औद्योगिक प्रगतीनंतर वनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विकासाची गती जशी वाढली तसे वनसंपत्तीवर ओरखडे ओढले जाऊ लागले. वनावरच्या अतिक्रमणास काही प्रमाणात वैधही ठरवले जाऊ लागले. त्यामुळे वनांची, वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नैसर्गिक संतुलन बिघडले.
पर्यावरण, वन्यजीव आणि जैवविविधता यांचं संरक्षण आणि संवर्धनाच्या अनुषंगानं वनांचं महत्व अनन्यसाधारण आहे. समृध्द वने अर्थव्यवस्थेस मोठा हातभार लावतात. वनांच्या हानीमुळे वाढते तापमान, बदलेले ऋतुचक्र, पृथ्वीचे संरक्षक कवच असलेल्यां ओझोन थराला पडत असलेल्या भेगा आदी समस्या अधिकाधिक तीव्र होताना दिसतात. अशा परिस्थितीत वनसंवर्धन आणि वनांची जपणूक हे मोठे आव्हान ठरु लागलेय. हे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य भारतीय वन सेवा मिळवून देवू शकते.
भारतीय वनसेवा स्वीकारलेल्या उमेदवारांना व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प, प्राणीसंग्रहालये, राष्ट्रीय उद्याने, संरक्षित क्षेत्रे, वन्यजीव अभयारण्ये आदींचे व्यवस्थापन, देखभाल आणि संनियंत्रण करण्याचं काम करावं लागतं. हे महत्वाचं तसेच आव्हानात्मक कार्य आहे. ही सेवा वेगळ्या प्रकारचे समाधान आणि निर्मितीचा आनंद देणारी आहे.
भारतीय वन सेवा या परीक्षेद्वारे उपवनसरंक्षक या उच्चश्रेणीच्या पदासाठी निवड केली जाते. देशातील कोणत्याही भागातील वनक्षेत्रात या अधिकाऱ्यांना काम करावं लागतं. राज्याच्या वनविभागाचे मुख्यसरंक्षक बनण्याची संधी ही परीक्षा देते.
भारतीय वनसेवा परीक्षा दोन स्तरीय आहे. नागरी सेवा परीक्षेसाठी (सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन) घेतल्या जाणाऱ्या प्राथमिक परीक्षेद्वारे वनसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाते. भारतीय वनसेवा आणि नागरीसेवा परीक्षा एकाच वेळी घोषित केल्या जातात. वनसेवा किंवा नागरीसेवा किंवा दोन्ही सेवांचा पर्याय, अर्ज भरताना द्यावा लागतो. प्राथमिक परीक्षेतील गुणांवर आधारित भारतीय वनसेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाते. एकूण पदांच्या १२ ते १३ टक्के ही संख्या असते.
नागरीसेवा प्राथमिक परीक्षेची जाहिरात साधारणत: मार्च महिन्यात येते. ही परीक्षा मे महिन्यात देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. वनसेवेची मुख्य परीक्षा सप्टेबर महिन्यात घेतली जाते. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
अर्हता- नागरी सेवा परीक्षा कोणत्याही शाखेतील पदवीधराला देता येत असली तरी भारतीय वनसेवा मात्र पुढील अर्हताधारकांनाच देता येते.
(१) खालील विषयांपैकी कोणताही एक विषय घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण- (१) ॲनिमल हज्बंड्री व व्हेटर्नरी सायन्स (२) वनस्पतीशास्त्र (३) रसायनशास्त्र (४) भूगर्भशास्त्र (५) गणित (६) भौतिकशास्त्र (७) प्राणिशास्त्र (८) संख्याशास्त्र
किंवा (२) पुढील पैकी कोणत्याही एका विषयातील पदवी (१) कृषी (२) वानिकी (३) अभियांत्रिकी,
मुख्य परीक्षेचे स्वरुप – १) लेखी परीक्षा – सामान्य इंग्रजी आणि सामान्य अध्ययन प्रत्येकी ३०० गुणांचे दोन पेपर्स आणि (१) ॲनिमल हज्बंड्री व व्हेटर्नरी सायन्स (२) वनस्पतीशास्त्र (३) रसायनशास्त्र (४) भूगर्भशास्त्र (५) गणित (६) भौतिकशास्त्र (७) प्राणिशास्त्र (८) संख्याशास्त्र (९) कृषी (१०) कृषी अभियांत्रिकी (११) केमिकल इंजिनिअरिंग (१२) सिव्हिल इंजिनिअरिंग (१३) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (१४) वानिकी या विषयांपैकी कोणत्याही दोन विषयांचे प्रत्येकी दोनशे गुणांचे चार पेपर्स. असे एकूण १४ शे गुण लेखी परीक्षेसाठी असतात. सर्व पेपर्स निबंधात्मक स्वरुपाचे आहेत. प्रत्येक पेपरचा कालावधी तीन तासांचा असतो. उत्तरे फक्त इंग्रजीतच लिहिता येतात. मुलाखत ३०० गुणांची असते.
पत्ता : सेक्रेटरी यूपीएस्सी, धोलपूर हाऊस, शहाजहान रोड, न्यू दिल्ली-११००६९, दूरध्वनी: ०११- २३३८५२७१, संकेतस्थळ- www.upsc.gov.in
००