(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
  • आयआयएम लखनौ

    या संस्थेने बीएस (बॅचलर ऑफ सायंस) इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड बिझनेस ॲनालिटिक्स, हा निवासी पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात व्यवस्थापन क्षेत्रातील कौशल्यांना, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि डेटा सायन्स या आधुनिक विषयांची जोड दिली जाते. लखनौ हे भारताचे पुढील ‘एआय सिटी’ (कृत्रिम बुद्धिमत्ता शहर) म्हणून विकसित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना येथील स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान परिसंस्थेचा फायदा मिळेल.

अर्हता- २०२५ किंवा २०२६ मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा. प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात येतील.

काय शिकाल?

पहिले वर्ष रेषीय बीजगणिताचा पाया, संभाव्यता आणि सांख्यिकीय सारांश, संगणकीय गणित आणि तर्कशास्त्र, पायथन प्रोग्रॅमिंगची ओळख, वेब आणि मोबाइल ॲप निर्मिती, डेटा इंजिनिअरिंग, संगणकाची पायाभूत रचना (ऑपरेटिंग सिस्टिम आणि नेटवर्क), माहिती संरचना आणि अल्गॉरिदम, कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत तत्त्वे.

दुसरे वर्ष मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगसाठी अनुकूलन, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, माहिती संचयन प्रणाली, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, सर्जनशील विचार प्रक्रिया, माहिती संकलन आणि उत्खनन, मोठ्या प्रमाणावरील डेटाची संगणकीय प्रक्रिया, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचा प्रत्यक्ष सराव, जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूलभूत मॉडेल्स (प्रारुप).

तिसरे वर्ष क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणाली, माहितीचे दृश्य स्वरूपात सादरीकरण, लार्ज लँग्वेज मॉडेल, संगणकीय दृष्टी तंत्रज्ञान, नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि संवाद, जबाबदार आणि स्पष्टीकरणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता, सामाजिक नेटवर्क विश्लेषण, मार्केटिंग (विपणन), मानवी संसाधन, फिनटेक (वित्तीय तंत्रज्ञान), पुरवठा साखळी मधील डेटा विश्लेषणाचा अभ्यास.

चौथे वर्ष विद्यार्थ्यांना विविध इलेक्टिव्ह्ज (पर्यायी किंवा आवडीचे विषय) निवडता येतील. एक, प्रकल्पकार्य किंवा शोधनिबंध पूर्ण करावा लागेल.

ड्युअल डिग्री आणि इतर पर्यायविद्यार्थ्यांना ‘टेक-एमबीए’ (तंत्रज्ञान व्यवस्थापन पदवी) चा पर्याय निवडता येईल. त्यामुळे त्यांना बीएस सोबतच एमबीएची पदवी मिळेल. जागतिक पातळीवरील नामांकित विद्यापीठांमध्ये बीएस नंतर एक वर्षाचा एमएस किंवा एमबीए करण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल.

जेईई ॲडव्हान्स्ड  परीक्षेतील गुणांच्या कामगिरीवर आधारित गुणवत्तेनुसार शुल्क माफी किंवा शिष्यवृत्ती मिळू शकते.

    संपर्क आयआयएम, प्रबंध नगर, आयआयएम रोड, लखनौ – २२६०१३, ईमेल bsai_admission@iiml.ac.in,संकेतस्थळ- iiml.ac.in

०००

(२) आयआयएम कोझिकोड

या संस्थेने ‘बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज’  हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात व्यवस्थापन शिक्षणासोबतच लिबरल आर्ट्स (मुक्त कला), मानव्यविद्या, आणि डेटा ॲनॅलिटिक्स (माहिती विश्लेषण) यांची सांगड घातली जाईल. हा अभ्यासक्रम आयआयएम कोझिकोडच्या, कोची कॅम्पसमध्ये चालवला जातो. हा अनिवासी (कॅम्पसबाहेर राहून शिकणारा) अभ्यासक्रम आहे.

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर बाहेर पडण्याचा पर्याय देतो- पहिल्या वर्षानंतर बाहेर पडल्यास सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट मिळेल, दुसऱ्या वर्षानंतर बाहेर पडल्यास डिप्लोमा इन मॅनेजमेंट मिळेल, तिसऱ्या वर्षानंतर बाहेर पडल्यास बीबीए / बीएमएस पदवी मिळेल. ४ वर्षे पूर्ण केल्यास, बीएमएस ऑनर्स विथ रिसर्च पदवी मिळेल.

अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. खुला संवर्ग, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना १० वी आणि १२ वी या दोन्ही परीक्षांमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग  प्रवर्गातील उमेदवारांसाठी १० वी आणि १२ वी दोन्ही परीक्षांमध्ये किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक.

प्रवेश प्रक्रिया

टप्पा एक- ‘आयआयएमके बीएमएस ॲप्टिट्यूड टेस्ट’ (आयआयएम कोझिकोडची स्वतःची ऑनलाईन प्रवेश परीक्षा) द्यावी लागेल. या परीक्षेत इंग्रजी, गणित आणि तार्किक क्षमता यावर आधारित प्रश्न विचारले जातील.

टप्पा दोन– प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट (पात्र) झालेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.

टप्पा तीन- अंतिम गुणवत्ता यादी  तयार करताना प्रवेश परीक्षेला ५० टक्के, मुलाखतीला ३० टक्के आणि १० वी व १२ वीच्या गुणांना २० टक्के गुणभार (वेटेज) दिले जाईल.

