(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ६- इलेक्ट्रिक वाहने- नवे तंत्र,नवे कौशल्य

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसू लागली आहेत. या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. भारत सरकारची धोरणे या वाहन उद्योगाच्या वाढीसाठी पूरक आहेत.

सन २०२५ मध्ये एकूण विक्री झालेल्या वाहनांपैकी सुमारे ८ टक्के वाहने इलेक्ट्रिक होती. यात इलेक्ट्रिक दुचाकींचा वाटा ५७ टक्के, तीन चाकिंचा ३५ टक्के आणि चारचाकिंचा सुमारे ८ टक्के होता. २०३० पर्यंत भारतात ८ कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इतर देशांमध्ये या वाहनांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसताना,इ भारतात मात्र या क्षेत्राची वाढ २० टक्के आहे. ग्राहकांची मागणी, सरकारचे पूरक धोरण आणि या क्षेत्रातील उद्योजकांनी दाखवलेली धडाडी यामुळे या वाहनांच्या विक्रीस गती मिळाताना दिसते. २०२८ पर्यंत इलेक्ट्रिक बॅटरींची विक्री २.६३ कोटी रुपये पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व बाबींमुळे एनर्जी सिस्टिम, मटेरिअल इंजिनीअरिंग आणि बॅटरी इनोव्हेशनच्या क्षेत्रात विपुल संधी निर्माण झाल्या आहेत. सध्या देशात २५ ते २९  हजाराच्या आसपास सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स आहेत. २०३० पर्यंत ही संख्या १३.२ लाख इतकी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मोठ्या संख्येने सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सॉफ्टेवर  इंजिनीअरची गरज भासेल. या क्षेत्रातील वाढीसाठी भारत सरकाने ‘फेम टू (फास्टर अडॉप्शन ॲण्ड मॅन्युफक्च्युरिंग ऑफ हायब्रिड ॲण्ड इलेक्ट्रिकल व्हेइकल इन इंडिया)’ आणि पीएम इ-ड्राइव्ह (प्राइम मिनिस्टर इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्हॉल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल इन इंडिया) या योजनेच्या माध्यमातून २० हजार कोटींचा निधी या व्यवसायाच्या वाढीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. या सर्व बाबींमुळे याक्षेत्रात पुढील अभियंत्यांसाठी रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात-

(१) इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियंते – इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या मोटार डिझाइन, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली, पॉवर कनर्व्हर्टर, सर्किट्स, कंट्रोल सिस्टिम, हाय होल्टेज सेफ्टी, वायरिंग हारनेसेस याबाबी हाताळण्यासाठी या अभियंत्यांची गरज भासते. (२) मेकॅनिकल इंजिनीअर्स (यांत्रिक अभियंते) चेसीसचे डिझाइन (आराखडा), थर्मल सिस्टिम (उष्णता प्रणाली), एरोडॉयनामिक्स (वायुगतिकी) आणि इंटिग्रेशन (एकत्रीकरण) ऑफ पॉवर ट्रेन (ऊर्जा यंत्रणा) या बाबी‍ हे अभियंत हाताळतात. या अभियंत्यांकडे मॅटलॅब/ सिम्युलिंक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम्स, हाय व्होल्टेज सेफ्टी प्रोटोकॉल्स या बाबींचे अद्ययावत ज्ञान गरजेचे आहे. (३) केमिकल अभियंते- इलेक्ट्रिक वाहनाचे ह्रदय म्हणजे त्यातील बॅटरी होय. या बॅटरी (विद्युतकोश) लिथियम आयन सेल (आयन पेशी) रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि सॉलिड स्टेट (घन अवस्था) इनोव्हेशन (नवोन्मेष), थर्मल रेग्युलेशन (उष्णता नियंत्रण), रिसायकलिंग सोल्यूशन्स (पुनर्वापर उपाय) या बाबी या अभियंत्यांकडून हाताळल्या जातात. रासायनिक अभियंताना इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सेल डिझाइन, थर्मल रेग्युलेशन आणि बॅटरी लाइफ सायकल मॅनेजमेंट या बाबींचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. (४) सॉफ्टवेअर अभियंते- या वाहनातील स्मार्ट डॅशबोर्ड (स्मार्ट नियंत्रण फलक), ऑटोनॉमस फिचर्स (स्वयंचलित वैशिष्ट्ये) याबाबी हाताळण्यासाठी या अभियंत्यांची गरज भासते. सी – लँग्वेज, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), मशिन लर्निंग (यंत्र शिक्षण), सायबर सेक्युरिटी (सायबर सुरक्षा) हे कौशल्य प्राप्त केलेल्या अभियंत्यांना उत्तमोत्तम संधी मिळू शकेल.(५) स्थापत्य अभियंते नागरी आणि ग्रामीण भागात चार्जिंग (विद्युत भरणा केंद्र) स्टेशनची उभारणी सारख्याच पध्दतीने करावी लागेल. यासाठी या केंद्राचे आरेखन (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग), उभारणी (कन्स्ट्रक्शन) आणि देखभाल (मेंटेनन्स) आणि या स्टेशनच्या नेटवर्क (जाळे) ला प्रभावीरीत्या कार्यरत ठेवणे, अशी कामे या अभियंत्यांना करावी लागतील. (६) पॉवर सिस्टिम अभियंते (विद्युत प्रणाली अभियंते)या ग्रिड (विद्युत जाळे) वर येणारा अधिभार कार्यक्षतेने हाताळण्यासाठी या अभियंत्यांची गरज भासेल. (७) इंडस्ट्रिअल आणि मॅन्युफक्चुरिंग अभियंते– या वाहनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणारी स्वयंचलित आणि श्वास्वत स्वरुपाची यंत्रणा कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी हे अभियंते लागतील. या अभियंत्यांनी सॉलिड वर्क्स, कॅटिया, ॲनसीस या सारख्या टूल्सवर हुकुमत मिळवणे गरजेचे आहे

(८) ऑटोमोटिव्ह डिझायायनर अभियंते – या वाहनांचे डिझाइन वापरकर्त्यासाठी अत्यंत सुलभ करण्यासाठी स्मार्ट डिझाइन करावे लागतील. त्यासाठी या अभियंत्यांची गरज भासेल.

