‘ती’ पाच वर्षाची असताना तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आपल्या अवतीभवतीचा निसर्ग, पाऊस, मित्र, आईबाबा यांच्याविषयीच्या अनुभवरुपी कथा या पुस्तकात तिने लिहिल्या. ‘हॅप्पिनेस आल अराउंड’, असं तिच्या या पहिल्या पुस्तकाचं नाव. ती सात वर्षाची झाली तेव्हा तिचं दुसरं पुस्तक ‘वुई वुइल शुअरली सस्टेन’ प्रकाशित झालं. हा कविता आणि छोट्या कथांचा संग्रह. यातील एक कविता तिने तिच्या बाबांना समर्पित केली. ‘बाबा, माझं तुझ्यावर खूप प्रेम! तूच माझा हिरो आणि नि पहिल्या दिवसापासून मीच तुझी राजकुमारी! अशा भावना तिने या कवितेत व्यक्त केल्या. हे पुस्तक कोविडच्या काळात प्रकाशित झालं. कोविडमुळे आपल्या कुटुंबावर कसा परिणाम झाला, याविषयी तिने या पुस्तकात लिहिलय. ‘टू बिगिन वुईथ लिटिल थिंग’ हे तिचं तिसरं पुस्तक. हा सुंदर सुंदर कथांचा संग्रह. या पुस्तकाचं प्रकाशन कोविड काळात आभासी पध्दतीने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा चारु खन्ना यांनी केलं. कोविडच्या निराशामय काळात, आपण कसं आशावादी राहायला हवं, हे तिने या कथातून सांगितलय.
आतापर्यंत तिच्या पुस्तकांच्या १० हजार प्रतिंची विक्री झालीय. हा एक विक्रमच समजला जातो. या कामगिरीची नोंद घेऊन, २०२२ साली एशिआ बूक ऑफ रेकॉर्डसने ‘ग्रँडमास्टर ऑफ रायटिंग’ आणि ‘ग्लोबल चाइल्ड प्रोडिगी’ या पुरस्कारांनी तिला सन्मानित केलं.
खरंतर तिला डॉक्टरच व्हायचय. याचे कारण तिचे डॉक्टर आजोबा. लहानपणी तिने एकदा त्यांच्या दवाखान्यास भेट दिली तेव्हापासूनच तिला डॉक्टर होण्याचं स्वप्न पडू लागलं. ‘पेन’ ऐवजी तिला ‘स्टेथॉस्कोप’शी खेळणं अधिक आवडतं. ‘साहित्या’पेक्षा ‘जीवशास्त्रा’त तिचं मन अधिक रमतं. इतकं की तिच्या वेगवेगळ्यां बाहुल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात तिला खूप आनंद मिळतो.
पण, लिहणं हे तिच्या रक्तातच असावं कारण ती राष्ट्रकवी मैथलीशरण गुप्त यांची पणती. या कुटुंबाचा स्वत:चा प्रकाशन व्यवसाय. पण हिचं पहिलं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं नाही. ‘सुरुवातीलाच आमचा टेकू मिळण्याऐवजी तिने गुणवत्तेवर पुढे जावं, अशी आमची इच्छा होती,’ असं तिची आई अनुप्रिया सांगते. त्यामुळे तिच्या पुस्तकांच्या संहिता त्यांनी ९ प्रकाशकांकडे पाठवल्या. त्यापैकी काहीनी त्या नाकारल्यासुध्दा. त्यातील गुरगावाची ‘इनव्हिंसीबल प्रकाशन’ ही एक संस्था. या संस्थेच्या चालकांनी तिच्याशी नंतर चर्चा केली, तेव्हा तिच्या लिखाणात वेगळची उर्जा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत चार पुस्तकांचा करार केला.
तिच्या आवडत्या लेखकांमध्ये रस्किन बाँड नि सुधा मूर्ती आहेत. अगदी लहान वयातच तिने हॅरी पॉटरच्यासर्व पुस्तकांचा फडशा पाडला. ती जेव्हा लिहित नसते किंवा मोकळी असते तेव्हा तिच्या बाहुलीवर वेगवेगळे उपचार करते. चित्र काढते. शंखनाद करण्याचीही कला तिने हस्तगत केलीय.
लिखानात इतकं मोठं यश तिने मिळवलं. ते तिच्या डोक्यात जाऊ नये म्हणून तिचे आईबाबा विशेष काळजी घेतात. प्रसिध्दीचा झोत तिच्यावर पडू देत नाहीत. तिलासुध्दा याचं फारकाही वाटत नाही. प्रसिध्दीपेक्षा सुंदर नि प्रेरणादायी कथा लिहिणं महत्वाचं असं तिचं ठाम मत.
तर अशी ही अभिजिता गुप्ता. वय वर्षे १३. हल्ली मुक्काम- गाजियाबाद.
सुरेश वांदिले