इंडियन इंस्टिट्यूट मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्था नित्यनेमाने कालसुसंगत नवे नवे अभ्यासक्रम सुरु करत असतात. केवळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या या संस्थांनी गेल्या काही वर्षात पदवीस्तरीय अभ्यासक्रमही सुरु केले आहेत. यंदाच्या (२०२६) शैक्षणिक वर्षापासून आयआयएम मुंबई, आयआयएम लखनौ, आयआएएम जम्मू, आयआयएम कोझिकोड आणि आयआयएम उदयपूरने चार वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार या अभ्यासक्रमात विविध टप्प्यांवर शिक्षण सोडण्याचे लवचिक पर्याय समाविष्ट आहेत.
आयआयएम – मुंबई
या संस्थेने सुरु केलेला ‘बीएस (बॅचलर ऑफ सायंस) इन डिजिटल सायन्स अँड बिझनेस मॅनेजमेंट’, हा पूर्णवेळ निवासी अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आणि विविध औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांची सांगड घातली जाईल. डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी कुशल नेतृत्वाची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना तयार करण्यात आली आहे. माहिती(डेटा)वर आधारित निर्णय घेण्याची विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करणे, त्यांच्यात नवीन शोध घेण्याची वृत्ती आणि व्यावहारिक अनुभव विकसित करणे यावर भर दिला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी – एकमेकांशी जोडलेली डिजिटल उपकरणे), रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान विषयांची, मार्केटिंग (विपणन/ बाजारपेठ व्यवस्थापन), फायनान्स (वित्त), ऑपरेशन्स (कामकाज व्यवस्थापन) आणि स्ट्रॅटेजी (रणनीती) अशा पारंपारिक व्यवस्थापन विषयांसोबत या अभ्यासक्रमात सांगड घातली जाईल.
प्रत्येक वर्षाच्या शेवटी उद्योगांमधील प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी इंटर्नशीपची सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांवर (लाइव्ह प्रोजेक्ट्स) काम करण्याची संधी दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढेल.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीच्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना गणित, सांख्यिकी, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्त्वांचे शिक्षण दिले जाईल. पुढील सत्रांमध्ये प्रगत तंत्रज्ञान (डिजिटल व्यवसाय प्रणाली) आणि इंडस्ट्री ४.० (चौथी औद्योगिक क्रांती) च्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाईल. शेवटच्या वर्षात व्यावहारिक समस्या सोडवणे आणि स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग (धोरणात्मक निर्णय प्रक्रिया) यावर आधारित विषय असतील. डेटा ॲनॅलिटिक्स (माहितीचे विश्लेषण) आणि बिझनेस इंटेलिजन्स (व्यावसायिक कौशल्य ज्ञान) याद्वारे प्रत्यक्ष उद्योगांमधील आव्हानांना सामोरे जाण्याची विद्यार्थ्यांची तयारी केली जाईल. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट एक वर्षाचा एमबीए करण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल.
अर्हता- मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा संस्थेतून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा. खुला प्रवर्ग, ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि इतर मागासवर्गीय – (नॉन क्रिमीलेअर) प्रवर्गातील उमेदवारांना बारावीत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण मिळायला हवे.
प्रवेश प्रक्रिया
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई– मेन २०२६ पेपर-एक मधील गुणांचा आधार घेतला जाईल. इच्छूक विद्यार्थ्यांना आयआयएम मुंबईच्या अधिकृत प्रवेश पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील. परत न मिळणारे शुल्क (नॉन रिफंडेबल) भरावे लागेल.
प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार करण्यासाठी जेईई–मेन मधील गुणांना ७० टक्के वेटेज (महत्त्व/भार) दिले जाईल आणि वैयक्तिक मुलाखत फेरीला ३० टक्के वेटेज दिले जाईल. या दोन्ही फेऱ्यांमधील एकत्रित कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
संपर्क – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, विहार लेक रोड, पवई, मुंबई- ४०००८७, दूरध्वनी -०२२-२८५७३३७१ / ०२२-२८०३५३१७, ईमेल – admissions@iimmumbai.ac.in (प्रवेश प्रक्रियेच्या चौकशीसाठी) / ug.admissions@iimmumbai.ac.in (पदवीपूर्व प्रवेशासाठी), संकेतस्थळ –https://iimmumbai.ac.in
०००
(२) आयआयएम उदयपूर
या संस्थेन बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या ध्येयाशी सुसंगत असून त्यात समावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देण्यात आले आहे. याची संरचना वैशिष्ट्यपूर्ण असून तो हिंदी आणि इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करता येतो. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:च्या क्षमतेच्या विकासाची संधी दिली जाते. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसोबत सध्याच्या व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रगती करू इच्छिणारे व्यावसायिक आणि दुसरी पदवी घेऊ इच्छिणारे पदवीधर करु शकतात. हा अभ्यासक्रम ऑनलाइन असून आधीच ध्वनीमुद्रित केलेल्या शैक्षणिक साहित्यामुळे काम, अभ्यास किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या गतीने शिकता येते.
