गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १० हजारपेक्षा अधिक आणि लिपिक संवर्ग क्षेत्रातील २५ हजाराच्या आसपास आणि याच बँकांमध्ये स्पेशॅलिस्ट ऑफिसर्सच्या १ हजाराहून अधिक जागा भरण्यात येतात. भारतीय बँकिंग क्षेत्राची अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. २००१ सालापासून आजतागायत याक्षेत्राची वाढ ५१ टक्क्यांच्या आसपास असल्याचे मॅकेन्जी या प्रख्यात संस्थेच्या अभ्यासात निदर्शनास आले आहे.
कर्ज देणे आणि घेणे, बचत करणे यापलिकडे बँकेमार्फत विविध सेवा पुरवल्या जातात. यामध्ये क्रेडिट कार्ड्स, सर्वसाधारण विमा, म्युच्युअल फंड, निधी व्यवस्थापन, आरोग्य विमा, पेन्शन फंड, स्टॉक ब्रोकिंग सेवांचा यामध्ये समावेश आहे. अनेक बँकांच्या शाखांचा विस्तार देशभरात अधिकाधिक ठिकाणी करण्यात येत आहे. काही प्रमुख बँका त्यांच्या शाखा परदेशातही उघडत आहेत. त्यामुळे यासाठी सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आतापासूनच विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बँकिंगमधील करिअरचे धेय्य ठेवायला हरकत नाही.
२०१७ च्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदाच्या जाहिरातीमध्ये या बँकेच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती अरुंधती भट्टाचार्य यांचा मोठ्या खुबिने वापर करण्यात आला. स्टेट बँकेमधील त्यांच्या करिअरची सुरुवात ही प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून झाली होती. त्यांना (श्रीमती भट्टाचार्य) जर हे शक्य आहे तर तुम्हाला कां नाही, असा थेट सवाल करत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या जागांसाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले होते.
करिअर संधी– बँकांमधे पुढील प्रमाणे करिअरची संधी प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्यास मिळू शकते.
(१) स्टेट बँक ऑफ इंडिया – याबँकेतील प्रोबेशनरी ऑफिसर, लिपिक संवर्ग आणि स्पेशॅलिस्ट ऑफिसर्सच्या निवडीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवड मंडळामार्फत स्वतंत्र निवड प्रक्रिया राबवली जाते.
(२) राष्ट्रीयकृत बँका- यामध्ये अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनेरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, देना बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, विजया बँक यासारख्या सार्वजनिक बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर, लिपिक संवर्ग आणि स्पेशॅलिस्ट ऑफिसरच्या निवडीसाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) मंडळामार्फत स्वतंत्र निवड प्रक्रिया राबवली जाते.
(३) खाजगी क्षेत्रातील बँका- यामध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, फेडेरल बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, साऊथ इंडियन बँक, आयएनजी करुर वैश्य बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक- यामधील प्रोबेशनरी ऑफिसर, लिपिक संवर्ग आणि स्पेशॅलिस्ट ऑफिसरच्या निवडीसाठी प्रत्येक बँकेमार्फत स्वतंत्र निवड प्रक्रिया राबवली जाते. यातील काही बँका थेट जाहिराती करतात. तर काही बँकांमधील भरती ही त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवरुन सातत्याने सुरु राहते. एमबीएचे शिक्षण देणाऱ्या दर्जेदार संस्थांकडे यातील काही बँका थेट जाउुन विद्यार्थ्यांची निवड करतात.
(४) सहकारी बँका- राष्ट्रीय व राज्य सहकारी बँका, नागरी सहकारी बँक यांच्या विविध पदांची भरती या प्रत्येक बँकांमार्फत स्वतंत्ररीत्या केली जाते.
(५) ग्रामीण बँका- या बँकांच्या विविध पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाते.
(६) इतर – नाबार्ड, आयडीबीआय , एलआयसी, इंडिया ॲश्युरंस कंपनी – या संस्थांमधील पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाते.
(७) रिझर्व बँक – या बँकेतील वरिष्ट आणि कनिष्ट श्रेणी अधिकारी, लिपिक संवर्ग यांची भरती, रिझर्व्ह बँक निवड प्रक्रिया मंडळामार्फत राबवली जाते.
अहर्ता- प्रोबेशनरी ऑफिसर – वयोमर्यादा- किमान २१ आणि कमाल ३० वर्षे, शैक्षणिक – कोणत्याही विद्याशाखेतील ५५ ते ६० टक्के गुण (अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वय आणि गुणांच्या टक्केवारींमध्ये ५ टक्के सूट दिली जाते.)
