(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हम्पीच्या विजयनगरचे समृध्द साम्राज्य पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वी आदिलशाही, निजामशाही या शत्रूंच्या आक्रमणास बळी पडलं. कित्येक महिने राजधानी हम्पीची जाळपोळ आणि लुटालूट सुरु होती. मात्र त्यात विजयनगरच्या सम्राटांचे आराध्यदैवत असलेले विरुपाक्ष महादेवाचे मंदीर शाबूत राहिले. सूर्योदयापूर्वी विरुपाक्ष महादेवाचे दर्शन घेऊनच विजयनगरचे सम्राट राज्यकारभार सुरु करत.

त्या प्राचीन वैभवाचं साक्षिदार असणाऱ्या या मंदिरातील पूजाअर्चा अजूनही सुरु आहे. त्यामुळे पर्यटकांसोबतच भाविकही हे मंदिर बघायला नि विरुपाक्षांचे दर्शन घ्यायला इथे येतात.

या मंदिराची शिल्पकला वैशिष्टपूर्ण नि श्रेष्ठ प्राचीन भारतीय मूर्ती आणि मंदिरकलेची महती सिध्द करणारी आहे. विरुपाक्षांच्या मूर्तीसमोरच्या सभामंडातील सभागृहाच्या छतावर रंगीत चित्रे आहेत. ती अद्यापही बरीच सुस्थितीत आहेत.

तेजोमयी आणि तिचे आईबाबा, २०-२२ पर्यटकांच्या समुहासोबत नुकतेच हम्पी पर्यटनास गेले होते. त्यांच्यासोबत इंडॉलॉजिस्ट म्हणजेच मूर्ती आणि मंदिरशास्त्राचे तज्ज अभ्यासक गिरिनाथजी होते. 

हम्पीतील इतर ठिकाणं दाखवून झाल्यावर गिरीनाथजींनी विरुपाक्षांच्या मंदिराकडे सगळ्यांना नेलं. प्रारंभी सगळ्यांनी विरुपाक्षांचे मनोभावे दर्शन घेतलं. मग गिरीनाथजी मंदिर कलेबद्दल माहिती देऊ लागले. त्यांनी सगळ्यांचं लक्ष सभामंडपातील छताकडे वेधलं. त्यावर शिव आणि पार्वतीच्या लग्नसोहळ्याच्या विविध घटनांची चित्रं काढण्यात आली होती. या लग्नसोहळ्यास सगळी सृष्टी गोळा झाली होती. चारही वेद देखण्या अश्वांच्या स्वरुपात सामील होऊन आपला आनंद व्यक्त करत होते. या चार अश्वांसोबत आणखी एक देखणा अश्व तिथे होता.

गिरिनाथजींनी सगळ्यांचं लक्ष त्या पाचव्या अश्वाकडे वेधलं. तो कदाचित पाचवा वेद असावा, असं त्यांनी सांगितलं.

“पाचवा पण वेद आहे का?” तेजोमयीनं उत्सुकतेनं विचारलं.

“काहीजण आयुर्वेदाला पाचवा वेद समजात. पण त्याला सर्वमान्यता नाही. खरे वेद चारच.”

“मग, तो पाचवा अश्व पाचवा वेद असू शकतो, असं  का म्हणालात?”तेजोमयीनं विचारलं.

“हा काही अभ्यासकांचा अंदाज. खरंतर अजूनही तो पाचवा अश्व नेमका कोण? याचा शोध घेता आलेला नाही.” गिरिनाथजींनी माहिती दिली.

गिरीनाथजी चित्राबद्दल आणखी माहिती सांगू लागले. मात्र तेजोमयीचं लक्ष पुन्हापुन्हा त्या पाचव्या अश्वाकडेच जाऊ लागलं. तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले.

छतावरचं चित्र बघून झालं. मग सगळ्यांनी पुन्हा विरुपाक्षांचं दर्शन घेतलं. बाजूलाच असलेल्या पम्मामाता नि भुवनेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदीर परिसरातील लक्ष्मी हत्तीणीकडे जाऊन तिच्या सोंडेचा आशीर्वाद घेतला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हम्पीपर्यटन सार्थक झाल्याचा आनंद ओसंडून वाहू लागला. तेजोमयी मात्र अद्यपही त्या पाचव्या अश्वाच्या विचारातच गढून गेली होती.

विरुपाक्ष मंदिराच्या बाहेर पडतापडता वीज चमकावी तसा तेजोमयीच्या मनात एक विलक्षण विचार आला. लगेच ती सर्वांच्या समोर असणाऱ्या गिरिनाथजींकडे जाऊन म्हणाली,

“काका, मला त्या छतावरील पाचव्या अश्वाचं रहस्य कळलय?”

“खरंच की काय?” चालता चालता थांबून गिरिनाथजींनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांनी सगळ्यांना बाजूलाच असणाऱ्या शहाळे विकणाऱ्याच्या दुकानात नेलं. शहाळ्यांची ऑर्डर दिली. तेजोमयी काय सांगतेय याची सगळ्यांना उत्सुकता लागली,

“कोणतं रहस्य दिसलं तुला त्या पाचव्या अश्वात?”

“या माझ्या विचाराला कुणी हसू नका.”

“कशाला हसणार? इतर कुणाला काहीच सूचलं नाही. पण तुला सुचलं तेच महत्वाचं.” बाबा म्हणाले. तेजोमयी गिरीनाथजीकडे बघत सांगू लागली,

“काका, आपण बावीस जण एकमेकांना ओळखत नव्हतो. पण या प्रवासात आपण कोणत्याही अपेक्षेशिवाय, निखळ आनंदाने एकत्र फिरतोय. आपल्यात कोणताही स्वार्थ नाही, फक्त एकमेकांना आनंद देण्याची वृत्ती आहे. मला असं वाटतं की, त्या चित्रातील ‘पाचवा अश्व’ म्हणजे ‘निरपेक्ष आणि निर्भेळ आनंदाचं’ प्रतीक असावा! जिथे ईश्वराचा विवाहसोहळा आहे, तिथे केवळ ज्ञान (वेद) असून चालणार नाही, तर तिथे हा निर्मळ आनंदही असायला हवा, म्हणूनच तो पाचवा अश्व तिथे असेल!”

गिरीनाथजी काही क्षण अवाक होऊन तिच्याकडे बघतच राहिले. सगळ्यांची तशीच स्थिती झाली. गिरीनाथजींचे डोळे पाणावले. मग त्यांनी टाळी वाजवली. सगळ्यांनी तोच कित्ता गिरवून तेजोमयीचं कौतुक केलं.

‘विरुपाक्षा, तेजोमयीला असचं काहितरी वेगळं नि छान विचार करण्याची बुध्दी सदैव दे’,अशी प्रार्थना मंदिराच्या कळसाकडे बघून तेजोमयीच्या आईने मनोमन केली.

सुरेश वांदिले