काय शिकाल?

पहिल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना, अर्थशास्त्र, सांख्यिकी, बिझनेस कम्युनिकेशन (व्यावसायिक संवाद), मानसशास्त्र, आणि कोडिंग (संगणकीय भाषा) हे पायाभूत विष शिकवले जातील. तिसऱ्या वर्षात मार्केटिंग (विपणन), फायनान्स (वित्त), आणि स्ट्रॅटेजी (धोरणात्मक व्यवस्थापन) यांसारख्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन (विशेषीकरण) निवडता येईल. चौथ्या वर्षाचा संपूर्ण भर हा रिसर्च प्रोजेक्ट (संशोधन प्रकल्प) आणि प्रगत व्यवस्थापन कौशल्यांवर असेल.

गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट स्कॉलरशिप (कंपन्यांतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती) आणि शैक्षणिक कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.

संपर्कआयआयएम कोझिकोड, कोची कॅम्पस, पहिला मजला, अथुल्या बिल्डिंग, इन्फोपार्क, काक्कनाड, कोची – ६८२०३०, संकेतस्थळ  www.iimk.ac.in, ईमेल- bms-admissions@iimk.ac.in

०००

आयआयएम जम्मू (मागील अंकावरुन)

ई-बीबीए-काय शिकाल?

 पहिले सत्र- १) बिझनेस कम्युनिकेशन (व्यावसायिक संवाद), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग (मूल्य आणि व्यवस्थापन लेखांकन), मार्केटिंग मॅनेजमेंट (विपणन व्यवस्थापन), क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (सर्जनशील विचार आणि समस्या निवारण), मानसशास्त्राची ओळख, बिझनेस मॅथेमॅटिक्स (व्यावसायिक गणित), प्रिन्सिपल्स ऑफ कॉम्प्युटेशनल थिंकिंग (संगणकीय विचारांची तत्त्वे), डेटा स्ट्रक्चर्स (माहिती रचनेची ओळख), भारतीय ज्ञान प्रणाली जनरेटिव्ह एआय (जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख)

    दुसरे सत्र व्यावसायिक लेखन, भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था, वित्तीय व्यवस्थापन, मानवी संसाधन व्यवस्थापन, सर्जनशीलता आणि नवोपक्रम, आर आणि पायथन भाषा वापरून माहिती विश्लेषण, सांख्यिकी, डिजिटल रूपांतरण, एजेंटीक कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख.

तिसरे सत्र भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था, कामकाज व्यवस्थापन, परदेशी भाषा, ग्राहक वर्तनाचा अभ्यास, धोरणात्मक व्यवस्थापन, बँकिंग आणि वित्त, नमुना आणि सर्वेक्षण रचना, पर्यावरण शास्त्र, डिजिटल डिझाइन (युआय/युएक्स – वापरकर्ता इंटरफेस रचना) आणि जनरेटिव्ह व एजेंटिक एआय कार्यशाळा.

चौथे सत्र नवीन व्यवसाय नियोजन, साहित्य आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापन, सादरीकरण कौशल्य कार्यशाळा, औद्योगिक संबंध आणि कामगार कायदे, ब्रँडिंग आणि जाहिरात, दृश्य कला (फोटोग्राफी आणि चित्रपट निर्मिती) आणि तीन स्वतंत्र वैकल्पिक विषय.

तिसरे व चौथे वर्षहा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लवचिकता प्रदान करतो. ५ व्या आणि ६ व्या सत्रात (तिसरे वर्ष) विद्यार्थ्यांना व्यवसाय विश्लेषण, डिजिटल विपणन, फिनटेक (वित्तीय तंत्रज्ञान) आणि प्रगत व्यवस्थापन विषयांमध्ये सखोल स्पेशलायझेशन (विशेषीकरण) निवडण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी ३ वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय निवडल्यास त्यांना बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिस्ट्रेशन) पदवी दिली जाईल. ४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत संशोधन प्रकल्पासह ई-बीबीए ऑनर्स प्रदान केली जाते.

अर्हता आणि प्रवेश प्रक्रिया

कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. खुल्या संवर्गातील  विद्यार्थ्यांना १० आणि १२ वी मध्ये किमान ० टक्के गुण आवश्यक. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती  आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण. १० वी मध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. (विद्यार्थ्याानी १२ वीची परीक्षा २०२४/ २०२५/ २०२६ मध्ये उत्तीर्ण केलेली असावी.)

प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा (जिपमॅट-जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट- २०२४ आणि २०२५ मधील गुण किंवा सीयूइटी-यूजी- कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट-२०२४/ २०२५/ २०२६ मधील गुण किंवा जेईई मेन- २०२४/ २०२५/ २०२६ मधील गुण) किंवा संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेतील (ई-बीबीए-टेस्ट) गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

ई-बीबीए टेस्ट- विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता, गणितीय कौशल्य आणि इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व तपासण्याच्या दृष्टीने या परीक्षेत प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवरील ‘जिपमॅट’ परीक्षेच्या धर्तीवर राहील.

संपर्क- आयआयएम जम्मूजगती, राष्ट्रीय महामार्ग ४४, नगरोटा, जम्मू – १८१२२१, संकेतस्थळ– www.iimj.ac.in ईमेल- ebba.admissions@iimj.ac.in

०००