(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पुढील काही दिवसात बहुतेक सर्वच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया पूर्ण होईल. ज्या विद्यार्थ्यांना मनाजोगती ज्ञानशाखा मिळाली असेल ते आंनदातच असतील यात शंका नाही. मात्र ज्यांना मनाजोगती ज्ञानशाखा आणि शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला नसेल, त्यांच्यावर नैराश्याचे मळभ दाटून आले असतील. अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं की, एक संधी गेली तर दुसरी संधी सामोरे येतच असते.

अशा काही शैक्षणिक आणि करिअर विषयक संधी या महिन्यात उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नैराश्याला झटकून पुढे आले पाहिजे. बहुतेक सर्व संधीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील एखादी तारीख आहे. सर्व अर्ज ऑनलाइनच भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना पुढे दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा नि प्रवेशासाठी प्रयत्न म्हणजेच योग्य त्या अभ्यासाला मनापासून सुरुवात करावी.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड

ही भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणारी कंपनी आहे. या कंपनीमार्फत, मरिन इंजिनीअरिंग ट्रेनिंग इंस्टिट्यूट चालवली जाते. या संस्थेमार्फत उत्तम करिअरची संधी देणारा, प्रीसी जीएमइ (ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअरिंग) हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. या अभ्यासक्रमाला मेकॅनिकल किंवा नॅव्हल आर्किटेक्चर किंवा मरिन या शाखेतून बीइ किंवा बीटेक पदवी घेतलेले पदवीधर पात्र ठरतात. या परीक्षेत उमेदवारांना ६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळायला हवेत.

संपर्क-www.cslmeti.in, ईमेल- methiod@cochinshipyard.in

०००

भारतीय सेना

सिव्हिल, कॉम्प्युटर सायंस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि इतर विषयांमध्ये बीइ आणि बीटेक झालेल्या पदवीधरांना अधिकारी बनण्याची संधी भारतीय (इंडियन आर्मी) सेना नियमिपणे उपलब्ध करुन देत असते. त्याचाच एक भाग म्हणजे, टेक्निकल ग्रॅज्युएट एन्ट्री अभ्यासक्रम.

हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना कायम सेवा कमिशन (पर्मनन्ट सर्व्हिस कमिशन) अंतर्गत नियुक्त केले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देहरादून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी येथे प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सेनादलामार्फत केला जातो. अभ्यासक्रमाच्‍या निवडीसाठी शारीरिक, मानसशास्त्रीय, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या चाळण्या घेतल्या जातात.

संपर्क-joinindianarmy.nic.in

०००

ओडिशा मेरिटाइम ॲकॅडेमी

या संस्थेने, प्री-सी जनरल परपोज रेटिंग, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रात चांगल्या करिअर संधी मिळतात.

अर्हता- १०वी उत्तीर्ण. इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळायला हवेत. इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक किंवा कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. सरासरीने ४० टक्के गुण मिळायला हवेत. इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक. अशा विद्यार्थ्यांना १० वी मध्ये इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळायला हवेत. १० वी किंवा १२ वीत इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक किंवा फिटर/ मेकॅनिक/ मशिनिस्ट/ वेल्डर/ टर्नर या सारख्या ट्रेडमध्ये ४० टक्के गुणांसह आयटीआय. १० वी किंवा १२ वीत इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक.

या संपूर्ण निवासी अभ्यासक्रमाचा कालावधी जून ते जानेवारी असा सहा महिन्यांचा आहे.

संपर्क-www.odishamaritime.com

सुरेश वांदिले