मानसिक ताण- तणावाचा हा विषय गेली काही वर्षे सातत्याने चर्चिला जात आहे. छोट्या छोट्या कारणांवरुन नैराश्यात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. बाह्यत: स्थिर दिसणाऱ्या बहुतेक व्यक्ती मानसिक अशांततेने घेरल्याचे वेगवेगळया घटनांमुळे स्पष्ट होत चाललेय.
२०१७ साली जागतिक आरोग्य संघटनेने, भारताचा उल्लेख जगातील सर्वाधिक नैराश्यवादी देश असा केला होता. भारतातील १० पैकी ७ व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक व्याधीने ग्रस्त असल्याचे या संघटनेने एका अहवालात नमूद केले.
करोनाचे धक्के
करोना विषाणू प्रादुर्भावामुळे विविध पातळयांवर नागरिकांना मानसिक धक्के बसले आहेत. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच समावेश होतो. करोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा मोठा ताण सर्वच पातळयांवर दिसून आला. हा ताण सहन करणे प्रत्येकालाच शक्य होईल अशी स्थिती नाही.
भारतीय मासशास्त्रीय संस्थेने (द इंडियन सायकीॲट्री सोसायटीच्या) अहवालानुसार करोना प्रादुर्भावाच्या काळात मानसिक आजारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली. बेरोजगारी, आर्थिक चणचण, आजाराची भीती, शिक्षणाचे बदलेले स्वरुप, घरातूनच काम शैली, पगार कपात, प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आलेल्या/येत असलेल्या अडचणी, प्रवासासाठी असलेल्या मर्यादा इत्यादी कारणांनी मनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.
मानसोपचार तत्जांची गरज
देशात आजमितीस ९ ते १० हजाराच्या आसपास मानसोपचार तज्ज्ञ आहे. भारताची सध्याची १३० कोटी ही लोकसंख्या गृहित धरली तर प्रत्येक १ कोटी नागरिकांच्या पाठिमागे ७ ते ८ मानसोपचार तज्ज येतात. ही दरी प्रचंड असून पुढील काळात त्यात आणखी भर पडू शकते. मानसिक आजारांच्या निराकरणासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज असते. ही गरज तातडीने भागवली गेली नाही तर संबंधित व्यक्ती/रुग्णाची मानसिक स्थिती अधिक बिघडू शकते.
तणाव व्यवस्थापन
जीवनातील तणावाचे व्यवस्थापन करुन आपले दैनंदिन जगणे सकारात्मक करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ साहाय्य करतात. अशा तज्ज्ञांची गरज मोठी असून या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नाही.
रुग्णांना जीवनातील उत्साह देणारे हे करिअर संबधित विद्यार्थ्यास मनोजोगते मानधन, प्रतिष्ठा आणि समाधान देऊ शकते.
करिअर दिशा
मानसशास्त्र विषयाचा अभ्यास १२ वी नंतर करता येणे शक्य आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थी पदवीस्तरीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. पदवी स्तरावर इतर विषयांसोबत हा एक विषय असतो. तोच पुढे पदुव्यत्तर स्तरावर स्पेशलायझेशनसाठी निवडता येतो. पदव्युतर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमानंतर करिअर करणे सुलभ जाऊ शकते. बीए, बीएस्सी इन सायकॉलॉजी असे अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये शिकवले जातात. या क्षेत्रात अधिक चांगल्या संधी मिळण्यासाठी परदेशातील मास्टर ऑफ सायन्स इन सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम सुध्दा करायला हरकत नाही. (उदा-मॅसॉन विद्यापीठ अमेरिका, कॅरॉल विद्यापीठ ,हार्वर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड, आक्सफोर्ड,केंबिज विद्यापीठ इत्यादी)
या अभ्यासक्रमात मेंदुबाबात अद्याप अनुत्तरीत असलेल्या प्रश्नांचा मागोवा घेता येणे शक्य आहे. तणावाच्या काळात मेंदू कसं कार्य करतो ,भाषा शिकण्यासाठी कसा साहाय्य करतो, अनेक बाबी स्मरणात कसा ठेवतो, मानसिक व्याधी शरीरावर कशा तऱ्हेने परिणाम करते, अशासारख्या बाबींचे अध्ययन या अभ्यासक्रमात करता येणे शकय होते. स्पेशलायझेशनच्या विषयांमध्ये आरोग्य, उपचार, शैक्षणिक, संशोधन, क्रीडा, समुपदेशन, व्यवसायाशी (ऑक्युपेशनल) संबंधित, मेंदू (न्युरो) विषयक इत्यादींचा समावेश होतो.
