महापालिकेच्या निवडणुकीत तेजोमयीच्या बाबांचे मित्र देसाईकाका निवडून आले. सगळ्यांना खूप आनंद झाला. निकालानंतर दोन दिवसांनी ते विजयाचे पेढे घेऊन तेजोमयीच्या घरी आले. येताना त्यांनी अलेक्झांडरसाठी पेटशॉप मधून त्याचा खास खाऊही आणला. दारात पाऊल टाकताच अलेक्झांडरला दाखवताच स्वारी खुष होऊन देसाईकाकांच्या भोवती शेपटी हलवत लाडिगोडी करु लागला.
आईने त्यांना ओवाळलं. बाबांनी गळाभेट घेऊन अभिनंदन केलं. तेजोमयीने तिळगुळाचा लाडू भरवला. देसाईकाकांनी सगळ्यांना पेढे दिले. अलेक्झांडर त्याचा खाऊ चविने खाऊ लागला.
“नगरसेवक होण्याचं तुझं बऱ्याच वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.” बाबांनी, देसाईकाकांचं कौतुक केलं.
“असंसुध्दा स्वप्न शकतं?”तेजोमयीनं विचारलं.
“काहीही काय विचारतेस?” आईने तेजोमयीकडे डोळे वटारुन बघितलं. आईच्या आवाजातील बदल अलेक्झांडरने लगेच ओळखला. तो चमकून आईकडे बघू लागला. सगळेजण हसले. तेजोमयीला स्वत:जवळ बोलावून देसाईकाका म्हणाले,
“आपलं शहर आणि वार्डाची सेवा करण्याची माझी इच्छा या स्वप्नपूर्तीमुळे पूर्ण होणार, बाळा आता.”
‘पण, त्यासाठी नगरसेवकच व्हायला हवं का?’ असं विचारावं, हे तेजोमयीच्या मनात आलं. तिने आईकडे बघितलं. गप्प राहण्यासाठी आईने डोळ्याने इशारा केला.
“कायरे, आता तू काय करणार नेमका?”बाबांनी विचारलं. आपल्या वार्डात या सुधारणा करेन, त्या सुधारणा करेन असं बरंच काही देसाईकाकांनी सांगितलं. ही यादी कानावरुन जाताना यात काहीतरी त्रुटी असल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. त्याबद्दल विचारावं की नाही, अशी तिची व्दिधा मनस्थिती झाल्याने ती आईबाबांकडे बघू लागली.
“तुला काही विचारायचयं का? आईबाबांची परवानगी हवीय का?” देसाईकाका म्हणाले.
“विचार तेजो?” बाबा म्हणाले. आईनेही मान डोलावली. अलेक्झांडरने कान टवकारले.
“काका आता, तुम्ही जे सांगितलत, त्यामध्ये आमचा काहीच उल्लेख नव्हता हो.”
“आमचा म्हणजे?”काकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
“अगं, काका सगळयांसाठी जे करणार त्यात आपण आहोत. त्याचा फायदा आपल्यालाही होणार.” आई म्हणाली.
“मला म्हणायचं होतं, आमचा म्हणजे मुलांचा. काकांच्या यादित त्यासाठी काहीच दिसलं नाही.”
“सगळ्यांमध्ये मुलंसुध्दा आलीच की.”बाबांनी हस्तक्षेप केला. मात्र देसाईकाका विचारात पडल्याचे दिसले.
“भाऊजी, हिचं मनावर घेऊ नका. हिला काहीबाही प्रश्न पडतात.”आई म्हणाली.
“बाळ, तुला नेमकं काय म्हणायच?”काकांनी विचारलं
“काका, आम्हा मुलांचेसुध्दा काही प्रश्न असू शकतात, समस्या राहू शकतात असं नगरसेवकांना कां वाटत नाही?”
“हे कुणी सांगितलं तुला?
“अहो काका, निवडणुकीच्या काळात आमच्या घरी येऊन पडलेल्या, बऱ्याच उमेदवारांचे माहितीपत्रकं मी वाचले. पण एकातही मुलांचा उल्लेख नव्हता.”
“हे मात्र अगदी बरोबर.” बाबा म्हणाले.
“होगं, माझी दुपारची कामं संपली की अक्षर नि अक्षर वाचून काढायची. माझ्याबाई ते लक्षातच आलं नाही.” आई तेजोमयीकडे कौतुकाने बघत म्हणाली.
“अहो वहिनी, म्हणूनच ही मुलं आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत ना.”काका म्हणाले.
“पण काका, आमचा हा स्मार्टपणा फुलांसारखा कायम टवटवित राहायला हवा की नाही?”
“अगं, त्यात दुमत होण्याचं कारणच नाही.”
“असं असेल तर मग नगरसेवकांना आम्हा मुलांचा विचार कां करावा वाटला नाही?”तेजोमयीने गाडी पुन्हा रुळावर आणली.
“मुलांसाठी करायचं म्हणजे काय करायचं बाळ?”काकांनी विचारलं.
“काका, मला तर खूप काही वाटतं. पण एकदोन गोष्टी सांगते. आपल्या सोसायटी समोरचा रस्ता चार महिने झालाय खोदून ठेवलाय. त्यावरुन मोठ्यांनाच चाललाय कठीण जातय. शाळेतून येताना मुलं धडपडतात. त्यांचे कपडे भरतात. पायांना लागतं.”
“शिवाय कामाचा किती धुराळा. त्याने सोसायटीतल्या अनेक मुलांना श्वसनाचा त्रास व्हायला लागलाय.”आईने माहिती दिली.
“मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाही. एव्हढ्याशा बोळीत खेळावं लागतं. सगळ्यांना शिवाजी पार्कवर दररोज खेळायला जाणं कसं जमणार?वाचनालय नाही.”
“अगदी बरोबर,”
“रस्त्यावरच्या धुळीत खाण्यापिण्याची अनेक दुकानं दाटीवाटीने आहेत. त्यातील अन्नस्वच्छतेकडे, कुणी लक्ष देत नाही. मुलांच्या प्रकृतीवर अशा उघड्यावरील पदार्थांचा किती वाईट परिणाम होत असणार?”
“बापरे! खरंच की, असा काही विचारच केला नव्हता मीसुध्दा.” काकांनी कबूल केलं.
“आजची मुलं उद्याच्या उज्जवल भविष्याचे शिल्पकार, असं फक्त तोंडी लावण्यापुरतं म्हणायचं.” बाबांनी पुस्ती जोडली.
“खरंय हो. नगरसेवक म्हणून मला जमेल तसं नक्कीच मुलांच्या हिताच्या गोष्टी करेन.” काकांनी आश्वासन दिलं.
“असं कराल तर देवाघरची फुलं असणारी आम्ही मुलं तुमची लाडकी होणार बघा.” तेजोमयी हसून म्हणाली. शेपूट हलवून अलेक्झांडरने तिला पाठिंबा दिला.
सुरेश वांदिले