इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही कार्यरत आहे. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मितीचे उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
अशाप्रकारचं शिक्षण-प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील आघाडीची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत अत्याधुनिक किचन साहित्य, प्रयोगशाळा व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या अभ्यासक्रमात अत्याधिक भर प्रात्यक्षिकांवर दिला जातो. हॉस्पिटॅलिटी (आतिथ्यशीलता) सेवा उद्योगासाठी कलनरी शिक्षण/प्रशिक्षण हे सर्वाधिक आवश्यक व विशेष (स्पेशलाइज्ड) अर्हता समजली जाते. भारतीय अन्नपदार्थांचे जतन करणं, त्यांचं दस्तावेजीकरण (डाक्युमेंटशन) करणं, या बाबीसुध्दा या संस्थेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केवळ शाकाहारी अन्नपदार्थ निर्मितीच्या प्रात्यक्षिकांसाठी वेगळी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात- (१) हॉटेल किंवा उपहार गृह आणि तत्सम सेवा उद्योगातील शेफ, (२) उपहार गृहातील स्वयंपाकगृह (किचन) व्यवस्थापन. करिअरच्याा प्रारंभी इंटर्नशीपची संधी, (३) विमानसेवेतील किचन सेवा,(४) भारतीय नौसना आथित्य (हॉस्पिटॅलिटी) सेवा, (५) आंतरराष्ट्रीय फास्ट फूड साखळीमध्ये कार्यकारी पद किंवा व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, (६) रुग्णालयातील आणि संस्थात्मक कॅटरिंग सेवा, (७) हॉटेल मॅनेजमेंट, फूड क्रॉफ्ट इंस्टिट्यूटमध्ये अध्यापन, (८) प्रवासी आणि व्यापारी जहाजातील कॅटेरिंग सेवेतील शेफ, (९) भारतीय रेल्वे कॅटेरिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवा, (१०) राज्य पर्यटन महामंडळाची उपहारगृहे आणि निवासस्थानातील किचन सेवा, (११) स्वयंउद्योजकता,
संस्थेच्या वतिने विद्यार्थ्यांना नामांकित हॉटेल्स, उपाहरगृहे, हॉस्पिटॅलिटी सेवा यामध्ये इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
अभ्यासक्रम
(१) बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) इन कलनरी आर्ट- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम तिरुपती आणि नॉयडा येथील कॅम्पसमध्ये करता येतो. प्रत्येक ठिकाणी १२० जागा भरल्या जातात. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अन्नपदार्थ निर्मितीच्या प्रशिक्षणावर या अभ्यासक्रमात भर दिला जातो. याअनुषंगाने उत्कृष्ट कौशल्य निर्मितीसाठीचे ज्ञान प्रदान केलं जातं व सखोल प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. अन्नपदार्थ तयार करण्यातील आपलं कौशल्य, आवड आणि सर्जनशीलता या बळावर शेफ ख्याती प्राप्त करु शकतो. आपल्या हॉटेल अथवा उपहारगृहाची लोकप्रियता वाढवू शकतो. अनेक शेफ कालांतराने वलयांकित (सेलिब्रिटी) होतात.
प्रवेश प्रक्रिया
या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो.
- आयजीएनटीयू- आयसीआय- जेईई (इंदिरागांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी-इंडियन कलिनरी इंस्टिट्यूट- जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन), (२) सीयुईटी- कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट. या परीक्षेतील गुणांना सीईटीच्या गुणांपेक्षा अधिक प्राधान्य दिलं जातं. (३) या दोन्ही पध्दतीने जागा शिल्लक राहिल्यास ऑन द स्पॉट, म्हणजेच जागेवरच प्रवेश दिला जातो.
अर्हता- चाळणी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्ग आणि नॉन क्रिमिलेयर इतर मागासवर्ग संवर्गातील कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला १२ वी मध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. राज्याने मान्यता प्रदान केलेल्या १२ वी व्होकेशनल अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतात. यंदा १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी सुध्दा ही चाळणी परीक्षा देऊ शकतात. मात्र त्यांचा निकाल ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत लागायला हवा. त्यांना त्यांच्या संवर्गानुसार अर्हतेसाठीचे किमान गुण मिळायला हवेत.
संपर्क- ब्लॉक ए ३५, सेक्टर ६२ नॉयडा – उत्तरप्रदेश २०१३०९, संकेतस्थळ-https://www.icinoida.com, ईमेल- indianculnaryinstitute@gmail.com भ्रमणध्वनी ९७१८१०३९५