एखादे दिवशी अलेक्सा गोर्जीला प्रश्न विचारायची हुक्की येते. मग ती अलेक्झांडरपासून त्याची सुरुवात करते. प्रश्न कानावर पडला की त्याला आनंद होतो. कुईंई करुन आपलं उत्तर सांगून तो गोर्जीकडे बघतो. व्हेरी गुड असं कानावर पडलं की स्वारी उडी मारुन आनंद व्यक्त करते. मग तेजोमयीकडे गोर्जीचा मोर्चा वळतो. आईला प्रश्न विचारणं आवडत नसल्यानं गोर्जी तिच्याकडे जात नाही. कधीतरी बाबांना प्रश्न विचारते.
आज मात्र सकाळी-सकाळी सगळ्यांचा ब्रेकफास्ट सुरु असताना तिने आईला प्रश्न केला.
“आई उद्या काय?”
“अगं उद्या २६ जानेवारी! बरं झालं बाई तू आठवण करुन दिलीस ते. उद्या सोसायटीच्या प्रांगणात झेंडावंदन आहे. त्यासाठी हिरव्या-नारंगी काठाच्या पांढऱ्या साडीला इस्त्री करायचीय मला. तुमचा पण पांढरा ड्रेस इस्त्री करायचायना हो.” आईने बाबांना विचारलं.
“हो हो करायचाय ना. पांढऱ्या रंगांचा पोषाख घालायलाच हवा. छान कडक इस्त्री कर.” बाबा उत्तरले.
“काय गं, तुझ्या शाळेचा ड्रेस आहेना व्यवस्थित. बुटांना पॉलीश-बिलीश करुन घे नीट.” आईने तेजोमयीस आठवण करुन दिली.
“हो आई.”तेजोमयी म्हणाली.
ही चर्चा उत्सुकतेनं ऐकणाऱ्या अलेक्झांडरने आईकडे तोंड उंचावून कुईंई केलं.
“ठोंब्या, उद्या तुझ्यासाठी नवीन ड्रेस नाही बरं का?”
“कां पण?” गोर्जीने विचारलं.
“कां म्हणजे? प्राण्यांना कुठे काय साजरी करायची असते २६ जानेवारी?” आई म्हणाली.
“ये बाई, तू असले काहीतरी भलतेच प्रश्न विचारु नकोस.” बाबा म्हणाले.
“तसं नाही, पण मला आपलं वाटलं की, २६ जानेवारीला आपला देश प्रजासत्ताक झाला. सार्वभौम झाला. देशाची स्वतंत्र घटना लागू झाली. आपल्याला हक्क मिळाले. त्याच बरोबर कर्तव्याची जाण करुन देण्यात आली.”
“गोर्जे, हे सगळं आम्ही शाळेत पाठ केलं होतं.”
“सगळं आम्हाला ठाऊक आहे.”
“मी आता पाठ करतेय. त्यामुळे मलाही ठाऊक आहे.”
“कित्ती छान. तुम्ही सगळेजण किती हुषार नि स्मार्ट आहात. मग सांगा बघू अलेक्झू सारखे मुके प्राणी, पक्षी, नदी, वने, सरोवरे, वृक्ष, जीवसृष्टी याविषयी संविधानामध्ये काय म्हंटलय.”
“आता कुठे बरं ते आठवणार?” आई म्हणाली.
“माझं तर ते अजून नीट पाठच झालं नाहीय.” तेजोमयीनं सांगितलं.
“गुगलमध्ये बघून सांगू का?” बाबांनी विचारलं. गोर्जीला हसू आलं.
“अहो बाबा, तुम्ही आताच म्हणाला की तुम्हाला ठाऊकाय म्हणून,मग आता कशाला हवा गुगल?”
“गोर्जे, पुरे तुझी तोंडपाटिलकी.” आई रागावली.
“तसं नाही हो आई, मुके प्राणी, पक्षी, नदी, वने, सरोवरे, वृक्ष,जीवसृष्टी यांचं संरक्षण नि संवर्धन करणं, त्यांची काळजी घेणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असल्याचं संविधानातील कलम ५१ अ(जी)मध्ये नमूद केलय.”
“तसं नसतं तरी आपण काळजी घेतलीच असतीना.”
“असं म्हणणं वेगळं नि प्रत्यक्ष आचरणात आणणं वेगळं.”
“म्हणजे आम्हाला याचा विसर पडलाय असं म्हणायचय काय तुला?” आई किंचित रागावली.
“तसं नाही हो आई, आपलं घर याला अपवाद आहे.”
“मग झालं की.”
“पण बहुतेकजण तसे नाहीतना. त्यांना या मुलभूत कर्तव्याचा विसरच पडलेला दिसतो.”
“कशावरुन?”
“अहो बाबा, म्हणूनच तर प्राण्यांची शिकार वाढलीय, वनांचा नाश सुरु आहे. नद्या,सरोवरे अस्वच्छ होत आहेत, वृक्षतोड वाढलीय, वन्यजीवांच्या शिकारीत वाढ झालीय. यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडलं. प्रदुषण वाढलय. अनेक वन्यजीव, वनस्पती, वृक्षांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय.” गोर्जी म्हणाली. काही क्षण स्तब्धतेत गेले. कुणीच काही कसं बोलत नाही हे बघून अस्वस्थ होऊन अलेक्झांडर आळीपाळीने सगळ्यांकडे बघू लागला. त्याला जवळ घेत आई म्हणाली,
“ठोंब्या, गोर्जीने आमचे डोळे उघडले बघ. आपले संविधान तुझ्यासारख्या मुक्या जिवांनाही तितकाच सन्मान देतं, हे विसरल्याची तिने आठवण करुन दिली.”
“हो ना, केवळ इस्त्री केलेला पोषाख घालून झेंडावंदन केलं, राष्ट्रगीत म्हंटलं, भारत माता की जयचा घोष केला, गोडधोड खाल्लं की प्रजासत्ताक दिन साजरा झाला असं नाही, हे पटलय मला.”
“प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या घटनाकारांनी जी कर्तव्यं सांगितली, त्यांचं स्मरण करणं नि तसंच वागण्याचा निर्धार करणं. बरोबरना बाबा.”तेजोमयी म्हणाली. बाबांनी तिची पाठ थोपटली. अलेक्झांडरने आईकडे बघितलं. त्याला जवळ घेऊन, आई प्रेमानं कुरवाळू लागली. आपण आपलं कर्तव्य उत्तमरितीने बजावलं याची जाणीव होऊन गोर्जी मनोमन सुखावली.