तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर, त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या पक्षांचं उडणं, बसणं, बागडणं, गिरक्या घेणं सुरु असायचं.
आजोबांच्या या लहानशा वननगरीचं तेजोमयीस फार कौतुक! त्यामुळे सुटी लागली की तेजोमयी आजोळी पळायची.
आजोळी, तेजोमयीचा सर्वाधिक वेळ या वननगरीतच जायचा. तिचं निरीक्षण सुरु असायचं. पक्षी येतात कधी, बसतात कसे, भांडतात कसे, एकमेकांना भरवतात कसे, आपल्याच जातिच्या पक्ष्यांसोबत खेळतात कसे, इतर पक्षी त्यांच्यामध्ये आले तर त्याला हाकलात कसे, एकमेकांपासून सावधपणे बसतात कसे?यावर तिचं लक्ष असायचं.
काही पक्ष्यांनी या झाडांवर जमेल तशी घरटीही केली होती. तिथे त्यांच्या पिलांचा जन्म होत असे. असं काही घडलं की सुरुवातीचे काही दिवस जाम कलकलाट असे. मग लवकरच ती पिल्लं घरट्याच्या बाहेर पडत. कधी खाली पडत. पण पुन्हा सावरत आणि उडू लागत. पिलांची ही सवय माहीत असल्यानेच आजोबांनी झाडांच्या अवतीभवती गवतसुध्दा लावलं होतं.
एकदा एका सुटित तेजोमयी आजोबांच्या वननगरीत पक्ष्यांचं निरीक्षण करत असताना, तिच्या समोर एक पिल्लू घरट्यातून पडलं. ते गवतावर न पडता बाजूच्या दगडावर पडलं. त्यामुळे त्याला जखम झाली. ते विव्हळू लागलं. तेजोमयीच्याने ते बघवेना. तिने तातडीने त्या पिल्लास उचललं. आत नेलं. आजोबांना दाखवलं. आजोबांनी त्यांचा प्रथमोपचाराचा डबा काढला. जखम झालेल्या जागेवर मलम लावलं. त्याला पाणी पाजलं.
हळूवारपणे त्याच्या अंगावरुन तेजोमयी हात फिरवू लागली. त्या उबेमुळे ते पिल्लू झोपून गेलं. त्या जखमी अवस्थेत त्या पिल्लाला बाहेर नेऊन ठेवणं बरोबर नव्हतं. त्यामुळे मग तिने एका कोपऱ्यात एक स्वच्छ कापड अंथरलं. त्यावर ते पिल्लू ठेवलं. त्याच्या अंगावर रुमाल टाकला. त्या उबेने ते पिल्लू बराच वेळ झोपून होतं. अधूनमधून तेजोमयी त्याच्याकडे लक्ष ठेऊन असायची. संध्याकाळी त्याला जेव्हा जाग आली. तेव्हा बाजूला असलेल्या तेजोमयीकडे बघून तो तिच्याशी सलगी करु लागला. तिच्या हातावर बसण्यासाठी प्रयत्न करु लागला. त्याने कदाचित तेजोमयीस ओळखलं असावं. तेजोमयीस तसं वाटलं. तिला खूप आनंद झाला.
संध्याकाळी पुन्हा आजोबांनी पिल्लाची जखम स्वच्छ केली. मलम लावला. त्याला खाऊपिऊ घातलं. थोड्यावेळाने ते पिल्लू झोपी गेलं.
दोन-तीन दिवसात ते पिल्लू बरं झालं. आता त्याला उडायला येऊ लागलं. तो स्वत:हून तेजोमयी आणि आजोबांच्या हातावर बसायचा. खांद्यावर बसायचा. त्यांच्याकडे बघून मान हलवायचा. हे पिल्लू आपला मित्र झाल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. आजोबाही तसंच म्हणाले.
इथपर्यंत छान चाललं होतं.
मात्र, दोनतीन दिवसांनी आजी गरजली, “पिल्लू बरं झालय ना, सोडून द्या त्याला बाहेर आता. घरात ठेऊ नका.“
हे ऐकून तेजोमयीस धक्का बसला.तिने आजीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण आजी काही हेका सोडेना. तेजोमयीने रडून बघितलं. पण आजी काही बधेना. आजोबांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण तरीही आजी ठाम.
“असाच हट्ट करायचा असेल निघून तर जा, आपल्या बाबांच्या घरी,” असं सुध्दा रागारागाने आजी बोलून गेली.
“ती कशाला जाईल.मीच त्या पक्ष्याला बाहेर सोडून येतो ना.“आजोबा म्हणाले.
आजी ऐकत नसल्याचे बघून तेजोमयीस आपला हट्ट सोडावा लागला.
आजोबा जेव्हा त्या पिल्लास बाहेर सोडण्यासाठी निघाले तेव्हा तिने विचारलं,
“आजीचा कां बरं इतका हट्ट या पिल्लूला बाहेर सोडण्याचा?”
“अगं हे, घुबडाचं पिल्लू आहे ना. आपल्याकडे घुबडाला अशुभ समजलं जातं .“
“आँ! मी कुठेतरी वाचलं होतं की घुबड हे तर लक्ष्मीदेवीचं वाहन असतं म्हणून. मग ते अशुभ कसं?”
“कसं? हे तुझ्या आजीला कसं समजावून सांगणार?मी सांगायला गेलो तर, मलाही घराच्या बाहेर जा म्हणायची.” आजोबा हसत म्हणाले.
सुरेश वांदिले