(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

त्याचं असं झालं, एकदा तिच्या बाबांनी तिला गोल्फ कोर्स (मैदान)वर फिरायला नेलं. ती तेव्हा ३ वर्षे १० महिन्यांची होती. पहिल्याच क्षणी तिला या खेळात रस वाटला. त्यानंतर तिचे बाबा तिला जेव्हाजेव्हा कोर्सवर घेऊन जात, तेव्हा‍ तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असल्याचं त्यांनी हेरलं. त्यांनी तिच्या हातात गोल्फ स्टिक दिली.

या वयात मुलांच्या हातात खुळखुळ्यासारखी खेळणी असतात. जेव्हा मुलं भातुकलीच्या खेळात रमलेली असतात तेव्हा ती गोल्फच्या कोर्सवर रमू लागली. गोल्फसाठी आवश्यक असणारी तीक्ष्ण नजर आणि हाताची हालचाल तिच्याकडे विलक्षण असल्याचे तिचे सुरुवातीचे प्रशिक्षक नाथन सुंदरम यांनी बरोबर टिपलं. तिच्या लहान वयामुळे ते तिला शिकवायला प्रांरभी साशंक होते. पण तिच्याकडे असणाऱ्या डोळे आणि हाताच्या अत्युकृष्ट समन्वयातून तिची वेगळी प्रतिभा त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तिला प्रशिक्षित करायचं ठरवलं. गुरुंचा विश्वास तिने सार्थ ठरवला. वयाच्या सहाव्या वर्षीच तिने पहिली स्पर्धा जिंकली. तिच्या बाबांनी नंतर तिला इंग्लंडमधील लॉरेन्स ब्रदरग्रिज या मोठ्या गोल्फ प्रशिक्षकाकडे पुढील प्रशिक्षणासाठी पाठवलं. चार वर्षे तिने लॉरेन्सकडे गोल्फचे धडे गिरवले. हे प्रशिक्षण, कठोर परीश्रम, अत्यंत शिस्तबध्द दिनक्रम आणि अंगभूत कौशल्यामुळे ती गोल्फच्या क्षेत्रात एखाद्या ताऱ्यासारखी प्रकाशमान झाली.

२०२३ साली तिची निवड चीनमधील आशियाई क्रीडास्पर्धेसाठी भारतीय गोल्फ संघात झाली. त्यावेळी तिचं वय होतं १७ वर्षे. गोल्फ संघातील ती सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली. अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील जगातील प्रतिष्ठित  ‘ऑगस्टा नॅशनल वुमेन्स’ स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली हौशी (ॲम्यॅच्युर) भारतीय ठरली.

फेब्रुवारी २०२१ मध्ये तिने मुंबई येथे ‘हिरो वुमेन्स प्रोफेशनल गोल्फ टूर’ ही पहिली व्यावसायिक स्पर्धा जिंकली. अशाप्रकारे तिच्या यशाची घोडदौड सुरु झाली. एकापोठाएक अशा स्पर्धा जिंकू लागली. याच वर्षी तिने ऑक्टोबरमध्ये पंचकुला येथे दुसरी ‘हिरो वुमेन्स प्रोफेशनल गोल्फ टूर’ ‍जिंकली. लागोपाठ ‘अखिल भारतीय महिला स्पर्धा’ आणि हौशी स्पर्धेवर नाव कोरले. अबुधाबी येथे ‘वुमेन्स ॲमेच्युर एशिआ पॅसिफिक गोल्फ’ स्पर्धेतही यश मिळवले. २०२२ मध्ये तिसऱ्यांदा  ‘हिरो वुमेन्स प्रोफेशनल गोल्फ टूर’ स्पर्धा जिंकली. ३६ व्या राष्ट्रीय‍ क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकासह सांघिक सुवर्ण पदकही जिंकले. फेब्रुवारी २०२३ मध्ये फिलिपाइन्समध्ये ‘क्वीन सिरिकिट कप’ स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. यात भारतीय चमू दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर तिने वयैक्तिक स्पर्धा जिंकली. सप्‍टेबर २०२३ मध्ये स्वीडनमधील ‘ॲहलसेल’ स्पर्धा जिंकली.  हा पराक्रम गाजवणारी ती पहिली भारतीय  ठरली. २०२४ मध्ये तिने ‘लेडिज युरोपिअन टूर’मध्ये पूर्णपणे व्यावसायिक‍ गोल्फ खेळाडू म्हणून सहभाग घेतला. २०२० मध्ये ‘प्रेस्टिज ज्युनिअर ॲण्ड ॲम्यॅच्यूर चॅलेंज’, २०२१ मध्ये ‘आयजीयू ऑल इंडिया लेडीज ॲम्यॅचूर लेडिज चॅम्पियनशीप’, २०२२ मध्ये ‘आयजीयू तेलंगणा लेडीज ॲण्ड ज्युनिअर गर्ल्स गोल्फ चॅम्पियनशीप’ अशा अनेक स्पर्धां तिने जिंकल्या. आता तर ती भारतातील सर्वोत्कृष्ट गोल्फर म्हणून ओळखली जाते.

तर अशी अवनी प्रशांथ, वय वर्षे १९. हल्ली मुक्काम बेंगळुरू !

सुरेश वांदिले