या अभ्यासक्रमाचे चार शैक्षणिक टप्पे आहेत. पहिल्या वर्षानंतर अभ्यासक्रम सोडल्यास प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षी अभ्यासक्रम सोडल्यास पदविका, तिसऱ्या वर्षी अभ्यासक्रम सोडल्यास बीबीए पदवी आणि चौथ्या वर्षी बीबीए (ऑनर्स) ही पदवी प्रदान केली जाते. प्रत्येक टप्प्यातून बाहेर पडल्यावर पुन्हा प्रवेश घेण्याचा पर्याय दिला जातो.
काय शिकाल?
पहिले वर्ष – कामाच्या ठिकाणी टिकून राहण्याचे कौशल्य आणि उद्योजकता यावर भर दिला जातो. हा प्रमाणपत्रस्तरीय अभ्यासक्रम आहे. रोजगारक्षमता किंवा व्यवसाय, वित्त, डिजिटल कौशल्ये यांचा पाया तयार केला जातो.
वर्ष दोन- एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) आणि व्यवसाय करण्यासाठीची सज्जता यावर भर दिला जातो. हा पदविकास्तरीय अभ्यासक्रम आहे. एमएसएमई आणि सेवा संस्थांमधील मनुष्यबळ प्रक्रिया आणि ऑपरेशन्स (कामकाज) याचे ज्ञान प्रदान केले जाईल.
वर्ष तीन- व्यूहरचना आणि नेतृत्व विकास यावर भर दिला जातो. हा अभ्यासक्रम पदवीस्तरीय (बीबीए) आहे. व्यवसाय वृद्धीसाठी नेतृत्व आणि व्यूहात्मक निर्णय घेण्याची कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो.
वर्ष चार- उच्च शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय करिअर करण्यासाठी जागतिक अनुभव आणि संशोधन सज्जता मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बीबीए ऑनर्स’ ही पदवी दिली जाते.
अर्हता- कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणमंडळ किंवा ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग’ मधून कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण किंवा कोणतीही पदविका.
अर्ज प्रक्रिया
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरल्यावर सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा लागेल.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतीही चाळणी परीक्षा नाही. १२ वी परीक्षेतील गुण आणि कागदपत्र पडताळणीवर ही प्रक्रिया आधारित आहे. गुणवत्ता आणि गरजेवर आधारित शिष्यवृत्ती मिळू शकते. टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्क भरता येते.
संपर्क- बीबीए ॲडमिशन्स ऑफिस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बलिचा, उदयपूर, ३१३००१, दूरध्वनी- ८८५२०१८८२२/८८५४०१८८२२, ईमेल-admissions.bba@iimu.ac.in
०००
(३) आयआयएम जम्मू
आयआयएम जम्मूने, अॅक्सेंच्युर सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज यांच्या सहकार्याने ई-बीबीए ऑनर्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. आयआयएमची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग जगतातील प्रत्यक्ष अनुभव यांचा, या अभ्यासक्रमात समन्वय साधला जाईल. उद्योगाभिमुख अभ्यासक्रम शिकण्याची आणि इंटर्नशिप (उद्योगांतर्गत प्रशिक्षण) द्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळते. विद्यार्थी भविष्यातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करू शकतात
काय शिकाल?
व्यवस्थापनाच्या शिक्षणासोबत बाजारपेठेला आवश्यक असलेल्या प्रगत क्षेत्रांचे ज्ञान प्रदान केले जाते. यामध्ये क्लाउड (संगणकीय मेघप्रणाली), डेटा (माहिती किंवा आकडेवारी), एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर (डिजिटल पायाभूत सुविधा) आणि एआय बिझनेस ॲप्लिकेशन्स (कृत्रिम बुद्धिमत्तेचे व्यावसायिक उपयोजन) यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी, ऑन-कॅम्पस (कॅम्पसमध्ये उपस्थित राहून) आणि ऑफ-कॅम्पस (ऑनलाइन पद्धतीने) अशा मिश्र पद्धतीचा अवलंब केला जाईल. हँड्स-ऑन लॅब्स (प्रत्यक्ष प्रयोगशाळा सराव) द्वारे शिकलेल्या गोष्टींचा सराव करता येतो. केस स्टडीज व्यावसायिक घटनांचा अभ्यास) आणि प्रोजेक्ट वर्क (प्रकल्प कार्य) च्या माध्यमातून उद्योगातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प पूर्ण करता येतात. विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स (ध्वनिमुद्रित व्याख्याने) केव्हाही पाहण्याची सोय उपलब्ध आहे. याशिवाय दरवर्षी आयआयएम कॅम्पसला प्रत्यक्ष भेट द्यावी लागते. (अपूर्ण)
०००