ती लहान असतानाच तिच्या कानावर कर्करोगाची चर्चा आली होती. हा अतिशय जीवघेणा रोग असल्याचंही तिला तेव्हाच कळलं. मोठ्यांच्या चर्चेतून तिला हेही समजलं की हा दुर्धर आजार कुणालाही कधीही होऊ शकतो. पण तो कां होतो? याचं काही समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेलं नाही. त्यावरचे उपचारही खात्रीशीर नाहीत. फक्त जितक्या लवकर या रोगाची जाणीव रुग्णाला होईल, तितक्या लवकर त्यावर उपचार सुरु करता येऊ शकतात. त्यामुळे रुग्णही बरा होऊ शकतो. यावर बऱ्यापैकी एकमत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ किंवा डॉक्टर, कर्करोगाचे निदान त्याच्या प्रारंभीच कसा करता येईल किंवा कर्करोगाची काही शक्यता आहे का? यावर संशोधन करतात.
आपणही असं काहीतरी करायला हवं, असं तिच्या मनानं लहानपणीच घेतलं. आपण मोठं होऊ तेव्हा कर्करोगावर विशेषत: महिलांच्या कर्करोगावर संशोधन करण्याचं तिने ठरवलं.
मुळातच ती हुषार असल्याने १२ वीनंतर आपलं आवडीचं वैद्यकीय क्षेत्रं तिने निवडलं. मणिपाल विद्यापीठाच्या कस्तुबरा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. इथे तिच्या मनातील संशोधनासाठीचं वातावरण मिळालं. वरिष्ठ डॉक्टरांकडे तिने याविषयी चर्चा केली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. या प्रोत्साहनाने तिला नवी उर्जा मिळून तिने डॉक्टरकीच्या अभ्यासासोबतच कर्करोगाचा प्रारंभाचे निदान लवकरात लवकर कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित केलं. त्यासाठी तिने स्वत:ला रात्रंदिवस झोकून दिलं. या अथक परिश्रमातून तिने एक ‘कर्करोग तपासणी किट (संच)’ शोधली. यामुळे स्त्रीरोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान करणं सोपं असल्याचं तिने दाखवून दिलं.
तिने विकसित केलेलं उपकरण तसं छोटं असून त्यात एन्झाइन कोटेड स्ट्रिप (कर्करोग निदानासाठी वापरली जाणारी विशिष्ट ब्रँडची लेपित पट्टी) वापरली जाते. त्याव्दारे योनीतील द्रवामधील लॅक्टेट (लॅक्टिक ॲसिड- दुधाम्ल) पातळी मोजली जाते. लॅक्टेट हा एक नवीन बायोमार्कर (जैवचिन्ह) आहे, जो संसर्ग किंवा कर्करोगाची शक्यता दर्शवतो. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर वृध्द महिलांना रुग्णालयामध्ये तपासणीसाठी जाणं अडचणीचं नि बऱ्याचदा अवघड होतं. त्यांच्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरु शकत असल्याचं तिचं सांगणं आहे. या उपकरणामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रारंभीच्या टप्प्यावर निदान करणं सुलभं जाऊ शकतं.
हे उपकरण शोधल्यानंतर तिने ते आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मध्ये सादर केलं. या उपकरणाची तज्ज्ञांनी सखोल तपासणी केली. हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरु शकत असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी या उपकरणाचा सर्वोच्च पाच नावीन्यपूर्ण (इनोव्हेशन) उपकरणात समावेश केला. तिच्या या उपकरणास पेटंट (स्वामित्व हक्क) ही मिळाले आहे. सध्या हे उपकरण हे क्लिनिकल ट्रायल्स(वैद्यकीय चाचण्या) आणि नियामक मान्यता मिळवण्याच्या टप्प्यावर आहेत. एकदा ते झालं की त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येणं शक्य होईल. कर्करोगाच्या प्रारंभाचा निदान करणारं अत्यंत स्वस्त असणारं हे उपकरण नवी क्रांती घडवेल अशी तिला आशा आहे.
तर अशी ही कृषा जनस्वामी. वय वर्षे-२०, मूळ मुंबईची आता वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्य मेंगळुरमध्ये.
सुरेश वांदिले