(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयी ज्या सोसायटित राहते, त्या सोसायटीच्या आसपास असलेल्या इतर इमारतींच्या अवतीभवती बरीच झाडं होती. कदाचित ती खूप वर्षापासून तिथेच असावी. त्या झाडांवर विविध रंगाचे पक्षी येत जात, कधी या फांदिवर बस तर कधी त्या फांदिवर उडून जा, कधी पानांमध्ये मान खूपस तर कधी आपल्या छोट्या पिल्यांच्या या फांदिवरुन त्या फांदिवर उड्डाणाकडे कौतुकाने बघ, अशी या पक्षांची दिनचर्या असायची. पहाटे-पहाटे या पक्षांच्या वेगवेगळया आवाजांनी आसमंत भारुन जायचा. या झाडांनी पक्षांना आसरा दिला तर या पक्षांनी संपूर्ण परिसराला जिवंतपणा आणला.

मात्र, या वृक्षांना कुणाची तरी नजर लागली असावी. या परिसरातील सोसायट्यांचा पुनर्विकास सुरु झाला नि या कामासाठी झाडे तोडली जाऊ लागली. परिसर ओकाबोका होऊ लागला. पक्षांचं जाणंयेणं कमी झालं. किलबिलाट कमी झाला. त्यामुळे परिसरातला जिवंतपणाही कमी होऊ लागला. तेजोमयीच्या आईला याचं फार दु:ख झालं. आपण काहीच करु शकत नाही. आपण फार हतबल असल्याची हताशा तिच्या मनात निर्माण झाली.

आईला कशाचं तरी चांगलंच दु:ख झालय, हे अलेक्सा गोर्जीच्या लक्षात आलं. तिने हातवारे करुन अलेक्झांडरला विचारलं. त्यानेही दु:खी चेहऱ्याने काही कळत नाही बॉ. अशा आशयाची मान हलवली. न राहवून गोर्जीने आईलाच विचारलं शेवटी,

“काय करतेस बाई, हे समजून. आपण किती दुर्बळ नि असाहाय्य आहोत हे कळलंय मला.” आई नि:श्वास टाकून म्हणाली.

“पण आई, मला तुमच्या मनातील वेदना तर सांगाना, काही उपाय सुचतो का ते मी बघेन. तसही मन कुणाकडे मोकळं केलं की आपलं दु:ख कमी होतं,असं तुम्हीच नाही का तेजोमयीस सांगता.” गोर्जी म्हणाली. हे ऐकून आईला हुंदका आला. ती सोफ्यावर बसली. डोळ्यातील अश्रू पुसत, गोर्जीला तिने मनातलं दु:ख सांगितलं. हे ऐकून गोर्जीलाही दु:ख झालं. तिने डोळे मिटले. ती विचार करु लागली. विचार करताकरता तिच्या डोळयासमोर साळुमारदा थिम्मका ही वृक्षांची आई डोळ्यासमोर आली.

गोर्जीने मेंदूतील डीप लर्निंगला साळुमारदा थिमक्काची माहिती मिळवायला सांगितलं. ही माहिती मिळवल्यावर गोर्जीने विश्लेषण केलं, तेव्हा तिला थिमक्काने वृक्ष वाचवण्याचा मोठाच पराक्रम केल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने मेंदूतील इकोव्हिजन या सॉफ्टवेअरला या घटनेवरची चित्रफित तयार करायला सांगितली. काही क्षणात ही चित्रफित तयार झाली.

इंटरनेट ऑफ थिंग्जच्या मदतीने गोर्जी, ही चित्रफित स्मार्ट टीव्हीवरच्या स्क्रीनवर दाखवू लागली. एकएक दृष्य समोर येऊ लागले.

साळुमारदा थिमक्का या निपुत्रिक महिलेने बेंगळुरुच्या पश्चिमेला असणाऱ्या कुदूर-हुलिकल या चार किलोमीटर मार्गावर वडाची ३८५ झाडं लावली. तिने आणि तिच्या पतिने या झाडांची देखभाल स्वत:च्या मुलाबाळाप्रमाणे केली. हळूहळू ही झाडे चांगलीच बहरली. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांना आसरा  देऊ लागली. पशुपक्षांसाठी हे हक्काचं घरच झालं.संपूर्ण परिसर या झाडांमुळे थंडगार राहू लागला. या रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांना हळूहळू थिमक्का  यांची ही कामगिरी लक्षात आली. त्यांची दखल घेतली जाऊ लागली. त्यांचं कौतुक होऊ लागलं.

मात्र, २०१९ साली या रस्त्याचं रुंदिकरण करण्याचं कर्नाटक सरकारनं ठरवलं. त्यासाठी ही झाडं तोडण्याचे  आदेश देण्यात आले. जीवापाड जपलेली, अंगाखांद्यावर बागडलेली ही वृक्षरुपी लेकरं अशी डोळ्यादेखत नष्ट होणार हे बघून थिमक्का आधी घाबरली. पण तिने ठरवलं की असं घाबरुन रडत बसण्यापेक्षा आपण या झाडांना वाचण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करायला हवा. निरक्षर असलेल्या थिमक्काने जमेल तसं वृक्षतोडीच्या विरोधात‍ आवाज उठवायला सुरुवात केली. तिची तळमळ लोकांच्या लक्षात येऊ लागली. लोक तिला पाठिंबा देऊ लागले. यातून एक मोठे आंदोलन उभं राहिलं. हळूहळू हे प्रकरण मुख्यमंत्र्याच्या कानी गेलं. त्यांनी सगळं समजून घेतलं. थिमक्काची कळकळ त्यांच्या लक्षात आली. त्यांनी झाडं तोडण्याचा आदेश रद्द केला. थिमक्काच्या लढाईला यश आलं.

इथे चित्रफित संपताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.केवळ हळहळ व्यक्त करुन, हातावर हात ठेऊन काहीच होत नाही. प्रत्यक्ष कृती केलीच पाहिजे, हा धडा आईला थिमक्काच्या गोष्टीतून मिळाला.

आईने गोर्जिला थँक्यू म्हंटलं. ‘आता पुनर्विकास होणाऱ्या सोसायट्यांमध्ये कुणी झाडं तोडण्यासाठी आलच तर सगळे मुलं-महिला मिळून विरोध करा. झाडांना कवटाळा. अधिकाऱ्यांना समजावून सांगा. ते ऐकत नसतील तर मुख्यमंत्र्यांकडे जा.’ असा पुढचा रोडमॅपही गोर्जीने सांगितला.

आईच्या मनातील दु:खाचं मळभ दूर झालं. आपण आपल्या सोसायटीच्या झाडांची आई होण्याचा निर्धार तिने केला.

सुरेश वांदिले