देता, ते सकारात्मकपणे वापरल्यास, खूप छान छान गोष्टी आपल्या जीवनात साध्य होतात, पटलय ना तुम्हाला.
कोणत्याही गोष्टीमध्ये तात्पर्य असतं. तर माझ्या गोष्टीमध्ये दोघांसाठी तात्पर्य आहे. एक म्हणजे पालकांसाठी. त्यांनी जर मुलांसाठी वेळ काढला आणि मुलं नेमकं काय करताहेत, हे बघून मार्गदर्शन केलं, समजावलं तर कोणतही, स्मार्ट गॅजेट् हे मुलांसाठी उपयुक्तच ठरु शकतं.
दुसरं तात्पर्य मुलांसाठी. आपण अलिबाबाच्या गुहेची कथा ऐकतो नि वाचतो. त्या गुहेत प्रचंड धनसंपत्ती होती म्हणे. ही गुहा गोष्टीतली. त्यामुळे त्यात कल्पनेनंच जावं लागतं. मात्र मोबाइल ही खरीखुरी अलिबाबाची गुहा. तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी या गुहेत शिरलात तर तुम्ही ज्ञानसंपन्न होऊ शकता. ही संपन्नता कोणत्याही धनापेक्षा मेाठी आणि श्रेष्ठ असते.
तर मी नाम्या!
नाम्या जोशी! हल्ली मुक्काम लुधियाना.”
सुरेश वांदिले