कॉर्पोरेटमधील बॉसेस, चित्रपट, टीव्ही किंवा इतर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती, विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती आपल्या इमेज म्हणजे व्यक्तित्वाच्या सादरीकरणाकडे खूप लक्ष देतात. अशा व्यक्तींचे पोशाख, त्यावरील ॲक्सेसरीज (उदा.- टाय, स्कार्फ, बटन्स इत्यादी), आभुषणे, हेअरस्टाईल, पादत्राणे अशासारख्या बाबींचा सखोल विचार करुन त्यांची तयारी करुन दिली जाते. यासाठी पर्सनल स्टायलिस्ट आणि इमेज कंसल्टटंन्टची सेवा घेतली जाते. अशा वलयांकित व्यक्ती विविध माध्यमांच्या प्रकाशझोतात असल्यानं वा त्यांना तसं राहणं आवडत असल्यानं वा त्यांच्या व्यवसायाची तशी गरज असल्यानं, अशांना सदैव टापटिप आणि आणि वैशिष्ट्यूपर्ण पध्दतीनेच स्वत:चं सादरीकरण करावं लागतं. दक्षिणेतील काही हिरोमंडळी माध्यमांसमोर जाताना किंवा बऱ्याच कार्यक्रमात, तुम्हीआम्ही घरात जी चप्पल घालतो, तशी चप्पल सहजतेने घालून वावरतात. त्यांच्या या साधेपणाचं कौतुक होतं. अशी साधी चप्पल घालणं हा त्यांच्या इमेज बिल्डिंगचा आणि स्टायलिंगचा भाग असतो.
साधी राहणी उच्च विचारसरणी हे तत्व सांगण्यासाठी योग्य असलं तरी वलयांकित व्यक्तींच्या साध्या राहणीचंही काळजीपूर्वक डिझाइन केलं जातं. त्यामुळे या अभ्यासक्रमामध्ये व्यक्तीचा रंग, शरीराचा आकार, चेहऱ्याचा आकार, त्वचा आदी बाबी लक्षात घेऊन त्यांचं स्टायलिंग केलं जातं. त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशा पोशाखांचे डिझाइन केलं जातं. त्यासाठी स्पेशलाइज्ड शॉपिंगचं कौशल्य, हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. संवादकौशल्य, माध्यमांसमोरचं सादरीकरण, रिल्स, इन्टाग्रॉम या सोशल मीडियावरील उपस्थिती या बाबींही विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात.
संबंधित वलयांकित व्यक्ती कोणत्या समारंभ, कार्यक्रमाला जाणार, हे लक्षात घेऊन त्यांच्या स्टायलिंगची तयारी करावी लागते. त्याच्या आवडीनिवडी आणि समारंभाचं स्वरुप लक्षात घेऊन पोशाखासाठी कापड शोधणं, पोशाखाचं स्वरुप ठरवणं, ते वेळेवर शिवून घेणं, या बाबीही पर्सनल स्टायलिस्टला कराव्या लागतात. वलयांकित व्यक्तीला शोभेल अशा चेहरा आणि केसांचा मेकअप, रंगसंगतीचं तंत्र, त्वचेची देखभाल, या बाबींचा विचार करावा लागत असल्याने मेकअप आणि केस स्टायलिंगसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्य आणि साधनांचा वापर शिकवला जातो. व्यक्तीचा प्रभावी पर्सनल ब्रॅंड कसा तयार होईल याकडे स्टायलिस्ट आणि इमेज कंसल्टटंटला काळजीपूर्वक लक्ष पुरवावं लागतं. हा ब्रँड ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पध्दतीने त्याला तयार करावा लागतो. कॉम्प्युटर एडेड डिझाइन या तंत्र कौशल्याला शिकावं लागतं.
०००
क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, या संस्थेने, सहा महिने कालावधीचा, ‘हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात समकालीन फॅशनच्या संकल्पना, छायाचित्रणाचे तंत्र, सादरणीकरण तंत्र,पोषाखांचा कल, हेअर आणि मेकअप तंत्र, साहित्याची उपलब्धता, मॉडेल कास्टिंग आदी बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. फॅशन स्टायलिंग आणि प्रतिमा संवर्धन कंपन्यांमध्ये करिअरची संधी मिळू शकते. भविष्यात स्वतंत्ररीत्या कार्य करता येणं शक्य होतं.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॅम्पस, प्लॉट नंबर १५,सेक्टर ४, खारघर, नवी मंबई ४१० २१०, दूरध्वनी-०२२-२७७४७०००, ईमेल-nift.mumbai@ nift.ac.in ,संकेतस्थळ-https://ww.nift.ac.in/mumbai
०००
फॅशन ॲण्ड सिलिब्रेटी मेकअप
वलयांकित व्यक्तींच्या मेकअपसाठी प्रशिक्षित व्यक्तींची नेहमीच गरज भासू शकते. मेकअप आर्टिस्ट, हा संबंधित वलयांकित व्यक्तीच्या व्यावसायिक प्रवासाचा प्रमुख भागिदार ठरतो. अशा व्यक्तींची जी टीम असते, त्यात त्याचा प्रामुख्याने समावेश असतो.
