(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

करोनोत्तर काळात टिकून राहण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यातील करिअरचे व्यामिश्र स्वरुप समजून घ्यावे लागेल. करोनाकाळात अनेक उद्योग बंद पडले  किंवा तोट्यात गेले. ही प्रकिया अद्यापही सुरु आहे. करिअरची दिशा ठरवताना याबाबी ध्यानात घ्याव्या लागतील. केवळ एका पर्यायाचाच विचार करुन चालणार नाही. काही वेगळया विकल्पांवर विचार करुन ठेवावा लागेल. करोनोत्तर काळात  करिअरशी संबंधित वेगवेगळे प्रवाह बदलण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे तशी मानसिकता विद्यार्थ्यांनी तयार करायला हवी.

करोना काळात पारंपरिक पध्दतीच्या नोकऱ्या वा रोजगारास मुकावे लागले असले तरी तंत्रकुशल मनुष्यबळास पुढील नव्या भूमिकांसाठी प्राधान्याने संधी देण्यात आली.

(१) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रांना प्राधान्य- डिजिलट सेवांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने या तंत्रकौशल्याला हस्तगत केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक करिअर संधी मिळतील. या मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी दरी पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय.

() डिजिटल मार्केटिंग- बहुतेक सर्व मोठ्या कंपन्या/ उद्योग/ व्यावसायिक यांचे,भविष्यातील विक्री आणि विपणन यांचे नियोजन हे डिजिटल प्लॅटफॉर्मशी निगडित राहतील. नव्या समाज माध्यमांच्या उदयामुळे त्यासाठी लागणाऱ्या आशय निर्मिती (कंटेट डेव्हलपमेंट/ रायटिंग) ची गती वाढली आहे. त्यामुळे डिजिटल कंटेट निर्मिती, विदा विश्लेषण आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे तंत्र हस्तगत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल राहील.

लिड जनरेशन प्रोफेशनल्स किंवा व्यावसायिक, हे विक्री प्रकियेमधील महत्वाचे घटक समजले जातात. संभाव्य ग्राहकांचा शोध घेऊन, ईमेल मार्केटिंग आणि सोशल सेलिंग या बाबींचा अवलंब करुन त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे महत्वाचे कार्य या मनुष्यबळास करावे लागते..

गेल्या वर्षी लिड जनरेशन स्पेशॅलिस्टची गरज पुढील क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून आली. (१) डिजिटल मार्केटिंग मॅनेजर्स, (२) ॲड मॅनेजर्स, (३) फेसबूक ॲड स्पेशॅलिस्ट, (४) काम्युनिकेशन मार्केटिंग डायरेक्टर, (५) चिफ मार्केटिंग ऑफिसर, (६) अकाउंट एक्झिक्युटिव्ह (७) परफॉर्मन्स मार्केटर्स, (८) सर्च इंजिन मार्केटिंग स्पेशॅलिस्ट.

लिड जनरेशन स्पेशॅलिस्टकडे सेल, मार्केटिंग, बिझिनेस डेव्हलपमेंट, गुगल ॲनॅलिटिक्स, एसइओ, सेल्स फोर्स, सोशल मीडिआ, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इमेल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, लिडरशिप, निगोशिएशन, कंटेंट मार्केटिंग, अकाउंट मॅनेजमेंट, कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट ही कौशल्ये आवश्यक समजली जातात.

() माहिती तंत्रज्ञान क्षेत्र- सदाहरीत असलेल्या या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी पुढील काळात वाढतीच राहील. तथापि या क्षेत्रात इतरांपेक्षा समोर राहण्यासाठी कोडिंग, रोबोटिक्स, मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स (कृत्रिम बुध्दीमत्ता) या घटकांचे कौशल्य प्राप्त करणे गरजेचे राहील. सध्याच्या स्वयंचलित (ऑटोमेशन) काळासाठी ही प्रमुख कौशल्य आहेत. सॉफ्टवेअर विकासाच्या क्षेत्रात पायथन, नॉडज्स, रिॲक्ट, एसइएम-सर्च इंजिन मार्केटिंग, गुगल ॲनॅलिटिक्स, रस्ट डार्ट या घटकांच्या तंत्रकौशल्याची गरज भासते. स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज, जावा, जावा स्क्रिप्ट या तंत्र कौशल्यातील गती उपयुक्त ठरु शकते.

असंघटित क्षेत्रातही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञांची मागणी वाढू शकते.

() सांख्यिकी शास्त्र

डेटा सायंटिस्टला आपले ज्ञान आणि कौशल्य सतत वृध्दिंगत करणे गरजेचे झाले आहे. ६० ते ७० टक्के नव्या रोजगार संधीमध्ये स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकी  कौशल्याची गरज अत्यावश्यक समजली जाते. सांख्यिकी शास्त्रातील विविध संकल्पनांचा वापर करुन उत्पदकतेसंबंधी अचुक निदान काढता येण्याचे कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना या संधी सुलभतेने मिळत आहेत.

(५) औषधी निर्माण क्षेत्र- या क्षेत्रात भारताची जगात सध्या आघाडी आहेच, पुढील काळात करोना विषाणू व इतरही अनेक आजार/रोग यांचा प्रतिकार करणाऱ्या औषधी/लसी यांची मोठी मागणी जगभर वाढेल. ही मागणी पुरवण्याची क्षमता भारतीय औषधी निर्माण क्षेत्रात आहे. भारतात औषधी निर्मितीचा खर्च जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत भारत सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीसही भारत सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे औषधी निर्मिती आणि विविध प्रकारच्या वैद्यकीय उपकरणे/संयंत्रे यांच्या उत्पादनास वेग मिळेल. या क्षेत्रासोबतच बायोइन्फॉर्मेटिक्स  या क्षेत्रातही तज्ज्ञ मनुष्यबाळाची गरज भासेल.

(६) आरोग्यसुविधा (हेल्थ केअर) करोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात करोना रुग्णांवरच उपचार केंद्रित झाल्याने इतर रोगी आणि आजारांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या क्षेत्रापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो की काय असे वाटू लागले. पण करोना काळात आणि त्यानंतरही आरोग्याचे क्षेत्र हे सर्वाधिक महत्वाचे असल्याचे सिध्द झाले. केंद्र आणि राज्य शासनही याक्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष देत आहे. केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी याच क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आला. त्यामुळे या क्षेत्रात नजिकच्या काळात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. करोनोत्तर काळात आरोग्यविषयक समस्यांच्या तत्काळ निराकरणाकडे अधिकाधिक नागरिकांचा ओढा असेल. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, औषध विक्रेते, औषधनिर्मिती तज्ज्ञ, या मुनष्यबळास या क्षेत्रात प्रगती आणि विकासाच्या नव्या संधी मिळतील.

वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रांच्या निर्मिती क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. ऑक्सीमीटर, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, मास्क,अशा वैद्यकीय उपकरणांच्या मागणित प्रचंड वाढ झाली. या क्षेत्रातील उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्या जागतिक पातळीवर या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करतील आणि काही नव्या कंपन्याही या क्षेत्रात उतरतील.

इम्युनॉलॉजी(रोग प्रतिकारशास्त्र),व्हायरॉलॉजी (विषाणूशास्त्र), जेनॉमिक्स (जणुकीय शास्त्र) या क्षेत्रातही करिअर संधी मिळू शकतात.

सुरेश वांदिले