या क्षेत्रात अनेक स्टार्टअप सुरु झाले आहेत. त्याठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळू शकतात. या स्टार्टअपमध्ये प्रचंड परिश्रम करण्याची आणि स्वत:ला सतत अपडेट करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. या ठिकाणी सतत नावीन्यपूर्ण बाबी स्वत: करण्याची संधी मिळते. कॉर्पोरेट क्षेत्रातही विविधांगी करिअर संधी मिळतात. येथील प्रगती ही विशिष्ट पध्दतीने होते. मोठ्या पायाभूत सुविधा असल्याने लगेच नव्या गोष्टी करुन बघण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी असते.

अभ्यासक्रम आणि संस्था

(१) या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम स्किल लिंक, एनपीटीइल, आयएसइआय या डिजिटल प्लॅफॉर्मवर उपलब्ध आहेत.

(२) आयआयटी दिल्ली या संस्थेत पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन इलेक्ट्रिक व्हेइकल  टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो. हा ऑनलाइन आहे. याचा कालावधी एक वर्षं. अर्हता- अभियांत्रिकी पदवीधर किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी. प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन करावा लागतो. निवड शैक्षणिक पात्रता व प्रोफाइलवर आधारित.

संपर्क: आयआयटी दिल्ली, हौज खास ,न्यू दिल्ली- ११००१६, दूरध्वनी- ०११-२६५९१२८१, ईमेल: hod@cart.iitd.ac.in संकेतस्थळ- https://cart.iitd.ac.in/academic  आणि www.iitd.ac.in

(३) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओइपी) टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या संस्थेच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इलेक्ट्रिक मोबिलटी, अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून त्याचा कालावधी एक वर्षाचा आहे.

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य

हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम आहे. यामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. संस्थेच्या तज्ज्ञ प्राध्यपकांसोबतच, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोशिएशन ऑफ इंडियातील तज्ज्ञ हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी येतात. या अभ्यासक्रमात  लिथियम- आयन बॅटरी, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम, थर्मल डिझाइन आणि इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित सरकारी धोरणे अशा विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते.

अर्हता आणि संधी

मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतात. या अभ्यासक्रमासाठी एकूण ४० जागा असून लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे निवड केली जाते.

संपर्क: सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, शिवाजीनगर, पुणे – ४११००५, दूरध्वनी- ०२०-२५५०-७०००, ईमेल: mrn.mech@coeptech.ac.in, संकेतस्थळ: www.coep.ac.in

(४) आयआयटी मद्रासया क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

१) ई-मोबिलिटी आणि इव्ही इंजिनीअरिंग प्रमाणपत्र या उद्योगात सध्या कार्यरत असलेल्या व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. कालावधी: ६ महिने (ऑनलाइन).

२) एम.टेक इन इलेक्ट्रिक मोबिलिटी- यामध्ये वाहनांचे डिझाइन, बॅटरी तंत्रज्ञान आणि कंट्रोल सिस्टिम्स अशा तांत्रिक विषयांचे प्रगत शिक्षण दिले जाते. कालावधी: २ वर्षे.

अर्हता आणि प्रवेश प्रक्रिया

अर्हता- बीई किंवा बीटेक, निवड प्रक्रिया: पदव्युत्तर  प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे वैध गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) स्कोअर असणे आवश्यक.

करिअर संधी

इव्ही इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यास ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपन्या, इव्ही स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध होतात. बॅटरी मॅनेजमेंट, मोटर कंट्रोल आणि व्ही इन्फ्रास्ट्रक्चर डिझाइन यांसारख्या विभागांत तज्ज्ञांना मोठी मागणी आहे.

संपर्क: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, सरदार पटेल रोड, चेन्नई – ६०००३६, ईमेल: dean_acad@iitm.ac.in, संकेतस्थळ: www.iitm.ac.in

(५) आयआयटी कानपूर-  या संस्थेने इव्ही टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉवरट्रेन, हा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मूलभूत तत्त्वे, बॅटरी तंत्रज्ञान, मोटर सिस्टिम्स आणि पॉवरट्रेन ऑप्टिमायझेशन शिकवले जाते.

अर्हता- अभियांत्रिकी  विद्यार्थी किंवा पदवीधर.

संपर्क- इ ॲण्ड आयसीटी ॲकॅडेमी, आयएफएसीइटी बिल्डिंग, आयआयटी कानपूर, उत्तर प्रदेश – २०८०१६, हेल्पलाइन ९२१९९७२८०५, संकेतस्थळ  www.eicta.iitk.ac.in, ईमेल: support@eicta.iitk.ac.in (किंवा support_ifacet@iitk.ac.in)support_ifacet@iitk.ac.in)

सुरेश वांदिले