(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अभियांत्रिकी शाखेपेक्षाही वैद्यकीय शाखेत विशेषत: एमबीबीएस प्रवेशासाठीची स्पर्धा कितीतरी पटिने तीव्र आहे. यंदा नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट – अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) या परीक्षेला देशभरातून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. याचा अर्थ २५ लाख विद्यार्थी व त्यांच्या पालकांचं स्वप्न हे एमबीबीएस डॉक्टर होण्याच्या दिशेनं जाणारं असल्याचं स्पष्ट होतं. संबंध देशात खाजगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २ लाखाच्या आसपास वेगवेगळ्या वैद्यकीय ज्ञानशाखांच्या जागा आहेत. यामध्ये एमबीबीएस प्रथम वर्षासाठी यंदा १ लाख ९ हजार आणि दंत वैद्यकशास्त्र (डेंटल) च्या २६ हजार जागांचा समावेश आहे. उर्वरित जागा या आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, युनानी, सिध्द मेडिसीन, व्हेटरनरी, नर्सिंग या शाखांसाठी आहेत. याचा अर्थ स्पष्टच आहे की २५ लाखातून केवळ दोन लाखाच्या आसपास विद्यार्थी हे वेगवेगळ्या वैद्यकीय ज्ञानशाखांसाठी पात्र ठरतील.

वाढती संख्या

गेल्यावर्षी २३ लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी दिली होती. यात यंदा २ लाख विद्यार्थ्यांची वाढ झाली. पुढच्या वर्षी यात आणखी इतकीच वाढ होईल. या तुलनेत वैद्यकीय शाखेतील पदवीच्या प्रथम वर्गाच्या जागा या अत्यल्प प्रमाणात वाढतील. कितीही नवी वैद्यकीय महाविद्यालये उघडली तरी २५ लाख विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या जागा काही  उपलब्ध होणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन यंदा व पुढच्या वर्षी (२०२५) वैद्यकीय प्रवेशासाठी किती आणि कसे परीश्रम करणार याची दिशा स्वयंस्पष्टपणे ठरवली पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्याची बौध्दीक कुवत लक्षात न घेता, त्याच्या पाठिमागे लागून, जगात  काहीही अशक्य नाही असा घिसापिटा उपदेश करुन त्याच्या डोक्यावर एमबीबीएसचे भूत बसवू नये.

बौध्दिक क्षमतेचा आरसा

९ वी ते ११ वीपर्यंतच्या विद्यार्थ्याची परीक्षेतील कामगिरी ही त्याच्या बौध्दिक क्षमतेचा आरसा ठरु शकतो. या आरशात स्वच्छपणे बघण्याची नजर पालकांना आली पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायानशास्त्र, जीवशास्त्र या तिनही विषयात  यथातथाच गुण किंवा अगदी ७०-७५ टक्के गुण पाल्याला मिळत असल्याचे दिसून आल्यास, २५ लाख विद्यार्थ्यांसोबतची त्याची स्पर्धा ही अत्यंत विषमच ठरेल हे लक्षात घ्यायला हवं. “हमखास यश” मिळवून  देण्याचा दावा करणारे कोचिंग क्लासेस अशा ७०-७५ टक्के गुणांच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फार फरक पाडू शकतील हे खात्रीने सांगता येत नाही. अशा संस्था सगळ्याच विद्यार्थ्यांबाबत गुलाबी चित्र निर्माण करतात. ते आभासी असल्याचं त्यांनांही ठाऊक असतं. हा आभास पालक आणि विद्यार्थ्यांनी ओळखणं गरजेचं असतं.

आवाका लक्षात घ्या

प्रत्येकाने‍ प्रवेश परीक्षेची संधी घेतलीच पाहिजे. मात्र आपला आवाका लक्षात घेऊन ही परीक्षा दिली तर पुढे नैराश्य येणार नाही. आपल्याला प्रवेश परीक्षेचा कितपत अभ्यासक्रम जमू शकतो, हे खरे तर कोचिंग क्लासच्या पहिल्या काही चाचण्यांमध्येही लक्षात येऊ शकते. त्यावर घरी पालकांसोबत आणि कोचिंग क्लासमधे तेथील संचालक किंवा समुपदेशकासोबत स्पष्ट चर्चा करायला हवी. पण तसे काही घडत नाही. ९ वी- १० वी पासून सुरु झालेला नीट प्रवेश परीक्षेचा प्रवास ११ वी, १२ वीमध्ये सुरु राहतो. या प्रवासातील खाचखळगे लक्षात घेतले जात नाहीत, त्यामुळे नीटच्या पहिल्या प्रयत्नात पडलेल्या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले जाते. पालकसुध्दा त्याला जबाबदार असतात. काही विद्यार्थी पुढे आणखी एक- दोन- तीन प्रयत्नांच्या पाठिमागे लागतात. कुणी किती वेळा परीक्षा द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असला तरी, कुठेतरी थांबायलाच हवं. कारण प्रत्येक प्रयत्नात वेळ जातो, पैसाही जातो नि त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसून आलंय. एमबीबीएस, डेन्टल या शाखांना प्रवेश मिळत नसल्यास वैद्यकीय क्षेत्रातील इतर ज्ञानशाखांच्या प्रवेशाचा विचार करायला हवा.

सुरेश वांदिले