(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या घरी मैत्रिणींच्या घरी गप्पा रंगल्या होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडर स्वारीही आपला सहभाग कधी शेपूट हलवून, कधी जिभ बाहेर काढून तर कधी उड्या मारून देत होती. “कळतय हो तुमचं मला सारं”, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत होते. अलेक्सा गोर्जीचं लक्ष तेजोमयीच्या मैत्रिणींपेक्षा अलेक्झांडरकडेच अधिक होतं. त्याच्या या लिलांनी ती भारावून गेली होती. कुणाचं नसलं तरी गोर्जीचं लक्ष आपल्याकडे असल्याचं अलेक्झांडरने पक्कं ओळखलं होतं. त्यामुळे एक डोळा तिरपा करुन तो अधूनमधून गोर्जीकडे बघायचा नि उगाचच स्वत:भोवती फेरी मारायचा.

“याला झालं तरी काय?” असं वैष्णवीने विचारलं.

“हा तर, त्याचा आवडीचा खेळ!” तजोमयीनं अलेक्झांडरचं कौतुक केलं.

“कित्ती छान! आपल्यालासुध्दा असे खेळ कां येत नाहीत?” वैष्णवीला प्रश्न पडला.

“शोधा म्हणजे सापडेल?”गोर्जी म्हणाली.

“म्हणजे खेळसुध्दा सापडतो, असं म्हणायचय का तुला?” तेजोमयीनं विचारलं.

“हीचं आपलं काहीही.” मानसी ने प्रतिक्रिया दिली.

“काहीही नाही काही…”

“ओके, मग आम्हाला कुठे सापडायचा एखादा खेळ”? तेजोमयीनं विचारलं.

“बागेत.”

“बागेत कसला आलाय खेळ?”

“समजावून सांगू का?” गोर्जीने विचारलं. सगळ्यांनी हो म्हंटल.

०००

गोर्जीने सांगितल्याप्रमाणे तेजोमयी, मानसी, वैष्णवी, कल्याणी, कार्तिकी संध्याकाळी सोसायटी जवळील बागेत गेल्या. गोर्जीने सांगितलं होतं, प्रत्येकिनं झाडांची संख्या मोजायची, त्यांच्या फुल आणि  रंगांचे प्रकार ओळखायचं, ओळखींच्या झाडांची नावं टिपून घ्यायची. याप्रमाणे प्रत्येकीने झाडांची संख्या मोजून तशी नोंद केली.

संध्याकाळी सात वाजता कंपनी तेजोमयीच्या घरी आली. प्रत्येकीने तिच्या नोंदी दाखवल्या. कुणाला ५६, कुणाला ६२ तर कुणाला ६६ अशी झाडं दिसली. यातल्या दहा-वीसच झाडांची नावं त्यांना ठाऊक होती.

“एकिला कमी नि एकिला जास्त झाडं कशी काय दिसलीत? याचा अर्थ गडबड आहे. बरोबर नारे अलेक्झू?” अलेक्झांडरकडे बघत गोर्जी म्हणाली. त्यानेही आज्ञाधारकपणे शेपूट हलवली.

झाडं मोजण्यात गल्लत झाली कशी? यावर मैत्रिणींचं मंथन सुरु झालं. हे मंथन रात्रीचे आठ वाजले तरी सुरुच होतं. प्रत्येकीच्या घरुन बोलावणं आल्यानं, त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी जावं लागलं. प्रत्येकी मग जेवण्याच्या टेबलवर बागेतील झाडांची गंमत सांगितली नि उद्या सकाळीच बाबांना बागेत चालण्याचा आग्रह धरला. अनायसे दुसऱ्या दिवशी सुटी असल्याने पाचही मुलींचे बाबा सकाळी सहा वाजताच बागेत पोहचले. ते मुलींसोबत झाडांची संख्या मोजू लागले. आताही झाडांची संख्या वेगवेगळी आली. मंडळी तेजोमयीच्या घरी जमून झाडांच्या संख्येवर चर्चा करु लागली.

“प्रत्येकाचा आकडा असा वेगवेगळा कां येतो?” गोर्जीने विचारलं.

          “ही झाडं आहेत का भुताटकी” वैष्णवीच्या बाबांनी आश्चर्य व्यक्त केलं.

“काका, झाडात भूत नसतात, ती माणसांच्या डोक्यात असतात.” गोर्जी म्हणाली.

“मग, हा गुंता कसा सुटायचा?” तेजोमयीनं विचारलं.

“मी सांगू का? तुम्ही एखाद्या वनस्पतीशास्त्रज्ञाची मदत घ्या.” गोर्जीने सूचना केली. आपल्याच सोसायटीत वनस्पतीशास्त्र शिकवणारे प्रोफेसर झाडबुके राहत असल्याचं कल्याणीच्या बाबांना आठवलं. त्यांनी लगेच त्यांना फोन लावला. घरी येऊ का म्हणून विचारलं. ते हो म्हणाल्याने सगळी मंडळी त्यांच्या सदनिकेत गेली. तेजोमयीने त्यांना सगळं सांगितलं.

“तुमच्या मदतीशिवाय आता झाडांची संख्या अचूक मोजता यायची नाही.” तेजोमयीचे बाबा म्हणाले. आपल्या आवडीच्या विषयावर मंडळी मदत मागायला आल्याने प्रो. झाडबुकेंना आनंद झाला.

संध्याकाळी ते सगळ्यांसमवेत बागेत आले. एक एक झाड बघून, ते त्याचं प्रचलित नाव आणि शास्त्रीय नाव सांगू लागले. तेजोमयी आणि कल्याणी ही नावं लिहून घेऊ लागली. वैष्णवी फुलांची नावं आणि रंग लिहू लागली. दीड तासानंतर ही मोहीम संपली. बागेत ६५ प्रकारची लहान मोठी झाड, वेली असल्याचं स्पष्ट झालं. मंडळी घरी परतली. प्रत्येक झाडाचं वैशिष्ट सांगण्यासाठी दुसऱ्या दिवशी प्रो. झाडबुकेंनी सगळ्यांना तेजोमयीच्या घरी बोलावलं.

“चमत्कारच म्हणायचा?” कल्याणीचे बाबा म्हणाले.

“यात कसला आलाय चमत्कार? बागेत पूर्वीपासूनच ही झाडं आहेत. आपलं लक्ष जात नाहीना तिकडे.” प्रो. झाडबुके म्हणाले. प्रत्येक झाडांचं वैशिष्ट्य समजावून सांगितल्यावर त्यांनी विचारलं,

“बागेतल्या झाडांची शोध घेण्याची कल्पना कुणाला सुचली? त्याचं कौतुक करायला हवं.” तेजोमयीने, गोर्जीकडे बोट दाखवलं.

“पण सर, ही कल्पना नव्हती, हा खेळ होता. दोन दिवस मस्त रंगला की नाही?” गोर्जी हसून म्हणाली. दोन्ही पायावर उभे राहून अलेक्झांडरने असेच भाव चेह-यावर आणले.

सुरेश वांदिले