
नागपूरमधील एक लग्नसोहळा आटोपून तेजोमयी आणि आईबाबा मुंबईकडे विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये मुंबईलाच राहणारे एक काका- काकू आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती.
काही वेळेपर्यंत कुणीही कुणाशी बोललं नाही. सगळेजण मोबाइलरुपी डिजिटल वाळूत डोकं खुपसून बसणारे शहामृगच वाटत होते. या कल्पनेने तेजोमयीस हसू आलं. या शहामृगांची मान दुखण्यापूर्वीच आपण त्यांना बोलत केलं पाहिजे असं तिला वाटलं. तिने हाय-हॅलो करुन काका-काकू आणि ताईची ओळख करुन घेतली. सगळ्यांचं अवघडलेपण दूर झालं. त्या काकांनी तेजोमयीचं कौतुक केलं.
“छोटी मुलं किती सहजतेनं संवाद साधू शकतात, आपण मोठ्यांना कां बरं जमत नसेल हो?” ते बाबांना म्हणाले.
“कारण आपण मोठे्ठे आहोत ना…” तेजोमयीचे बाबा हसून म्हणाले.
“आणि मठ्ठसुध्दा!” आईच्या या मिश्लिक प्रतिक्रियेने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं.
“खरं तर मोठ्ठ्यांचं नाव मोठं नि लक्षण व दर्शनही खोटं, असतं.” काकूही बोलून गेल्या. सगळेजण पुन्हा खुदकन हसले.
अशा गंमतीजमतीत वेळ कसा जात होता, हे कुणालाही कळलं नाही. आठच्या सुमारास बडनेरा स्टेशन आलं. सगळ्यांनी जेवायचं ठरवलं. दोन्ही कुटुंबांनी आपआपले डबे काढले. प्लेटा काढल्या. एकमेकांना स्वत:कडचे खायचे पदार्थ दिले. एक छोटीशी डब्बा पार्टिच तिथे साजरी झाली.
हसत खिदळत, गप्पा करत खाणं सुरु असताना त्या कंपार्टमेंटमध्ये झुरळासारखे दिसणारे काही छोटे छोटे किटक कसे कुठून आले कुणास ठाऊक? त्यांना बघताच आई आणि काकूंनी “ई” केलं. बाबा आणि काकांनी बघून न बघितल्यासारखं केलं. ताई तिच्या मोबाइलमध्येच डोकं खुपसून बसली होती.
या किटकांना हाकलायचं कसं, याचा विचार तेजोमयी करु लागली. असं जेवताना किटकांचं तिथे प्रगट होणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. त्यामुळे रिकाम्या पेपरप्लेटने ती त्या किटकांना हाकलायचा प्रयत्न करु लागली. तिच्या या प्रयत्नांना थोडं यश आलं. कारण त्या तीन किटकांपैकी दोन पळून गेले. पण तिसरा किटक मात्र फार बिलंदर निघाला. तो काही तेजोमयीच्या हाकलण्याला दाद देईना. कधी या फटितून घसू, तर त्यातून शीर, तर कधी सुटकेसच्या आडोशाला लप, मध्येच डोकं काढून वेडावल्यासारखं कर, असं त्याचं चाललं होतं.
इतका प्रयत्न करुनही तो पळून जात नसल्याचं बघून तेजोमयी वैतागली. अधूनमधून मोबाइलमधून डोके वर काढून ताई, तेजोमयीची तारांबळ बघत होती.
“अगं, त्याला हाकलण्यासाठी एव्हढा जीवाचा आटापिटा कां करतेस?”
“अगं ताई, हा इटुकला किटूकला इथून जात नाहीयना.”
“जात नसेल तर मारुन टाकना त्याला. सोप्पय ते.” ताई सहजतेनं म्हणाली. तेजोमयीने तिच्याकडे चमकून बघितलं.
“मारुन टाक म्हणजे?”
“हे बघ…” असं म्हणत ताईने त्या किटकाला आपल्या चपलेनं चिरडून टाकलं.
“अगं ताई, हा किटक मेला की?” तेजामयी घाबरुन म्हणाली.
“मरु देना. नाहीतरी त्याचा काय उपयोग?” ताई अगदी सहज बोलून गेली. तिने पुन्हा मोबाइलमध्ये तोंड खुपसलं.
एखाद्याचा उपयोग नाही म्हणून त्याला मारुनच टाकायचं का? तेजोमयीला प्रश्न पडला. किटकाचा आपल्याला उपयोग नसेल म्हणून काय झालं? पण निसर्गानं त्याला जन्माला घातलं ते उगाच का? उद्या निसर्गातल्या प्राण्यानांही, मानवाचा काय उपयोग असच वाटून, त्यांनी हाच न्याय लावला तर? तेजोमयीच्या मनात हा विचार आला. या विचाराने ती शहारली.
तिने आई- बाबा-काका-कांकूकडे बघितलं. ताईने किटकाला चिरडलं, याचं त्यांना काहीही वाटलं नव्हतं. जणू काही घडलचं नाही, इतकं त्यांनी किटकाच्या चिरडण्याकडे दुर्लक्ष केलं. बाबा आणि काका, पर्यावरण रक्षण की असचं काहीतरी यावर आणि आई व काकू, कोणत्यातरी मालिकेतील सासूबाई, सूनबाईंना कशी त्रास देते, अशा सारख्या गप्पांमध्ये रममाण झाले होते.
मोठी माणसं, ‘जीवो जीवस्य जीवनम्’ म्हणजे ‘जगा आणि जगू द्या,’ असं तोंडदेखलंच म्हणतात, तेसुध्दा केवळ मनुषप्राण्यांसाठीच. इतर पशुपक्षी, किटक मेले काय? चिरडले काय? याचं त्यांना काहीही सोयरसुतक नसतं, याची तिला खात्री पटली.
तिचे डोळे पाणावले. तिने तो मेलेला किटक, काळजीपूर्वक पेपरच्या तुकड्याने उचलला. मनातल्या मनात त्याला सॉरी म्हणत, तो कागद हळूच तिने कम्पार्टमेंटच्या बाहेर जाऊन दारातून बाहेर टाकला.
सुरेश वांदिले