(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मुलं जात्याच क्रिएटिव्ह म्हणजेच सर्जनशील असतात. त्यांना वेगळं काहीतरी म्हणजेच ऑफबिट करायची उर्मी असते. किंवा त्यांच्या मनात आणि ह्रदयात तसा किडा वळवळत असतो. पण ऑफबिट शिक्षण-अभ्यासक्रम- प्रशिक्षण हे झटपट करिअर घडवेल का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो.

कोणताही ऑफबिट अभ्यासक्रम  किंवा प्रशिक्षण हा कौशल्य निर्मितीला चालना देणारा असतो. याचा अर्थ हा अभ्यासक्रम केल्यावर एखादी कला किंवा तंत्र हस्तगत करता येणे शक्य होते. अशी कला किंवा तंत्र हे तुम्ही कशारीतिने वापरता किंवा त्याचा उपयोग करता यावर संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे अवलंबून असते. मात्र ज्यांच्या मनात ऑफबिटचा किडा वळवळत असतो, त्यांची गाडी सुसाट सुटू शकते.

फॅशन स्टायलिंग

दूरचित्रवाणीवरील विविधांगी कार्यक्रम आणि कोणत्याही लाइव्ह कार्यक्रमांमध्ये स्टायलिस्ट महत्वाची भूमिका बजावत असतो. संपूर्ण कार्यक्रमाचे देखणेपण, या स्टायलिस्टच्या कलाकारीवर अवलंबून असते. सध्याच्या काळात, अनेक कलाकार स्वत:चा व्यक्तीगत स्टायलिस्ट ठेवतात. कौन बनेगा करोडपतीमध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, यांच्या संपूर्ण सिझनच्या पेहराव (पोषाख-टाय-रुमाल-कफलिंग-पादत्राणे), यांचा सूक्ष्म विचार करण्यासाठी स्वतंत्र स्टायलिस्ट, प्रत्येक सिझन सुरु होण्यापूर्वी काही महिने तयारी करत असतो.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सहा महिने कालावधीचा क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग,हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. याअभ्यासक्रमात समकालीन फॅशनच्या संकल्पना,छायाचित्रणाचे तंत्र, सादरणीकरण तंत्र,पोषाखांचा कल, हेअर आणि मेक अप तंत्र, साहित्याची उपलब्धता, मॉडेल कास्टिंग, आदी बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी, हा अभ्यासक्रम करु शकतो. फॅशन स्टायलिंग आणि प्रतिमा संवर्धन कंपन्यांमध्ये करिअरची संधी मिळू शकते. भविष्यात स्वतंत्ररीत्या कार्य करता येणे शक्य होते.

संपर्क-एनआयएफटी, कॅम्पस,

प्लॉट नंबर १५,सेक्टर ४, खारघर, नवी मंबई ४१० २१०, दूरध्वनी-०२२-२७७४७०००, ईमेल-nift.mumbai@nift.ac.in ,संकेतस्थळ-https://ww.nift.ac.in/mumbai

०००

फॅशन फोटोग्रॅफी

सर्व जगात सातत्याने फॅशन संदर्भात नवे प्रवाह आणि कल येत असतात. त्याचे उत्तम आणि उत्कृष्ट सादरीकरण करुन ते लोकापर्यंत प्रभावीरीत्या नेण्याचे कार्य फॅशन फोटोग्रॅफर करतात. फॅशन फोटोग्रॅफीमध्ये करिअर करता येणे सुलभ होईल असा, सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन फोटोग्रॅफी, हा अभ्यासक्रम पर्ल ॲकॅडमीने सुरु केला आहे. या, अभ्यासक्रमात डिझायनिंगच्या मुलभूत बाबी, फॅशनचा इतिहास आणि उत्क्रांती, कॅमेरा-लेन्स-लाइट- लाइट मॉडिफायर्स यांच्या तांत्रिक बाबी, डिजिटल डार्करुम, फॅश्न मॉडलेचे पोर्टफोलिओ (बायोडाटा) निर्मिती,फॅशन फोटोग्रॅफीमधील व्यवसाय संधी, इत्यादी बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते.

फॅशन मॅगेझिन, ॲडव्हटार्यजिंग एजंसी, फॅशन हाऊसेस, फॅशन डिझायनर्स, फॅशन शो ऑर्गनायझर,फॅशन ब्लॉगर, फॅशन इंफ्लयुंसर्स, मॉडेलिंग एजंसी यामध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते.

संपर्क– एस.एम सेंटर, अंधेरी कुर्ला रोड, मरोळ स्टेशनच्या बाजूला, अंधेरी पूर्व,मुंबई-४०००५९, दूरध्वनी-०२-४०५८५४००, ईमेल- registrar.mumbai@pearlacademy.com,संकेतस्थळ- https://pearlacademy.com

००००

इलुस्ट्रेशन फॉर फॅशन इंडस्ट्री

मार्केटमध्ये दर पंधरवाडयात किंवा महिन्यात नवे आकर्षक असे पोषाख आणि वेगवेगळया प्रकाराचे परिधान येतात. फॅशनच्या नव्या आकर्षक कल्पना या आधी कागदावर उतरतात. फॅशन डिझायनिंगची, पहिली कल्पना कागदावर उतरवण्याचे कौशल्य प्राप्त केलेल्या, इलुस्टेशनकारास किंवा रेखाटनकारकास महत्वाचे स्थान मिळतं. या विषयाशी, अभ्यासक्रम, नॅशनल इंस्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, या संस्थेच्या दिल्ली कॅम्पसयेथे सुरु उकरण्यात आला आहे. कालावधी-सहा महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. या कलेत जितकी पारंगतता मिळवू,तितकी अधिक संधी हे मात्र ध्यानात ठेवायला हवे.

संपर्क- नॅशनल इंस्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,हौज खास,गुलमोहर पार्क जवळ,नवी दिल्ली-११००१६,दूरध्वनी-०११-२६८६७७०४,ईमेल-campusdirectordelhi@gmail.com,director.delhi@nift.ac.in संकेतस्थळ-https://www.nift.ac.in/delhi

सुरेश वांदिले

०००