कॉमन एंट्रन्स टेस्ट (कॅट) या परीक्षेच्या गुणांवर आधारित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबतच (आयआयएम) इंडियन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रारंभिक निवड केली जाते. सध्या देशातील १० आयआयटी मध्ये एमबीए अभ्यासक्रम यावर चित्र काढून दे.चालवला जातो. उद्योगांना उत्तम प्रतिचे तंत्रोव्यवस्थापक मिळावे या अनुषंगाने, आयआयटीमधील एमबीए अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
या एमबीए अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरांना प्रवेश मिळू शकतो. या एमबीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.
या आयआयटी पुढील प्रमाणे आहेत- (१) आयआयटी- मुंबई, (२)आयआयटी-मद्रास, (३)आयआयटी-कानपूर, (४)आयआयटी-दिल्ली, (५)आयआयटी-धनबाद, (६)आयआयटी-जोधपूर, (७)आयआयटी-रुरकी, (८) आयआयटी-मंडी, (९) आयआयटी-खरगपूर, (१०) आयआयटी-गौहाटी.
आयआयटीच्या कॅम्पसमध्येच एमबीएची संस्था असते. त्यामुळे आयआयटीच्या सर्व पायाभूत सोईसुविधांचा लाभ आणि आयआयटी ब्रँडचाही लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. आयआयटीच्या एमबीए प्लेसमेंटसाठी देशातील नामवंत कंपन्या येतात. आयआयटीतील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन, तंत्रकौशल्याचा लाभ, एमबीए अभ्यासक्रमासाठीही मिळतो. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी, कायमस्वरुपी उच्च प्रशिक्षित अध्यापक असतातच शिवाय, उद्योग जगतातील नामवंत तज्ज्ञही शिकवायला येतात. विद्यार्थ्यांना हमखास इंटर्नशीपची संधी मिळते. त्यामधून अनेकांना, प्री प्लेसमेंट ऑफर म्हणजेच शिकत असतानाचा नोकरीची ऑफर मिळते. सर्वच संस्थांमध्ये १०० टक्के प्लेसमेंट होत असते. काही आयआयटीमधील एमबीए विद्यार्थ्यांना, अनेक आयआयएमपेक्षा चांगले वार्षिक पॅकेज मिळते. काही आयआयटीमधील एमबीए अभ्यासक्रमांना, नॅशनल इंस्टिट्यूशनल फ्रेमवर्क रॅकिंग (एनआयआरएफ) मध्ये, बऱ्याच आयआयएमपेक्षा वरचा क्रमांक मिळाला आहे. उदा- दिल्ली आयआयटी एमबीएचा एनआयआरएफ क्रमाक ४ आहे, मुंबई आयआयटी एमबीएचा क्रमांक १०, आयआयटी मद्रास एमबीए क्रमांक १६, आयआयटी रुरकी एमबीए क्रमांक १८, आयआयटी खरगपूर एमबीए क्रमांक १९ आहे.
आयआयटीमधील एमबीएचे, शिक्षण शुल्कही इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटपेक्षा तुलनेने कमी असते. काही विद्यार्थ्यांना ते जास्त वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा विद्यार्थ्यांना, सुलभतेने शैक्षणिक कर्ज मिळू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकासोबतच खाजगी क्षेत्रातील बँकाही, आयआयटी ब्रँड लक्षात घेऊन विनासायास शैक्षणिक कर्ज देतात. मुलींना व्याजदरात अर्धा टक्के सुट दिली जाते. बहुतेक एमबीए अभ्यासक्रम हे निवासी स्वरुपाचे आहेत. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आयआयटी परिसरातच वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
निवड प्रक्रिया
आयआयटीमधील एमबीए प्रवेशासाठी, कॅट परीक्षेतील गुणांचा उपयोग प्रारंभिक निवडीसाठी केला जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कॅट परीक्षा दिली असेल, तेच विद्यार्थी आयआयटी मधील एमबीएसाठी पात्र ठरतात. अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक आयआयटी मधील एमबीए प्रवेशासाठी कॅटमधील गुणांसह स्वतंत्ररित्या अर्ज करावा लागतो. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या निवडक उमेदवारांना, या गुणांच्या आधारे, पुढील टप्प्याच्या प्रवेश प्रकियेसाठी निवड केली जाते. या निवडक उमेदवारांची संख्या, संबंधित संस्थेतील एकूण प्रवेश संख्येच्या ५ ते १० पट राहू शकते. या उमेदवारांना संस्थेच्या कॅम्पसमध्ये मुलाखत, समूह चर्चा किंवा लेखन कौशल्य चाचणी अशा टप्प्यांसाठी निवडले जाते. कॅटमधील गुण, दहावी- १२वी- पदवीमधील गुण-मुलाखत/समूह चर्चेतील गुण-कार्यानुभव, मुलींसाठी विशेष गुण, इतर कामगिरी, अशा घटकांवरच्या एकत्रित गुणांवर अंतिम निवड केली जाते. प्रत्येक आयआयटीच्या मॅनेजमेंट स्कूलच्या अंतिम निवडीसाठी वेगवेगळ्या अर्हता वापरल्या जातात. त्याची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.(अपूर्ण)
सुरेश वांदिले