करिअर संधी
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानंतर संशोधन-अध्यापन ते खाजगी रुग्ण सेवा, सल्लागार आदी पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात.. (१) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, (२) क्लिनिकल काउंसेलर, (३) कम्युनिटी कांउसेलर, (४) न्युरो सायकॉलॉजी, (५) कॉग्निटिव सॉयकॉलॉजी, (६) डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, (७) सोशल सायकॉलॉजी, (७) ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, (८) स्कूल सायकॉलॉजी, (९) मेंटल सायकॉलॉजी, (१०) फॉरेंसिक सायकॉलॉजी, (११) लर्निंग डिसऑर्डर थेरपिस्ट (१२) संशोधक
कौशल्य निर्मिती
मानसशास्त्राचा अभ्यासक्रम केल्यानंतर पुढील कौशल्ये प्राप्त करता येतात- (१) व्यामिश्र स्वरुपाच्या सांख्यिकी माहितीचे विश्लेषण, (२) संवाद आणि समुदायासोबत काम करण्याचे कौशल्य, (३) सांख्यिकी माहिती हाताळण्यासाठीचे तांत्रिक कौशल्य, (४) संशोधनातील निष्कर्ष लेखी आणि मौखिकरीत्या प्रभावीरीत्या सादर करण्याचे कौशल्य, (५) शास्त्रीय तथ्यांना सुलभतेने समजून घेण्याचे कौशल्य, (६) विविधांगी बाजूंनी समस्येचे निराकरण करणाऱ्या शैलीचा विकास, (७) विविध अनुभव आणि भावनांबद्दल संवेदनशीलतेने विचार करण्याचे कौशल्य, (८) माहिती गोळा करण्याचे, निरीक्षण आणि एखाद्या प्रकरणाचा (केस) सखोल अभ्यास, (१०) समस्यांचे निर्धारण करण्याचे कौशल्य.
अभ्यासक्रम चालविणाऱ्या महत्वाच्या संस्था- (१) लेडी श्रीराम कॉलेज ऑफ वुमेन दिल्ली, (२) झेव्हियर कॉलेज मुंबई, (३) फर्ग्युसन कॉलेज पुणे, (४) के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स-मुंबई, (५) जयहिंद कॉलेज मुंबई, (६) रामनारायण रुइया कॉलेज- मुंबई, (७) के.सी कॉलेज -मुंबई, (८) वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स- मुंबई (९) आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे, (१०) सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, (११) विल्सन कॉलेज मुंबई, (१२) एलफिंन्स्टन कॉलेज-मुंबई, (१३) अबेदा इनामदार सिनिअर कॉलेज पुणे, (१४) एसआयइएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स- मुंबई, (१५) एस.एफ.एस कॉलेज-नागपूर (१६) डी.वाय.पाटील आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज -पिंपरी चिंचवड, (१७) रुपारेल कॉलेज मुंबई, (१७) दुर्गाबाई सराफ ऑर्ट्स,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज मुंबई (१८) रहेजा कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स मुंबई, (१९) फ्लेम युनिव्हर्सिटी-पुणे, (२०) एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी पुणे, (२१) अशोका युनिव्हर्सिटी-सोनपत (२२) ख्रिस्त युनिव्हर्सिटी बेंगळुरु,
बी.ए सॉयकॉलॉजी (ऑनर्स )
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए सॉयकॉलॉजी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम सहा सत्रांमध्ये पूर्ण करण्यात येतो. काही विषय घटक- सामाजिक मानसशास्त्र, मानसशास्त्राचा विकास, आरोग्य मानसशास्त्र, समाजिक मानसशास्त्र, मानशास्त्रीय परीक्षण आणि सांख्यिकी, ॲबनॉर्मल मानसशास्त्र, औद्योगिक संस्थात्मक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र.
याच महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी (एम.ए) अभ्यासक्रमासोबतच सर्टिफिकेट इन कांउसेलिंग सायकॉलॉजी हा अभ्यासक्रमही करता येतो. संपर्क- www.fergusson.edu
डिप्लोमा इन काउंसेलिंग
मुंबईतील झेवियर कॉलजने, पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन काउंसेलिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. मानसशास्त्र, सामाजिक कार्य किंवा मनुष्यबळ विकास या विषयात पदव्युत्तर पदवी (एमए) अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतात. याच संस्थेत, सर्टिफिकेट कोर्स इन पर्सनल काउंसेलिंग हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण, संपर्क संकेतस्थळ- http://xaviers.edu/
इतर महत्वाच्या संस्था
(१) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ ॲण्ड न्युरो सायन्स–
यासंस्थेला भारत सरकारने इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंम्पार्टन्सचा दर्जा दिला आहे.या संस्थेने पदव्युत्तर पदवी ते पीएचडी पर्यंतचे विविध मानसिक आजारांसाठी अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
संपर्क– हौसर रोड, बेंगळुरु-५६००२९, दूरध्वनी-०८०-२६९९५००१,टेलेफॅक्स-२६९९५००० ईमेल-ms@nimhans.ac.in,संकेतस्थळ – www.nimhans.nic.in,
(२) पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च– संपर्क- सेक्टर-१२, चंदिगढ-१६००१२, ईमेल- pgimer-chd@nic.in,दूरध्वनी-०१७२-२७४६०१८, संकेतस्थळ-www.pgimer.edu.in,
(३) सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियॅट्री
संपर्क– सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियॅट्री, कांके, रांची-८३४००६, दूरध्वनी- ०६५१– २४५१११५, टेलेफॅक्स-२४५१११६ ईमेल- director@cipranchi.nic.in, संकेतस्थळ– www.cipranchi.nic.in
सुरेश वांदिले
०००