‘बिब्लीओबिबुलीचा सापळा!
या पुस्तकाविषयी ज्येष्ठ समिक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे यांची प्रतिक्रिया………
‘बिब्लीओबिबुलीचा सापळा!’ ही एक सुंदर किशोरकादंबरी आहे. या कादंबरीत काय नाही? खिळवून ठेवणारे कथन आहे. सहजप्रवाही निवेदन आहे. कल्पित आणि अद्भुताचा स्पर्श असलेला घटनाक्रम आहे. ‘पुस्तक’ या विषयावर अभूतपूर्व अशी ही रहस्यकथा देखील आहे. थोडक्यात उत्तम कथा-कादंबरीसाठी आजच्या घडीला जे नावीन्यपूर्ण तंत्र अपेक्षित आहे, त्याचा फार कौशल्याने वापर लेखक सुरेश वांदिले यांनी या कादंबरीत केला आहे.
बालसाहित्य हा मराठीत अतिशय दुर्लक्षित राहिलेला प्रकार आहे. विंदा करंदीकर आणि विजय तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज लेखकांनीही बालसाहित्यात भर घातली आहे, हे लक्षात घेऊनही हे विधान करावे लागते. बालसाहित्याचे महत्त्व खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि साहित्यविश्वाला कळलेच नाही. बंगाली भाषेत तेथील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावंत लेखक बालकांसाठी कथा-कविता लिहितात. प्रौढांच्या साहित्याइतकाच व्यापक असा बालसाहित्याचा व्यवहार आहे. बालकांसाठी साहित्याची, निर्मिती, विक्री, वितरण, वाचनालये आणि त्या आधारित बालकांचा वाचनव्यवहार हा जितका व्यापक, तेव्हढा त्या भाषेविषयी मुलांना प्रेम वाटते. पुढे प्रौढ झाल्यानंतर ‘साहित्य’ आणि ‘वाचन’ या सर्जनशील व्यवहाराचे ते भाग बनतात. त्यामुळे त्या भाषेतील एकूणच साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृती रुंदावते, असा बंगाली भाषेतील लेखकांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर आपण मराठीतील बालसाहित्याच्या निर्मिती आणि ग्रंथव्यवहाराची तुलना करून पाहावी. आपल्याला निराशाजनक दृश्य दिसते. मराठीत बालपणापासून मुलांना वाचनाची गोडी लागेल असे साहित्य त्यांच्यापर्यंत पोचत नाही, ही वस्तूस्थिती आहे. अभ्यासक्रमातील पुस्तकासोबतच प्रत्येक मुलाच्या हाती चित्रमय कथा-कविता पडल्या तर भाषिक निर्मितीचा त्यांना परिचय होतो. ‘भाषा’ हे किती सर्जक भांडवल आहे, त्यातून किती प्रकारे आपण अभिव्यक्त होऊ शकतो, स्वप्न पाहू शकतो, वास्तवाची पुनर्निमिती करू शकतो याची जाण त्यांना येते. सातत्यपूर्ण वाचनातून त्यांना लेखनाचीही प्रेरणा मिळते. या संदर्भात मराठीत फार अत्यल्प प्रयत्न होताना दिसतात. पूर्वी बालवाचकांसाठी मराठीत काही मासिके होती. साने गुरुजींपासून तर भा. रा. भागवत-ना. धो. ताम्हणकर, अशी चांगली परंपराही होती. पण पुढे ती खुंटली.
बालकथा किंवा कवितांची निर्मिती करताना लेखकाला बालकांच्या मनोविश्वात प्रवेश करावा लागतो. म्हणजे बालमानसशास्त्राची माहिती असावी लागते असे नव्हे. तर बालकांच्या मनोविश्वात बाहेरच्या जगाच्या समांतर असे जे विश्व असते, ते समजून घ्यावे लागते. त्यासाठी लेखकाला तर्क आणि औपचारिक विचारप्रक्रियेच्या पलीकडे असलेल्या बालकांच्या अद्भुत कल्पनासृष्टीत प्रवेश करावा लागतो. या प्रवेशाचा मार्ग सोपा नसतो. आपले शिक्षण, वय, व्यवसाय आणि अनुभव यांना पूर्णपणे तिलांजलि द्यावी लागते. मुलं एखाद्या झाडाशी बोलतात. निर्जीव खेळण्यांशी रमतात. प्राण्यांशी संवाद साधतात. ती संवादाची पातळी लेखकाला गाठावी लागते, तेंव्हा ते उत्कृष्ट निर्मिती करू शकतात. हे एक आव्हानच असते.
