(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ज्या पालकांना आपल्या मुलाला किंवा मुलीला राज्यातील शासकीय आणि दर्जेदार खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये टाकावयाचे असेल, त्यांच्यासाठी, कॉमन एंट्रस टेस्ट (सीइटी) चा पर्याय सर्वोत्तम ठरतो. ही सीइटी शासनाच्या सीइटी सेल मार्फत घेतली जाते.

यंदापासून ही परीक्षा दोन वेळा घेतली जाणार आहे. त्याचे वेळापत्रक घोषित झाले आहे. पहिली परीक्षा  ११ एप्रिल २०२६ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत घेतली जाईल.दुसरी परीक्षा १४ मे २०२६ ते १७ मे २०२६ या कालावधीत घेतली जाईल. या पैकी दोन्ही परीक्षा देण्याचा किंवा कोणतीही एक परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थी निवडू शकतात. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळतील,ते प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. अशी प्रकिया जॉईंट एन्ट्रंन्स एक्झामिशन(जेइइ)साठी राबवली जाते.यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कामगिगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळते.काही कारणास्तव पहिली परीक्षा अवघड गेल्याची पक्की खात्री पटल्यास,विद्यार्थ्यांनी दुसऱ्या परीक्षेचा पर्याय नक्कीच स्वीकारायला हवा.

या परीक्षेची काठीण्य पातळी, जेइइ परीक्षेसारखीच असल्याचे सीइटी सेलने स्पष्ट केले आहे. तथापि सीइटीचा संपूर्ण अभ्यासक्रम हा ११वी आणि १२ वीच्या, उच्च माध्यमिक बोर्डाच्या क्रमिक पुस्तकातील विषय घटकांवर आधारित असतो. त्यामुळे हा अभ्यास समजून उमजून केलेल्या विद्यार्थ्यांना सीइटी परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. या परीक्षेत निगेटिव गुणांकन नाही. ही सुध्दा एक जमेची बाजू आहे. त्यामुळे जेइइच्या अभ्यासातच सीइटीचाही अभ्यास होऊन जातो, असे सांगणाऱ्या शिकवणी वर्गाच्या संचालकांकडे दुर्लक्ष केलेले चांगले असले तरी, हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यावयाचा आहे.

महाराष्ट्रातीलच अभियांत्रिकी महाविद्यालयातच प्रवेश घेण्याचं एकदाचं मनात पक्कं ठरवल्यावर जेइइच्या वाटेने जाण्याचा विचारसुध्दा करु नये. जेइइच्या ऐवजी सीइटीच्या तयारीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्यास अधिक फायद्याचं ठरु शकतं.

काही चतुर पालक  आणि विद्यार्थी हा मार्ग स्वीकारतात. त्याचे फळ त्यांना चांगले मिळते. जेइइसाठी प्रचंड अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला जेइइमध्ये विशिष्ट गुण मिळाले नाही तर, त्याला चांगली एनआयटी अथवा आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) मिळत नाही. दोन्ही चाळणी परीक्षेच्या अभ्यासक्रमांचा दर्जा आणि परीक्षा पध्दती वेगळी असल्याने बरेचदा अशा विद्यार्थ्याची सीइटी चांगली जात  नाही, त्यामुळे त्याला  महाराष्ट्रातील शासकीय वा इतर टॉपच्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळणं कठीण जातं. या उलट सीइटीवर लक्ष केंद्रीत केलेली मुले, व्हीजेटीआय, सीइओपी, अमरावती कराड व इतर ठिकाणची शासकीय महाविद्यालये आणि सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयासारखी शासन अनुदानित महाविद्यालयं व गेल्या तीस-चाळीस वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात असलेल्या नामवंत खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुभतेनं प्रवेश मिळवतात.

गोंधळ टाळा

जेइइ मेनच्या किंवा जेइइ ॲडव्हान्स्डच्या गुणांवर, राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांमधील १५ ते २० टक्के जागा या, जेइइ मेनमधील गुणांवर भरल्या जातात. पण, या जागा केवळ महाराष्ट्रातील‍ विद्यार्थ्यांसाठी राखीव नसतात. त्याचे स्वरुप हे अखिल भारतीय असते. म्हणजे या जागांवर देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी अर्ज करु शकतो. महाराष्ट्रातील मुलेही इतर राज्यातील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १५ ते २० टक्के प्रवेशाचा पर्याय निवडू शकतो.

जेइइ- मेनच्या गुणांवर, नागपूर येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी (एनआयटी) या संस्थेत प्रवेश मिळतो. पण ही, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. देशातील सगळयाच राज्यातील एनआयटीतील प्रवेश हा जेइइ- मेनच्या गुणांवर होतात. नागपूर एनआयटीमध्ये ५० टक्के जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असल्या तरी त्यांची संख्या ३५० ते ३७५ च्या आसपास असते. त्यातही पुन्हा वेगवेगळ्या संवर्गासाठी राखीव जागा असतात. जेइइ ॲडव्हान्स्डचे गुण केवळ आयआयटीच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. या सगळ्या बाबी शिकवणीवर्ग चालकांनी पालकांना स्पष्ट करुन सांगितल्या पाहिजेत.

