(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डिजिटल क्षेत्रातल्या  करिअर संधी

() सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट  कोलकाता–  या संस्थेत मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (एमएफए) इन सिनेमा वुइथ स्पेशलायझेशन इन ॲनिमेशन सिनेमा हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पारंपारिक ॲनिमेशनपासून ते आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानापर्यंतचे सखोल शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे.

काय शिकाल?

पहिल्या वर्षी  चित्रकला, डिझाइन, मूलभूत ॲनिमेशन, चित्रपट निर्मितीचे मूलभूत घटक, चित्रपटाचा इतिहास आणि सिनेमाचे सिद्धांत शिकवले जातात. दुस-या आणि तिस-या वर्षी प्रगत ॲनिमेशन कौशल्ये शिकवली जातात. यात (१) हाताने रेखाटलेले पारंपारिक ॲनिमेशन, (२) संगणकाच्या मदतीने तयार केलेले टू डी आणि थ्रीडी ॲनिमेशन, (३) वस्तूंच्या हालचाली टप्प्याटप्प्याने केलेले ॲनिमेशन, (४) व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स)(चित्रपटातील विशेष दृश्य परिणाम), (५) गेम डिझाइन (व्हिडिओ गेम्सची रचना), (६) माहितीपटांमधील ॲनिमेशनचा वापर, (७) स्टोरीटेलिंग (कथा सांगण्याची कला, पात्रांचा विकास आणि कथेची मांडणी), (८) कलेचा इतिहास आणि चित्रपट अभ्यास आणि प्रगत चित्रकला, (९) ॲनिमेशन किंवा फिल्म तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, (१०) संशोधन पद्धती (रिसर्च मेथोडॉलॉजी) या विषय घटकांचा समावेश आहे. ॲनिमेटेड चित्रपटाची निर्मिती, सामूहिक प्रकल्प, उद्योगातील कार्यशाळा, स्टुडिओ भेटी आणि चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग अशा प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.

अर्हता- उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर  असावा. चित्रकलेमध्ये प्राविण्य (ड्रॉइंग स्किल्स) असणे आवश्यक. (प्रवेश परीक्षेत हे कौशल्य तपासले जाते). पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया- (१) प्रारंभिक निवड चाचणी-  ही राष्ट्रीय स्तरावर होणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ  परीक्षा आहे. यात सामान्य क्षमता (जनरल ॲप्टिट्यूड) आणि विषयाचे ज्ञान तपासले जाते (एकूण १०० गुण).

() अंतिम निवड चाचणी  ही कोलकाता येथे प्रत्यक्ष (ऑफलाइन) घेतली जाते. यामध्ये प्रात्यक्षिक चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असतो.

उपलब्ध सुविधा(१) आयमॅक वर्कस्टेशन्स: आधुनिक संगणक प्रणाली, (२) उद्योगासाठी आवश्यक असणारे प्रगत सॉफ्टवेअर- ॲडोबी, टून बूम, (३) पारंपारिक कला साहित्य आणि डिजिटल साधने, (५) खास ॲनिमेशनसाठी तयार केलेला स्टुडिओ सेटअप.

संपर्क संकेतस्थळ- srfti.ac.in

(२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी)- या संस्थेने पुढील तीन आणि सहा महिने कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये उद्योगासाठी आवश्यक तंत्रे आणि कौशल्ये शिकवली जातात.

(अ) कालावधी-तीन महिने

) सर्टिफिकेट इन सिनेमॅटिक व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि फिल्म मेकिंग– या अभ्यासक्रमात व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर- आभासी वास्तव) तंत्रज्ञान वापरून चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण, दिग्दर्शन, व्हीआर कॅमेरा तंत्र, इंटरॅक्टिव्ह स्टोरीटेलिंग (संवादी कथाकथन) हे विषय घटक शिकवले जातात.

करिअर संधी व्हीआर /एआर कंटेंट क्रिएटर, व्हीआर फिल्म डायरेक्टर, इंटरॅक्टिव्ह मीडिया स्टुडिओ, मेटाव्हर्स प्रोजेक्ट्स, गेमिंग आणि शैक्षणिक व्हीआर कंपन्या.

) सर्टिफिकेट इन व्हॉईस ॲक्टिंग फॉर ॲनिमेशन आणि गेमिंग या अभ्यासक्रमात अॅनिमेशन फिल्म, दूरचित्रवाहिनी मालिका आणि इंटरॅक्टिव्ह गेम्ससाठी विशेष व्हॉइस परफॉर्मन्स (आवाज अभिनय), व्हॉइस कास्टिंग, डायरेक्शन, इमोशनल डिलिव्हरी (भावनांचे सादरीकरण) आणि गेमिंगचे विशिष्ट तंत्रकौशल्य शिकवले जाते. 

करिअर संधी: अॅनिमेशन स्टुडिओ, गेम डेव्हलपमेंट कंपन्या, डबिंग आर्टिस्ट, व्हॉइस-ओव्हर (डबिंग-पार्श्व स्वर) फॉर अॅड्स/गेम्स/फिल्म्स, फ्रीलान्स व्हॉइस अॅक्टर.

) सर्टिफिकेट इन प्रॉडक्शन मॅनेजमेंट फॉर एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग,कॉमिक्स) उद्योग– या उद्योगासाठी निर्मिती नियोजन, निधी व्यवस्थापन, संघ-समन्वयन, आणि स्टुडिओ चालवण्याचे कौशल्य हे विषय शिकवले जातात.