याक्षेत्राशी सबंधित अभ्यासक्रमामध्ये हेअर स्टायलिंग, मेकअप, त्वचेच्या काळजीसाठी आवश्यक असणारं तंत्र, कौशल्य, साहित्य याचं ज्ञान प्रज्ञान केलं जातं. वेगवेगळी चेहरेपट्टी, त्वचेचा रंग याबी लक्षात घेऊन मेकअक करण्याचं तंत्र शिकवलं जातं. याच अभ्यासक्रमात ब्रायडल मेकअपसाठी लागणारं कौशल्य, साहित्य, आणि साधनं, यांचीही माहिती दिली जाते.
वेगवेगळया कार्यक्रमांच्या स्वरुपानुसार मेकअप आणि हेअर मेकअपची दिशा कशी ठरवायची याचं प्रात्यक्षिक दिलं जातं. यासाठी वेगवेगळया वलयांकित व्यक्तींनी, वेगवेगळया कार्यक्रम, समारंभ यामध्ये कसे आणि कोणते मेकअप केले, हेअरस्टाइल केली याचा अभ्यास (केस स्टडीज) करण्यास सांगण्यात येते.
ब्रायडल मेकअप करताना कोणत्या सांस्कृतिक बाबी लक्षात घ्याव्या लागतात याचे प्रशिक्षण दिलं जातं. चित्रपट, टीव्ही मालिका, ओटीपी, नाटक, माध्यमे यांच्यातील एखाद्या पात्राला आवश्यक असणारं मेकअप आणि हेअरस्टायलिंगचं तंत्र आणि कौशल्य शिकवलं जातं. त्यासाठी काही स्पेशल इफेक्टस असतात, त्याचही ज्ञान प्रदान केलं जातं.
ग्राहकाचं व्यक्तिमत्व लक्षात घेऊन त्याचे व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसेल यासाठीचं प्रगत हेअर डिझायनिंगचं तंत्र शिकवलं जातं. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना त्यांचं कौशल्य, अनुभव आणि सर्जनीशलता लक्षात घेऊन उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. काही मेकअप आर्टिस्ट पुढे स्वत:च वलयांकित बनतात.
०००
गेम डिझायनिंग
या क्षेत्रातील कौशल्य आणि तंत्र प्राप्तीसाठी अभ्यासक्रमामध्ये पुढील विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे. (१) बेसिक लायटिंग, (२) बेसिक ब्ल्यू प्रिंट, (३) साहित्य, (४) लँडस्केप टूल्स, (५) कॅमेरा आणि निर्मितीनंतरची प्रकिया ,(६) गेमिंग कलेसाठी संकल्पांची स्पष्टता, (७) संकल्पना कलाकाराची जबाबदारी आणि भूमिका, (८) फोटोशॉपचं तंत्र, (९) भव्य पर्यावरणीय निर्मिती ते लहान बाबींचे डिझाइन, (१०) रेखांकनाचं तंत्र, (११) गेमसाठीच्या कल्पना आणि स्टाइलची निर्मिती, (१२) मेटॅह्युमन्स, (१२) ॲडव्हान्स्ड अनरिअल इंजिन, (१३) अनरिअल इंजिनमधील स्पेशल इफेक्ट्स, (१४) व्हर्च्युअल रिॲलिटीचा उपयोग, (१५) बहुविध खेळाडूंसाठी मूलभूत तत्वे, (१६) बहुपातळीय खेळाडूंसाठी चाळणी, (१७) मेटॅव्हर्स डिझाइनचे प्रमुख तत्वे, (१८) मेटॅव्हर्स पर्यावरणाची निर्मिती, (१९) मेटॅव्हर्स डिझाइन प्रकल्प, (२०) मेटॅव्हर्स प्रकल्पाची चाळणी आणि परीक्षण.
सुरेश वांदिले