लिपिक संवर्ग- वयोमर्यादा – किमान १८ आणि कमाल २८ वर्षे, शैक्षणिक- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी (अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वय आणि गुणांच्या टक्केवारींमध्ये ५ टक्के सूट दिली जाते.) ही अर्हता सर्वसाधारण स्वरुपाची आहे. अनेक बँका वेळोवेळी आपल्या अर्हतेमध्ये बदल करत असतात. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ॲण्ड फायनांस–
काही बँकांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ॲण्ड फायनांस या संस्थेची एक वर्षाची पदविका हवी असते. काही बँकांनी यासाठी, मनिपाल विद्यापीठाशी सहकार्य करुन असा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा खर्च उमेदवारांनाच करावा लागतो. मात्र त्यासाठी संबंधित बँक उमेदवारांना कर्ज देते. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना, जागांच्या उपलब्धतेनुसार थेट प्रोबेशनरी ऑफिसर यापदावर नियुक्ती दिली जाते.
स्पेशॅलिस्ट ऑफिसर – यामध्ये विधि सल्लागार, आयटी तंत्रज्ञ, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक, विक्री व विपणन व्यवस्थापक, हिंदी भाषा तज्ज्ञ, जनसंपर्क अधिकारी ,सुरक्षा अधिकारी या पदांचा समावेश होतो. या पदांनुसार शैक्षणिक अर्हता (उदा- एमबीए, सीए, बीई/ एमसीए, बॅचलर ऑफ जर्न्याझिलम वा कम्युनिकेशन इत्यादी) आवश्यक असते. पदांच्या संख्येनुसार लेखी व मुलाखतीद्वारे वा थेट मुलाखतीद्वारेही उमेदवारांची निवड केली जाते.
निवड प्रकिया
प्रोबेशनरी ऑफिसर आणि लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रकिया सर्वसाधारणत: सारखीच असते. गेल्या काही वर्षांपासून फार मोठ्या संख्येने विद्यार्थी बसत असल्याने प्राथमिक आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा घेतल्या जातात. एकूण जागांच्या विशिष्ट संख्येत, उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी, प्राथमिक परीक्षेद्वारे केली जाते. मुख्य परीक्षेच्या गुणांवर आधारित विशिष्ट संख्येत मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात. मुख्य परीक्षेतील आणि मुलाखतीतील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते.
रिझर्व्ह बँकेतले करिअर
या बँकेतले करिअर हे प्रतिष्ठेचे समजले जाते. या बँकेतील ऑफिसर-ग्रेड (बी) च्या निवडीसाठी पुढील प्रमाणे प्रक्रिया राबवली जाते. या परीक्षेचे दोन टप्पे आहेत. टप्पा एक- बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये सामान्य अध्ययन, इंग्रजी भाषा, संख्यात्मक कल आणि तर्क आणि कार्यकारण भाव या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असतो. या पेपरचा कालावधी दोन तास आणि गुण २००.
दुस-या टप्प्याच्या परीक्षेत तीन पेपरचा समावेश असतो. पहिला पेपर हा इंग्रजी लेखन कौशल्याचा असतो. या पेपरचा कालावधी दीड तास तास आणि गुण १००. दुसरे दोन्ही पेपर्स हे बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे असतात. पेपर दोन हा अर्थकारण आणि सामाजिक प्रश्न (या पेपरचा कालावधी दीड तास तास आणि गुण १००) आणि पेपर तीन हा वित्त आणि व्यवस्था/ सांख्यिकी/ अर्थशास्त्र या विषयांवर आधारित असतो (यापैकी कोणताही एक विषय या पेपरसाठी ऐच्छिक विषय म्हणून निवडता येतो.) या पेपरचा कालावधी दीड तास तास आणि गुण १००)
ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाते. पहिल्या टप्प्याची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या परीक्षेला बोलावले जाते. दुसऱ्या टप्प्यातील निकालावर आधारित निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. टप्पा दोन मधील पेपरचे गुण आणि मुलाखतीत मिळालेले गुण यावर आधारित अंतिम निवड केली जाते. मुलाखतीचे गुण-५०. शैक्षणिक अर्हता- ६० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सुट. १० वी आणि १२ वीमध्ये सुध्दा किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. वयोमर्यादा- २१ ते ३० वर्षे. एम.फिल किंवा पीएचडीधारक उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३२ ते ३४ वर्षे. खुल्या सवंर्गातील उमेदवारांना ही परीक्षा ६ वेळा देता येते.
0000