(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एनआयइएलआयटी) या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने केली आहे. ही  संस्था डीम्ड टु बी युनिव्हर्सिटी या दर्जाची आहे. या संस्थेमार्फत इलेक्ट्रॉनिक्स विषयाशी निगडित विविध घटकांच्या दर्जेदार शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात येते. संस्थेमार्फत इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर फॉरेंसिक्स, व्हीएलएसआय (व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन – या तंत्रज्ञानाव्दारे लाखो किंवा कोट्यवधी ट्रान्झिस्टर्स एकाच सिलिकॉन चिपवर एकत्र बसवून इंटिग्रेटेड सर्किटतयार केले जाते. उदा- स्मार्टफोनमधील प्रोसेसर किंवा संगणकाचा सीपीयू), सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाते. विद्यार्थ्यांना स्मार्ट  लॅब (आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, डिजिटल साधनांनी सुसज्ज, इंटरॅक्टिव्ह पद्धतीने शिकवणारी प्रयोगशाळा), सायबर फॉरेंसिक लॅब, एनआयइएलआयटी डिजिटल युनिव्हर्सिटी प्लॅटफार्म, व्हर्च्युअल ॲकॅडेमी, आयसीएसएएस (इंटिग्रेटेड सायबर सेक्युरिटी अवेअरनेस सिस्टिम-
सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी तयार केलेली एकात्मिक  प्रणाली) ॲप, इंडिया एआय लॅब या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुविधा प्रात्यक्षिके आणि अध्ययनासाठी उपलब्ध करुन दिली जाते. एनआयइएलआयटी डिजिटल युनिव्हर्सिटी प्लॅटफार्म (ndu.digital) च्या माध्यमातून विद्यार्थी कुठेही आणि कोणत्याही वेळी आपल्या कौशल्यात वृध्दी करणारे घटक शिकू शकतात.

या संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी मराठी मुले म्हणावी त्या प्रमाणात प्रयत्न करत नाहीत त्यामुळे दर्जेदार शिक्षण आणि अनुभवाला ते मुकतात. या संस्थेचे कॅम्पस, श्रीनगर, पाटणा, केकरी (अजमेर), इटानगर, इम्फाल, गोरखपूर, कालिकत, एैजवाल, अगरताळा आणि छ.संभाजीमहाराज नगर(औरंगाबाद)येथे आहे. या संस्थेत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात.

(अ) पदवी अभ्यासक्रम

(या अभ्यासक्रमांना दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो- (१) जेइइ- मेन परीक्षेतील गुण. विद्यार्थ्यांना josaa 2026  या प्रवेश प्रकियेत भाग घ्यावा लागेल. संकेतस्थळ – josaa.nic.in आणि nielit.ac.in, (२) संस्थेची प्रवेश परीक्षा )

(१) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग)- कॅम्पस- रोपार, कालिकत, कोहिमा, अगरताळा, श्रीनगर, एैजवाल, इम्फाल.

(२) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (व्हीएलएसआय डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी)- कॅम्पस- रोपार.

(३) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग-(औरंगाबाद), (४) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग –(औरंगाबाद)

(५) बीटेक इन इंटरनेट ऑफ थिंग्ज – (ऐजवाल).

(६) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स- मायन‍र विषय (मुख्य  विषयासोबत घेतलेला छोटा पण उपयुक्त विशेष अभ्यासक्रम) – गोरखपूर.

(७) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी) – अजमेर, (८) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग (मायनर विषय)- गोरखपूर.

(ब) संस्थेच्या चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश (लॅटेरल एन्ट्री- विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो. अर्हता- पदविकाधारक)

(१) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – औरंगाबाद, (२) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग – औरंगाबाद आणि पाटणा, (३) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी)- अजमेर, (४) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग)- रोपार आणि एैजवाल, (५) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स- मायनर विषय)- गोरखपूर, (६) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग (मायनर विषय)- गोरखपूर.

(क) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

(या अभ्यासक्रमांना सीसीएमटी (सेंट्रलाइज्ड काउंसिलिंग फॉर एमटेक/ एमआर्क/ एम.प्लॅनिंग ॲडमिशन्स) प्रक्रियेव्दारे प्रवेश दिला जातो. संकेतस्थळ- ccmtadmissions.nic.in)

एम.टेक अभ्यासक्रम (१) इंटरनेट ऑफ थिंग्ज ॲण्ड सेन्सर सिस्टिम (रोपार), (२) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (रोपार, औरंगाबाद, गोरखपूर, ऐजवाल, इम्फाल), (३) ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स (रोपार आणि कालिकत), (४) सायबर फॉरेंसिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशेन सेक्युरिटी (रोपार आणि कोहिमा), (५) डाटा इंजिनीअरिंग (रोपार आणि आगरताळा), (६) एम्बेडेड सिस्टिम्स ॲण्ड व्हीएलएसआय डिझाइन (औरंगाबाद आणि गोरखपूर), (७) इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन टेक्नॉलॉजी (कालिकत), (८) एम्बेडेड सिस्टिम्स (कालिकत), (९) सायबर फॉरेंसिक्स (श्रीनगर), (१०) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस (इटानगर/ श्रीनगर)

(ड) पदविका अभ्यासक्रम

(या अभ्यासक्रमांना संस्थेच्या प्रवेश परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.)

