२०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने, चार वर्षे कालावधीचा, “बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल सायन्सेस ॲण्ड इंजिनिअरिंग सायंस”, हा नवा अभ्यासक्रम सुरु केला आहे. शरीरक्रियाशास्त्र (फिजिऑलॉजी) आणि मुलभूत अभियांत्रिकी, या दोन विषयघटकांची सांगड, या अभ्यासक्रमात घालण्यात आली आहे. त्यामुळे शरीरक्रियाशास्त्र समजणं सुलभ जाऊ शकतं. या अभ्यासक्रमामध्ये शरीरक्रियाशास्त्रचा सखोल अभ्यास करण्यासाठी मशिन लर्निंग, मेडिकल इमेजिंग, मुलभूत गणितीय पध्दतीचा अवलंब केला जातो.
स्पेशलायझेशन
या अभ्यासक्रमांतर्गत पुढील स्पेशलायझेशनचा समावेश आहे-(१) ऑर्गन स्पेसिफिक डिव्हाइस डेव्हलपमेंट (वेगवेगळया इंद्रियांच्या उपकरणांचा विकास), (२) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲप्लाइड टू हेल्थ (आरोग्याशी निगडित कृत्रिम प्रज्ञा किंवा विदा), (३) मेडिकल इमेज ॲनॅलिसीस, (वैद्कीय प्रतिमा विश्लेषण), (४) क्वांटिटेटिव्ह फॉर्माकॉलॉजी (परिणात्मक औषधशास्त्र), (५) ड्रग डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट (औषध अभिकल्प आणि विकास), (६) फंडामेंटल फिजिऑलॉजिकल सायन्स (मुलभूत शरीरक्रियाशास्त्र)
वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकी शाखेतील दरी बुजवण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम या दोन्ही शाखेतील तज्ज्ञांकडून शिकवला जाईल. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
अर्हता- २०२४ आणि २०२५ या वर्षी १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरु शकतात. संबंधित विद्यार्थ्याने १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. शिवाय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांपैकी कोणतेही दोन विषय त्याने १२ वीत घेतलेले असावे. तीन वर्षे कालावधीची तांत्रिक विषयाची पदविका प्राप्त विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरु शकतात. १२वी मध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्के तर राखीव संवर्गातील विद्यार्थ्याना ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) मार्फत घेण्यात येणारी आयसर ॲडमिशन टेस्ट मधील गुण ग्राह्य धरले जातील. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट द्यावी लागेल. त्याचबरोबर संस्थेचा अर्जही भरावा लागेल.
हा अभ्यासक्रम तुलनेने नवा असला तरी, भविष्यात या ज्ञानशाखेतील उमेदवारांची मोठी गरज भासू शकते.त्यामुळे हा अभ्यासक्रम केल्यावर या ज्ञानशाखेतील वेगवेगळया करिअरसंधी मिळू शकतात.हा अभ्यासक्रम आयआयटी मद्रासमध्ये करता येत असल्याने,उत्कृष्ट पायाभूत सुविधा,प्रात्यक्षिकांची सोय,दर्जेदार प्राध्यापक आणि प्लेसमेंट अशा अनेक बाबींचा लाभ आपसुकच विद्यार्थ्यांना मिळतो.
०००
एम.एस(मास्टर ऑफ सायंस) इन मेडिकल सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग.
या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
अर्हता- (१)बॅचलर इन- बायोमेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, बाायोलॉजिकल/ बायोकेमिकल सायंसेस, केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायंस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनीअरिंग फिजिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, मेकॉट्रॉनिक्स, मेटॅलर्जिकल,मटेरिअल सायंस, प्रॉडक्शन/ मॅन्युफॅक्चुरिंग, रोबोटिक्स/ऑटोमेशन, (२) बीएस इन-इलेक्ट्रॉनिक्स,बीएस इन डाटा सायंस, (३) बॅचलर इन डिझाइन, (४)बॅचलर ऑफ फिजिओथेरपी/स्पोर्ट्स फिजिओथेरपी,स्पोर्ट्स सायंस, (५)एमबीबीएस,बीडीएस. या पैकी कोणत्याही विषयांतील पदवी मिळवलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतातत.
प्रवेशासाठी संबंधित विषयातील गेट -(ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. एमबीबीएस आणि बीडीएस उमेदवारांसाठी नीट(नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-पीजी)पोस्ट ग्रॅज्युएट,या परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो.
याच विषयात पीएचडी करण्याची सुविधा संस्थेने उपलब्ध करुन दिली आहे.
संपर्क- डिपार्टमेंअट ऑफ मेडिकल सायंसेस ॲण्ड टेक्नॉलॉजी,इंडियन इंस्टिट्यूटअ ऑॅफ टेक्नॉलॉजी मद्रास,चेन्नई- ६०००३६,दूरध्वनी- ०४४- २२५७२१००
००००