कुणाला डॉक्टर व्हायचं, कुणाला इंजिनीअर तर कुणाला ॲक्टर होण्याचं स्वप्न असतं. पण त्याचं स्वप्न इतरांपेक्षा जरा वेगळच. त्याला भारतातल्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दहा हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरित करायचय. कशासाठी? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर तो स्वत: पर्यावरण योध्दा म्हणा किंवा कार्यकर्ता आहे. त्याला या दहा हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण योध्दा होण्यासाठी प्रेरित करायचय. शिवाय यातील प्रत्येकानं प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना प्रेरित करावं अशी त्याची इच्छा आहे. अशा प्रकारे, तो भारतात पुढील काही वर्षात एक लाख पर्यावरण योध्दे निर्माण करु इच्छितो.
अवतीभवतीच्या परिसरातील चाललेली वृक्षतोड, ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण याने पर्यावरणाची हानी होत असल्याचं, सगळेच बघतात. पण त्यानंतर मात्र आपल्याला काय त्याचं, असं समजून तिकडे दुर्लक्ष करतात. पण, तो मात्र लहानपणासापासून म्हणजेच सहाव्या वर्षापासूनच पर्यावरण रक्षणासाठी झटतोय. इंग्लंडचे श्रेष्ठ कवी लॉर्ड बायरन म्हणत, ‘शाईचा एक थेंब लाखो लोकांना विचार करायला लावू शकतो’. लॉर्ड बायरनचे हे कथन त्याचे प्रेरणास्त्रोत आहे. यामुळे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी त्याने लिखाणाचा मार्ग स्वीकारलाय. आठ वर्षाचा असताना त्याने ‘कार्तिक ॲण्ड मिक्सी -जर्नी ॲबाऊट क्रिएशन’ हे पहिले पुस्तक लिहिले. आतापर्यंत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनावर, त्याची ११ पुस्तके इंग्रजीत प्रकाशित झाली आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत मोहिमे’तून त्याला लिखानाची प्रेरणा मिळाली. प्रारंभी त्याने ‘जादूची कचारा पेटी’ ही कथा लिहिली. त्यानंतर वृक्षे, जादुच्या बिया, जलप्रदुषण अशा विषयांवर कथा लिहिल्या.
कोविडच्या काळात त्याला प्लॅस्टिक प्रदूषणामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर होत असलेल्या परिणामांची माहिती मिळाली. तेव्हा त्याने स्वत:पुरता प्लॅस्टिकचा वापर थांबवला. आपल्या मित्रांनांही त्याने तसं करण्यासाठी प्रेरित केलं. त्याच्या या प्रयत्नांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात येऊन त्याला वयाच्या ११ व्या वर्षी, “युनायेटेड नेशन्स एनव्हिराँन्मेंट प्रोग्रॅम टाइड टर्नर प्लॅस्टिक चॅम्पियन,” पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
आपल्या बरोबरीच्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धानाबद्दल अजिबातच जाणिवजागृती नसल्याचं त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ‘कार्तिक, डॅडी ॲण्ड प्लॅस्टिक- अ जर्नी अबाऊट बिटिंग प्लॅस्टिक पोल्यूशन’ आणि ‘कार्तिक, मिक्सी ॲण्ड मॉन्स्टर- अ जर्नी अबाऊट बिटिंग ओशन पोल्यूशन” ही दोन ई कॉमिक्स तयार केली.
‘कार्तिक, मिक्सी ॲण्ड क्लॉयमेट चेंज’ या आपल्या सातव्या पुस्तकात हवामान बदलाच्या परिणामावर मात करण्यासाठीची गोष्ट त्याने रचली. हे पुस्तक वाचून संपवल्यानंतर प्रत्येक वाचकाने एकतरी वृक्ष लागवड करावी, असं आवाहन त्याने केलं. या पुस्तकासोबत कडूनिबांच्या झाडाच्या बियाचं पॅकेट दिलं जायचं. हे पुस्तक वाचल्यानंतर एखाद्याने ते दुसऱ्याला वाचायला दिलं तर त्यानेही कडुनिंबाच्या झाडाच्या बियांचं पॅकेट द्यायला हवं असं त्याचं सांगणं होतं.
लिखानशिवाय तो विद्यार्थ्यांसाठी सगळीकडे जाऊन पर्यावरण संवर्धन कार्यशाळा घेतो. अनाथालयात जाऊन तेथील मुलांना मार्गदर्शन करतो.
असा हा कर्णव रस्तोगी. वय वर्षे १६. हल्ली मुक्काम मुंबई.
सुरेश वांदिले