(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी पदवीधर मुलींना पूर्वी कम्बाईन्ड डिफेंस सर्व्हिस (संयुक्त लष्कर सेवा) मार्फत मिळत असे. मात्र ही नियुक्त लघु सेवा कमिशन स्तराची म्हणजे मर्यादित काळाची असे. शिवाय अत्यंत जोखमीचे काम म्हणजे प्रत्यक्ष युध्दमैदानावरील सहभाग किंवा हिमालय/लडाख या ठिकाणच्या अत्यंत खडतर अशा सीमेचे रक्षण करण्याची संधी मुलींना अभावनेच मिळत असे किंबहुना मिळत नसे. सर्व क्षेत्रात मुलांइतकीच मुली कर्तबगारी बजावण्यास सक्षम आणि समर्थ असताना सैन्यदलात मुलींना मात्र दुजाभावच होता. याविरुध्द काही मुली न्यायालयातही गेल्या. न्यायालयाने हा दुजाभाव कशासाठी? असा सवाल सैन्यदलाला विचारला. मात्र त्यांनी दिलेले उत्तर हे समाधानकारक नसल्याने दोन वर्षापूर्वी, मुलींना सैन्यदलात मुलांप्रमाणेच संधी देण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार गेल्या दोन वर्षापासून नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी किंवा एनडीए) येथील मुलींचा प्रवेश सुकर झाला.

या प्रबोधिनीमध्ये १२ वीनंतर आता मुलांसोबतच मुलींनांही प्रवेश दिला जातो. भविष्यात या मुलींना मुलांइतक्याच सर्व प्रकारची कर्तबगारी बजावण्याची संधी मिळू शकेल. त्याशिवाय भारताच्या तिन्ही दलाच्या प्रमुखपदीही मुली विराजमान होऊ शकतील.

एनडीच्या प्रवेशासाठीची परीक्षा अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक अशी असते. सध्या मुलींना अल्पसंख्येत प्रवेश दिला जात असला तरी भविष्यात ही संख्या निश्चितच वाढेल. एनडीएमध्ये महाराष्ट्रीय मुलांना चांगली करता येणे शक्य व्हावे यासाठी औरंगाबाद येथे राज्य शासनामार्फत प्रशिक्षण संस्था चालविण्यात येते. त्याच धर्तिवर आता नाशिक येथे मुलींसाठी अशी संस्था यंदा स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेतील अभ्यासक्रमासाच्या पहिल्या तुकडीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महत्वाकांक्षी आणि साहस गाजवण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या मुलींनी या संधीचा निश्चितच फायदा घ्यायला हवा.

या प्रशिक्षण संस्थेत मुलींना ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमासोबतच एनडीएच्या लेखी परीक्षेची आणि मुलाखतीची परिपूर्ण तयारी करुन दिली जाते.

अर्हता

() मुलगी अविवाहित असावी. (२) १० वी उत्तीर्ण. दहावीमध्ये गणित आणि सामान्य विज्ञान (रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र) हे विषय घेतलेले असावेत. (३) सातवी, आठवी आणि नववी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत.

परीक्षेचे स्वरुप

() संस्थेतील प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेतली जाईल. () परीक्षेचा पेपर १५० गुणांचा असून यामध्ये बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न विचारले जातील. () या पेपरमध्ये क्षमता चाचणी किंवा सामान्य ज्ञान (जनरल ॲबिलिटी टेस्ट) आणि गणित या विषयांवर प्रत्येकी ७५ गुणांचे प्रश्न विचारले जातील. () पेपरचा अभ्यासक्रम ८ वी १० च्या राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. () प्रत्येक अचुक उत्तरास एक गुण दिला जाईल. () या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

शारीरिक क्षमता

हा अभ्यासक्रम सैन्यदलातील प्रवेशासाठीचा असल्याने विद्यार्थीनी शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. उमेदवारांची किमान उंची १५२ सेमी असावी. वजन किमान ४२.५ किलोग्रॅम असावे. रातांधळेपणा किंवा रंगआंधळेपणा नसावा. एनडीए/एनएनएने निश्चित केलेली डोळयांची क्षमता असावी. शारीरिक क्षमतेची मानके(स्टँडर्डस) एनडीए/एनएनएने निर्धारित केली आहेत. त्यात आपण बसतो की नाही याची खातरजमा विद्यार्थीनीने करुन घेणे आवश्यक आहे.

संपर्क- शासकीय दुग्ध डेअरीच्या विरुध्द दिशेला, पत्रकार कॉलनीजवळ, त्रिंबक रोड नासिक- ४२२२०२, दूरध्वनी- २९९१३७०, ईमेल- girlspiadmissions@gmail.com, संकेतस्थळ- www.girlspinashik.com

सुरेश वांदिले