(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

परवा तेजोमयीने, ताकापुरती असलेली आजी हवी, असा हट्टच धरला. तिच्या  या हट्टाने बाबा चक्रावले. आई रागावली.

अशी काही आजी नसते, असं आईने सांगून बघितलं.

अशी आजी जर मी दाखवली, तर काय द्याल? तेजामयीने बाबांना थेट विचारलं.

“आँ!”

अशी आजी कुठून शोधणार?”आईनं विचारलं.

आई बरोबर बोलतेय. कुठे शोधणार तू अशा आजीला? बाबांनी विचारलं.

ते मी माझं ठरवणार. अशी आजी दाखवली तर मला काय द्याल.”तेजोमयीने पुन्हा विचारलं.

रं बरं, तुला पाहिजे ते देऊ.” बाबा म्हणाले.

काहीतरी देऊ असं अलेक्झांडरच्या कानावर पडल्याने तो गॅलरीतून बाबाजवळ आला. त्यांच्याकडे बघू लागला. मला काय मिळणार? असे भाव त्याच्या डोळयात होते.

त्याला जवळ घेत, बाबांनी हळूवार त्याचे कान उपटले.”असं चोरुनलपून ऐकणं बरं नव्हे, हे त्यांनी अलेक्झांडरला सांगितलं. अलेक्झांडर चटदिशी आईकडे गेला. आईने त्याला लाडाने कुरवाळलं. त्याचे कान ओढल्याचं आईला आवडलं नव्हतं.

तुमच्या लाडामुळेच दोघेही हट्टी झालेत.” बाबा, त्रासिकपणे आईला म्हणाले.

आई काहीतरी उत्तर देणार तेवढ्यात घरकामासाठी    असणारी आजी आल्याने, हा विषय तेजोमयीनं थांबवला. आज आजी आल्याबरोबर आईने तिला चहा दिला. काहीतरी खायलाही दिलं. नेहमीपेक्षा अतिशय गोड, ती बोलत होती.

भांड्यांच्या व्यतिरिक्त ज्या दिवशी आजीकडून काही जादा काम करुन घ्यायचं असेल त्याच दिवशी आई प्रेमळ मूर्ती बनते, हे तेजोयमीच्या लक्षात आलं होतं. एरव्ही क्वचितच ती आजीला चहा देत असे. आजीच्या भांडे घासण्यालाही नाव-बोटं ठेवायची.

एकदोनदा तेजामयीने आईला, आजीशी दररोजच प्रेमाने कां वागत नाही? असं विचारलं तेव्हा, तू अजून लहान आहेस, तुला यातलं कळणार नाही, असं बोलून तिने तेजामयीस गप्प बसवलं.

तेजोयमीने आजी प्रकरणाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं असतानाच, तिच्या वाचनात ताकापुरती आजीचा संदर्भ आला. तिने त्याचा अर्थ शोधला. आपल्या घरकामासाठी येणारी आजीच हीच  ताकापुरती आजी असल्याचं तिच्या लक्षात आलं. तेव्हाच तिने आईची चूक लक्षात आणून देण्याचं ठरवलं. त्यातूनच तिने आधी ताकापुरती आजी दाखण्याचा हट्ट धरला. मग स्वत:च अशी आजी दाखवण्याची तयारी दर्शवली.

आज नेहमीच्या कामासोबतच गोड बोलून आईने आजीकडून बरीच कामं करुन घेतली. आजी गेल्याबरोबर तेजोमयी बाबांजवळ जाऊन म्हणाली.

आपल्या घरी येणारी कामवाली आजी ताकापुरती आजी आहे, बाबा.

आँ!”बाबा आणि आई एकाच वेळेला म्हणाले.

सांगू का, कसं ते?”

हो सांगना.

तेजोमयी बाबांजवळ जाऊन बसली. तिने अलेक्झांडरलाही जवळ बोलावलं. “तूसुध्दा ऐक रे. असं त्याला म्हणाली.

आणि मी?”आईने विचारलं.

तुला ऐकायचं असेल तर ऐक, पण उगाच माझ्यावर ओरडू नकोस.तेजोमयी म्हणाली.

अगं शहाणे,सांग की.

हे बघा बाबा, आज कामवाल्या आजीला आईने चहा दिला. नाश्ता दिला. तिच्याशी गोडगोड बोलली.

मग?”

अहो ती, असं नेहमी करत नाहीना!”

म्हणजे तू माझी हेरगिरी करतेस कां?”आई रागावून म्हणाली.

अगं तसं नाही. पण जातायेता ते दिसतना. तुला जेव्हा भांड्याशिवाय वेगळी कामं करुन घ्यायची असतात तेव्हाच तू आजीशी छान वागते. एरव्ही तुझं वागणं कोरडं असतं.

खरं की काय?” बाबांनी आईला विचारलं.

अहो, हिच्याकडे काही लक्ष देऊ नका. व्यवहाराचा भाग आहे तो. तिला नाही कळायचं ते.

अगं, पण काम असेल तेव्हा चांगलं वागायचं आणि एरव्ही नाही. याला काय अर्थ! हा कसला व्यवहार!” तेजोमयीनं विचारलं.

अच्छा तर अशी भानगड आहे म्हणायची ताकापुरत्या आजीची!” बाबा हसत म्हणाले.

म्हणायचं काय तुम्हाला?आई नाराजीनं म्हणाली.

अहो, सोप्प आहे, काम असेल तर गोड बोला नाहीतर हाटहूट करा. म्हणजे एखाद्याकडून ताक हवं असेल तरच चांगलं वागा, असा त्याचा अर्थ! तुम्ही आपल्या घरी येणाऱ्या कामवाल्या आजीला ताकापुरतीच करुन टाकलं. तेजोच्या बरोबर लक्षात आलं ते.

चुकलं कां माझं काही?”तेजोमयीने विचारलं.

नाही गं छबडे. मला वाटलं होतं मी वागते ते बरोबर. पण तू माझे डोळे उघडले. आपल्या घरी येणारी कामवाली आजी यापुढे कधीही तुला ताकापुरती वाटणार नाही.आई तेजोमयीला जवळ घेत म्हणाली. तेजोमयीच्या चेहऱ्यावर हसू आलं.

सुरेश वांदिले