(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नवीन वर्षाच्या सुरुवातीस तेजोमयीचे  बाबा सहकुटुंब उज्जैनला महाकालेश्वर महादेवाच्या दर्शनास गेले. मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दिने फुलून गेला होता. शीघ्रदर्शनासाठी विशेष बुकिंग करावं लागतं. तेजोमयीच्या बाबांनी आधीच ते ऑनलाइन पध्दतीने करुन ठेवलं होतं.

शीघ्रदर्शनाच्या रांगेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला बेलफुल विकणाऱ्यांची दुकाने होती. तेजोमयीच्या आईने एका फुलविक्रेतीकडून फुलाचं ताट विकत घेतलं. बाबा पैसे देणार तोच तेजोमयी म्हणाली,

“आई, आणखी दोन ताट घे.”

“फुलाचं एक ताट पुरे.”बाबा म्हणाले.

“बाबा, आपण तिघांनी फुलांची तीन ताटं घेतली तर महाकालेश्वर रागावतील की काय?” तेजोमयी हसून म्हणाली.

“ही विनोदाची वेळ नाहीय. उगाच शहाणपणा पाजळू नकोस.” आई तेजोमयीला  रागावली. पण तेजोमयीने हट्ट काही सोडला नाही. त्यामुळे बाबांनी आणखी दोन फुलांच्या ताटाचे पैसे फुलविक्रेतीला दिले. त्या फुलविक्रेतीने तेजोमयीचं कौतुक करुन आशीर्वादही दिले. आईची नाराजी मात्र तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. महाकालेश्वराचं दर्शन झालं की तेजोला चांगलंच खडसावायचं हे आईने मनोमन ठरवून टाकलं.

तिघेही फुलाचे ताट हातात घेऊन शीघ्रदर्शनाच्या रांगेत लागले. पंधरावीस मिनीटात महाकालेश्वराच्या गर्भगृहासमोर पोहचले. गर्भगृहापासून थोडा उंचवटा करुन तिथे कठडा बांधला गेलाय. त्यावर उभे राहून तिघांनी दोन-तीन मिनिटे उभे राहून महाकालेश्वराचे दर्शन घेतले. कठड्याजवळ असलेल्या पूजाऱ्याकडे फुलांची ताटं दिलित. त्याने ती फुलं महाकालेश्वराची प्रतिकृती असलेल्या छोट्या पिंडीवर वाहिली. तिघांना प्रसाद दिला. मनाजोगते दर्शन झाले म्हणून आनंदी ‍मनाने तिघेही मंदिराच्या बाहेर आले.

हा आनंद काहीक्षणच टिकला. कारण, आईने तेजोमयीस लगेच धारेवर धरलं,

“नसता शहाणपणा करायला सांगितला गं कुणी? आपण धन्नाशेठ नाही, फुलांचे तीन तीन ताट विकत घ्यायला.”

“आता कशाला रागावता? झालं ना छान दर्शन.” आईचा राग शांत करण्यासाठी बाबा म्हणाले.

“दर्शन झालं हो. नको तो आगावूपणा करायला कुणी सांगितला हिला?” आईचं रागावणं सुरुच होतं.

“आई, तू रागवण्याआधी मला काय म्हणायचय हे तर समजून घेना.”

“बस्स झाला तुझा अतिशहाणपणा!”

“तिच्या मनात काय, हे समजून घ्यायला काय हरकत?” बाबा म्हणाले.

“हं, सांग.”

 “असं रस्त्यावर सांगण्याऐवजी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसून सांगितलेलं बरं,” तेजोमयी बाबांनी म्हणाली.  त्यामुळे ते लगेच बाजूच्या हॉटेलमध्ये गेले. बाबांनी इंदोरी पोह्यांची ऑर्डर दिली. त्या चविष्ट पोह्याचा पहिला घास तोंडात टाकल्यावर आईची नाराजी बरीच कमी झाली.

“तुला काय म्हणायचं होतं, सांग आता.”

“आई, मुलं ही देवाघरची फुलं असं सानेगुरुजी म्हणत.”

“त्याचा इथे काय संबंध?”

“त्यांना म्हणायचं होतं की, फुलं मनास आनंद देतात.”

“मग?”

“आपल्या घरातूनच तीनवेळा फुलं वाहिल्या गेल्याने महाकालेश्वरांचा आनंद त्रिगुणित झाला असणार.”

“नको ते तर्कट कुठेही लावू नकोस. महाकालेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं तरी त्यांना आनंदच होतो.”

“तू म्हणतेस ते खरंय. पण, आपण फुलांची तीन ताटं विकत घेऊन फुलविक्रेतीचा तर आनंद त्रिगुणीत केलाचना. आज सकाळीसकाळी त्या फुलविक्रेतीने, छान विक्री होऊ दे, अशी महाकालेश्वाला प्रार्थना केली असेल. आपल्या रुपाने ही प्रार्थना फळली की नाही?”

“अगदी बरोबर.” बाबा म्हणाले.

“आई, तू म्हणालीस आपण धन्नासेठ नाही म्हणून. फुलांच्या तीन ताटांची किंमत प्रत्येकी पन्नास रुपये. म्हणजे तिघांचे दीडशे रुपये. आपण मुंबईतून इतक्या दूरवर आलो. रेल्वेचं भाडं, राहण्याचं भाडं, रिक्‍शाचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, यात काही हजार रुपये खर्च झाले. त्या तुलनेत दीडशे रुपये म्हणजे काहीच नाही.”

“तसं नाही गं. पण एका फुलाच्या ताटाने भागत असताना तीन ताटं घेणं म्हणजे उधळपट्टीच नाहीका?” आई आता जरा नरमाईच्या स्वरात बोलली.

“यात कसली आलीय उधळपट्टी? आपल्यासारख्यांकडून थोडी अधिक रक्कम त्या गरीब विक्रेतीला मिळाली तर काय बिघडलं? आपण काय पुन्हापुन्हा थोडेच येणार आहोत. त्या फुलविक्रेतीला आपण आनंद दिला. त्या आनंदात तिच्या तोंडून आशीर्वादाचे बोल निघाले. ते महाकालेश्वराचेच कां समजू नये आपण?” तेजोमयी म्हणाली.

तेव्हढ्यात मंदिरातील घंटी जोरजोरात वाजू लागली. महाकालेश्वराची आरती सुरु झाली होती. आपली लेक किती वेगळा विचार करते, या विचाराने आईचं ह्रदय गलबलून आलं. बाबांनी कौतुकाने तिची पाठ थोपटली.

सुरेश वांदिले