लेखक सुरेश वांदिले यांनी हे आव्हान स्वीकारले आहे, असे त्यांच्या आजवरच्या एकूण लेखनाकडे पाहताना जाणवते. ते लेखनाकडे केवळ छंद, फावल्या वेळचा उद्योग किंवा जोडधंदा या दृष्टीने पाहत नाहीत. त्यांना ती एक सांस्कृतिक जबाबदारी वाटते. गेली तीन दशके ते लेखन करीत आहेत. विशेषत: मराठीत दुर्लक्षित साहित्य प्रकारात ते जाणीवपूर्वक लेखन करतात. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत जबाबदारीच्या सेवेत राहूनही त्यांनी मराठी तरुणांना उच्च शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी यावर दीर्घकाळ प्रसारमाध्यमातून सातत्याने लेखन केले आहे. पण वांदिले यांचे ललित साहित्य हे अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्या दिवाळी अंकातील कथा विनोदी ढंगाच्या असतात. पण त्यातील मुख्य पात्रे एका विशिष्ट भौगोलिक आणि सांस्कृतिक पर्यावरणातील असतात. त्यामुळे प्रमाणभाषा आणि बोली यांचे एक वेगळे रसायन त्यांच्या या भाषिक निर्मितीत दिसतात. या सातत्यपूर्ण लेखनाने सुरेश वांदिले यांनी मराठी साहित्य व्यवहारात एक स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
परंतु सुरेश वांदिले यांचे बालसाहित्य मला अधिक महत्त्वाचे वाटते. याचे कारण बालसाहित्याकडे ते भाबडेपणाने किंवा काळ्यावर पांढरे करून लेखक म्हणून मिरवावे, या दृष्टीने पाहत नाहीत. तर आपल्या प्रत्येक लेखनात ते आपल्या भाषिक निर्मितीच्या किती शक्यता आहेत, याचीच ते चाचपणी करीत असतात. म्हणून त्यांच्या अशा प्रकारच्या प्रत्येक आविष्कारात ते नवनवीन प्रयोग करतात.
आता याच ‘बिब्लीओबिबुलीचा सापळा!’ या कादंबरीचे उदाहरण घेतले तरी ते स्पष्ट होते. वाचन आणि पुस्तके हे या कादंबरीचे मुख्य संभाषित आहे. पण ही कादंबरी तेजोमयी या छोट्या मुलीची आहे. तिच्या आई-बाबांची, आजीची आहे. त्यापेक्षाही अलेक्झांडर या कुत्र्याची आहे. या कादंबरीत आणखी अनेक पात्रे आहेत. त्यात बाबासाहेब (डॉ. आंबेडकर) आहेत. शिवाजी महाराज आहेत. गणेश, हनुमान आणि कृष्ण आहेत. शिवाय परी आहे. आणखी अमिताभ, हृतिक आणि आर्यनमॅन देखील आहेत. या सर्वांशी तेजोमयीचा संवाद आहे. आणि एकूण या कादंबरीचा अवकाश केवळ ‘पुस्तक’ या गोष्टीने भरला आहे. एरवी बालकथेत बाग-बगीचा, फुले-फुलपाखरू, परी आणि चॉकलेटचा बंगला वगैरे असतो. याही गोष्टी या कादंबरीत आहेतच. पण केंद्रस्थानी आहे, पुस्तक आणि वाचन.
वस्तुत: पुस्तक हा तसा मोठ्यांचा गंभीर विषय. पण तेजोमयीच्या घरात, तिच्या भावविश्वात आणि स्वप्नभूमीत पुस्तके आहेत. त्या अनुषंगाने पुस्तकांचे कपाट आहे. वाचनालय आहे. पुस्तकांची दुकाने आहेत. जुन्या पुस्तकांचे विक्रेते आहेत. वर्तमानपत्रातील पुस्तक परीक्षणे आहेत. साहित्य संमेलन आहे. यातूनच या कादंबरीत पुस्तकविषयक शास्त्रीय संज्ञा साकारते. पण ती त्या कादंबरीच्या कथानकाचा भाग म्हणून येते. तेजोमयीचे बाबा तिला एक गोष्ट सांगतात. ती BIBLIOBIBULI आणि BIBLIOPHILE ची गोष्ट असते. म्हणजे सतत पुस्तक वाचणाऱ्याची आणि पुस्तकांचा संग्रह करणाऱ्याची गोष्ट. ही नावे लॅटिन आणि फ्रेंच आहेत. आणि पुस्तकासंबंधीच्या ज्ञानशाखेतील मूळ संकल्पनेतील आहेत. म्हणजे वर वर पाहता ‘बिब्लीओबिबुलीचा सापळा!’ या कादंबरीच्या सुरवातीच्या घरगुती-कौटुंबिक वातावरणातून आपण एक विशाल विश्वात कधी प्रवेश करतो, ते वाचकालाही कळत नाही. हा प्रवास काहीसा गूढ आणि थक्क करणारा देखील आहे. आणि हेच कोणत्याशी यशस्वी कादंबरीच्या वाचनीयतेचे आणि मौलिकतेचे खरे रहस्य असते.
थोडक्यात, वाचकांना एका नवलाईच्या जगाची सफर करून आणणारी कथा म्हणून ती ‘नॉव्हेल’. ही अपेक्षा पूर्ण करणारी ही कादंबरी आहे. कुमारवयीन वाचकांची अफाट कल्पकता आणि आभासी विश्वाचे आकर्षण लक्षात घेऊन सुरेश वांदिले यांनी कादंबरीच्या प्रत्येक घटकात नवलाई आणली आहे. कथनशैलीत, पात्र रचनेत, संवादात आणि कादंबरीचा विषय तर अफलातून नवीन आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचकांना आवडली नाही तरच नवल.
या कादंबरीसाठी सुरेश वांदिले यांचे अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
प्रमोद मुनघाटे, नागपूर
(‘बिब्लीओबिबुलीचा सापळा!, प्रकाशक -ग्रंथाली,संपर्क- ०२२-२४२१६०५०,granthalibooks2@gmail.com)