त्यामुळेच कोणती चाळणी परीक्षा द्यायची आणि कशासाठी द्यायची, हे पालक व पाल्यांनी आधी स्वयंस्पष्ट करुन घ्यायला हवे. त्यामुळे कोणताही गोंधळ राहणार नाही. तयारीची दिशा नेमकी माहीत असल्याने, सीइटीच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल. सीइटीचा अभ्यास आणि १२ वी बोर्डाचा अभ्यास हा समांतररित्या होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात.

स्वत:ची क्षमता जोखा

जेइइची परीक्षा नेमकी कशासाठी द्यायची, हे सुध्दा पालक आणि पाल्यांनी आपल्या मनात स्पष्ट करुन घ्यायला हवे. आयआयटीतील प्रवेश हेच स्वप्न असल्यास त्यासाठी कसून मेहनत हा एक भाग झाला. पण स्वत:च्या बौध्दिक क्षमतेचा पारदर्शकपणे विचार करुनच ही मेहनत केल्यास त्याचे फळ मिळू शकेल. अन्यथा अपयशाचं दार आपणच उघडू, हे पक्कं समजावं. आपल्या बौध्दिक कुवतेचा अंदाज आल्यावर जेइइ-मेनवरच लक्ष केंद्रित करुन एनआयटी, आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकेल.

कोणत्या एनआयटी किंवा आयआयआयटीमध्ये प्रवेश मिळवायचा, याचीही स्पष्टता मनात केलेली बरी. कारण काही एनआयटी आणि आयआयआयटीमधील प्रवेशासाठी जेइइ-मेनमध्ये बरेच गुण लागतात. विशेषत: नॅशनल इंस्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या शैक्षणिक संस्थांच्या गुणानुक्रंमाच्या सर्वेक्षणात, सर्वोच्च क्रमांक मिळवणाऱ्या एनआयटी आणि आयआयआयटी संस्थेत प्रवेशासाठी अधिक चुरस असते. त्यासाठी अधिक गुण मिळवावे लागतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या संस्थेत प्रवेश मिळवायचा, हे लक्षात ठेऊन जेइइ- मेनच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे लागते. यासाठी गेल्यावर्षीच्या वेगवेगळ्या संवर्गातील कटऑफ किती होते, याची माहिती घेतल्यास प्रवेशासाठी असणारी स्पर्धा लक्षात येऊ शकते.

एनआयआरएफ २०२५ मध्ये अभियांत्रिकी/तंत्रज्ञान घटकामध्ये, टॉप १० मध्ये असणाऱ्या एनआयटी- (१) एनआयटी तिरुचिरापल्ली, (२) एनआयटी रुरकेला, (३) एनआयटी सुरतकल, (४) एनआयटी कालिकत, (५)एनआयटी वरंगल, (६) एनआयटी दुर्गापूर, (७) एनआयटी सिल्चर, (८) पंडित मदनमोहन मालविय एनआयटी जयपूर, कोझिकोड, केरळ- एनआरआयएफ क्रमांक- २५, (९) एनआयटी कुरुक्षेत्र, (१०) एनआयटी जालंदर

टॉप टेन आयआयआयटी-() आयआयआयटी- हैदराबाद, () आयआयआयटी- दिल्ली, () आयआयआयटी- बेंगळुरु, () आयआयआयटी- अलाहाबाद, () आयआयआयटी- ग्वाल्हेर, () आयआयआयटी- पुणे, () आयआयआयटी- कोट्टायम, () आयआयआयटी- गौहाटी, () आयआयआयटी- भूवनेश्वर, () आयआयआयटी- वडोदरा.

या क्रमवारित दरवर्षी बदल होत राहतो. एकदोन किंवा चार क्रमांकांनी या क्रमांकात बदल होतो. त्यामुळे या एनआयटी किंवा आयआयआयटीच्या गुणवत्ता आणि दर्जामध्ये खूप फरक पडेल, असे काही होत नाही. ही क्रमवारी कोणत्या संस्थेत प्रवेशासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, यासाठी दिशादर्शक ठरु शकते. अशाच प्रकारची क्रमवारी आयआयआयटीच्या बाबतही लक्षात घेतली जावी.

कोणत्याही संस्थेत प्रवेश मिळाला तरी चालू शकते, अशी भावना ठेवल्यास, प्रयत्न कमी पडू शकतात. सर्वच एनआयटी आणि आयआयआयटी यांना केंद्र शासनाने, नॅशनल इंस्टिट्यूशन ऑफ इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला असला तरी, या संस्थांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले पर्सेप्शन (धारणा/ समज/ आकलन), प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या, औद्योगिक घटकांसोबत असलेली संपर्क साखळी, संशोधन सुविधा आदी बाबींचाची क्रमवारी काढताना विचार केला जातो. (जेइइ- मेन परीक्षेतील गुणांचा आधार घेऊन, मुंबईतील इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या शासकीय संस्थेतील बॅचलर ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाच्या एकूण ७५ जागा असून त्यापैकी ७० टक्के जागा सीइटीने आणि ३० टक्के जागा या अखिल भारतीय स्वरुपाचा असल्याने जेइइने भरल्या जातात. त्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह देशातील सर्वच राज्यातील विद्यार्थी अर्ज करु शकतात.)

सुरेश वांदिले