(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्‍प्युटर ॲप्लिकेशन्स (इम्फाल), (२) डिप्लोमा इन कॉम्‍प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी (अगरताळा), (३) डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (अगरताळा आणि ऐजवाल), (४) डिप्लोमा इन कॉम्‍प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (इम्फाल, इटानगर, अजमेर आणि ऐजवाल), (५) डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (इम्फाल)

(इ) पीएचडी अभ्यासक्रम

(या अभ्यासक्रमांना संस्थेच्या प्रवेश परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो)

(१) पीएचडी इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड ॲप्लिकेशन (रोपार, कालिकत, श्रीनगर, इम्फाल, पाटणा), (२) पीएचडी इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (कालिकत आणि औरंगाबाद), (३) पीएचडी इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (रोपार),

बीसीए/एमसीए

(१) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स –(अगरताळा, ऐजवाल, इंफाल, अजमेर, पाटणा, कोहिमा, श्रीनगर). (२)मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स – (ऐजवाल, इंफाल, पाटणा, कोहिमा). या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत परीक्षा घेतली जाते. या सर्व अभ्यासक्रमांसाठी २०२६च्या शैक्षणिक सत्रासाठी प्राथमिक प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.

संपर्क संकेतस्थळ- nieliit.gov.in किंवा www.nielit.gov.in/aurangabad/

(औरंगाबादच्या संस्थेत कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम करता येतात. सध्याच्या काळात उद्योग,व्यवसायांना लागणारे आधुनिक तंत्र या अभ्यासक्रमाव्दारे हस्तगत करता येतात. ही संस्था भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परिसरात आहे. संस्थेतील सर्व प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि कार्यालय केंद्रिय नेटवर्कने जोडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावरून कोणतीही आवश्यक माहिती सहज मिळवता येते.)

०००

नॅशनल इंस्टिट्यूट ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चुरिंग टेक्नॉलॉजी.

महाराष्ट्रीय पालक आणि विद्यार्थ्यांचा खिजगणतीतही नसलेली महत्वाची संस्था म्हणजे नॅशनल इंस्टिट्यूट ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चुरिंग टेक्नॉलॉजी. या संस्थेची स्थापन भारत सरकारने १९६६ साली केली. या संस्थेत  फाऊंडी टेक्नॉलॉजी (ओतकाम तंत्रज्ञान- फाउंड्री म्हणजे धातूला प्रचंड तापमानावर वितळवून त्याला द्रव स्वरूपात आणली जाणारी जागा. नंतर एका साच्यात ओतून हवा तो आकार दिला जातो. उदा- विहिरीचा पंप) आणि फॉर्ज टेक्नॉलॉजी (घडवणकाम तंत्रज्ञान. फॉर्जिंग म्हणजे धातूला न वितळवता, फक्त लालभडक गरम करून किंवा थंड असतानाच त्यावर प्रचंड दाब देऊन किंवा हातोड्याने ठोकून आकार देणे. उदा- स्वयंपाकघरातील सुरी) या विषयाचे सर्वोत्कृष्ठ शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी संस्था.

या संस्थेत (१) ॲडव्हन्स्ड डिप्लोमा इन फाऊंडी टेक्नॉलॉजी आणि (२) ॲडव्हन्स्ड डिप्लोमा इन फोर्ज टेक्नॉलॉजी हे दोन महत्वाचे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  ३१ मे २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रावर चाळणी परीक्षा घेतली जाईल. या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. या परीक्षेचे महाराष्ट्रातील केंद्र- पुणे.

अर्हता- पुढील विषयातील पदवी किंवा पदविका- मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ मॅन्युफॅक्चुरिंग/ ऑटोमोबाइल/ इंडस्ट्रिअल/ पॉलिमर/ मेटॅलर्जिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर/ सेरॅमिक्स/ केमिकल इंजिनीअरिंग किंवा बीएस्सी (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ इन्फॅार्मेशन टेक्नॉलॉजी)

अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षं. या कालावधीत प्रत्येक सत्रासाठी १८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.

प्लेसमेंट

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील कंपन्यांमध्ये  प्लेसमेंट मिळते- किर्लोस्कर, महिंद्रा, भारत फोर्ज, एल ॲण्ड टी, निओसिम, एनडीसी स्टील, जिंदाल स्टील पॉवर, क्रिसेंट, बीएचइएल, विराज, रश्मी ग्रुप, टाटा मोटर्स, प्रदीप मेटल्स, वेदांता, अशोक लेलँड

इतर अभ्यासक्रम

(१) बीटेक -मेकॅनिकल इंजिनीअरिंग / कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ प्रॉडक्शन ॲण्ड इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग/ मेटॅलर्जी ॲण्ड मटेरिअल्स इंजिनीअरिंग.

या अभ्यासक्रमांना जेइइ-मेनच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. यासाठी विद्यार्थ्यांना-जॉईंट सिट ॲलोकेशन ॲथॉरिटीच्या (जोसा) या प्रवेश प्रकियेत सहभागी व्हावे लागेल.

(२) एमटेक- फाऊंड्री- फोर्ज टेक्नॉलॉजी/ नॅनोटेक्नॉलॉजी (मटेरिअल्स इंजिनीअरिंग)/ इंडस्ट्रिअल मेटॅलर्जी/ मॅन्युफॅक्चुरिंग इंजिनीअरिंग/ एन्व्हीरॉन्मेंटल इंजिनीअरिंग.

संपर्क- संकेतस्थळ- www.niamt.ac.in, ईमेल- academic@niamt.ac.in

सुरेश वांदिले