करिअर संधी प्रॉडक्शन मॅनेजर, लाइन प्रोड्युसर, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, एव्हीजीसी स्टुडिओ चालक, फ्रीलान्स प्रॉडक्शन कन्सल्टंट.

(ब) कालावधी- सहा महिने

हे अभ्यासक्रम अधिक सखोल आणि प्रगत कौशल्ये ज्ञान प्रदान करतात. एआय, अनरिअल इंजिन, गेमिंग आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शनसारख्या नव्या क्षेत्रांवर भर देण्यात येतो.

) सर्टिफिकेट इन आर्ट आणि सिनेमॅटिक इंटेलिजन्स ऑफ एआय फिल्म मेकिंग या अभ्यासक्रमात एआय तंत्रज्ञान वापरून चित्रपट निर्मितीची कला, सर्जनशील व्यावसायिकांसाठी एआय साधने (टूल्स), जेनरेटिव्ह एआय, व्हिज्युअल स्टोरीटेलिंग (दृश्यात्मक कथाकथन) आणि सिनेमॅटिक वर्कफ्लो हे विषय शिकवले जातात.

करिअर संधी एआय फिल्ममेकर, जेनरेटिव्ह कंटेंट क्रिएटर, व्हीएफक्स/एआय आर्टिस्ट, क्रिएटिव्ह टेक स्टार्टअप्स, मीडिया हाऊसेस येथे करिअर संधी मिळते

) सर्टिफिकेट इन ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात ई-स्पोर्ट्स उद्योगाचे व्यवस्थापन, इव्हेंट ऑर्गनायझेशन (स्पर्धांचे आयोजन), गेमिंग कम्युनिटी बिल्डिंग (समुदाय बांधणी), स्पॉन्सरशिप (प्रायोजकत्व) आणि गेमिंग बिझनेस मॉडेल्स (व्यवसाय प्रारुप) हे विषय शिकवले जातात.

करिअर संधी ई-स्पोर्ट्स मॅनेजर, गेमिंग इव्हेंट ऑर्गनायझर, गेमिंग लीग अॅडमिन, स्पॉन्सरशिप मॅनेजर, गेमिंग प्लॅटफॉर्म्स

) सर्टिफिकेट इन व्हर्च्युअल आर्ट डिपार्टमेंट कंटेंट क्रिएशन या अभ्यासक्रमात  कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), व्हर्च्युअल सेट डिझाइन (आभासी सेट अभिकल्प), थ्री डी अॅसेट्स (मालमत्ता) आणि रिअ-टाइम प्रॉडक्शन हे विषय शिकवले जातात.

करिअर संधीव्हर्च्युअल प्रॉडक्शन आर्टिस्ट, अनरिअल इंजिन स्पेशलिस्ट, फिल्म/गेम स्टुडिओमध्ये व्हर्च्युअल सेट डिझायनर या संधी मिळतात.

) सर्टिफिकेट इन मीडिया टेक वर्कफ्लो या अभ्यासक्रमात एआय आणि क्लाउड तंत्रज्ञान वापरून जागतिक स्तरावरील मीडिया वर्कफ्लो (कामकाजाची साखळी)  तयार करण्याचे ज्ञान प्रदान केले जाते. करिअर संधी  मीडिया टेक स्पेशलिस्ट, वर्कफ्लो आर्किटेक्ट, क्लाउड-बेस्ड कंटेंट मॅनेजर, पोस्ट-प्रॉडक्शन हाऊसेस अशा संधी मिळतात.

) सर्टिफिकेट इन आर्ट ऑफ कॅरेक्टर ॲनिमेशन– या अभ्यासक्रमात  कॅरेक्टर अॅनिमेशनची कला, फ्रेम-बाय-फ्रेम अॅनिमेशन, लाइफसायकल, रिगिंग(सांगाडा तयार करणे) आणि परफॉर्मन्स (अभिनय) या विषय घटकांचा समावेश आहे.

करिअर संधी अॅनिमेशन आर्टिस्ट, कॅरेक्टर अॅनिमेटर, गेमिंग/फिल्म स्टुडिओ, फ्रीलान्स अॅनिमेशन वर्क अशा संधी मिळतात.

) सर्टिफिकेट इन एन्व्हीरॉन्मेंट आर्ट फॉर व्हिडिओ गेम्स– या अभ्यासक्रमात व्हिडिओ गेम्ससाठी एन्व्हीरॉन्में(पार्श्वभूमी/वातावरण), गेम-रेडी एन्व्हीरॉन्मेंट डिझाइन, थ्री डी मॉडेलिंग आणि वर्ल्ड बिल्डिंग.

करिअर संधी एन्व्हीरॉन्मेंट आर्टिस्ट, गेम वर्ल्ड बिल्डर, थ्री डी आर्टिस्ट (गेमिंग स्टुडिओ), फ्रीलान्स गेम आर्ट क्रिएटर.

) सर्टिफिकेट इन आयसीव्हीएफएक्स ऑन-सेट ऑपरेशन्स या अभ्यासक्रमात इन-कॅमेरा व्हिज्युअल इफेक्ट्स (आयसीव्हीएफक्स) ची मूलभूत आणि प्रगत तंत्रे, व्हर्च्युअल प्रॉडक्शन, रिअल-टाइम व्हीएफएक्स आणि ऑन-सेट ऑपरेशन्स हे विषय शिकवले जातात.

करिअर संधी आयसीव्हीएफक्स टेक्निशियन, व्हर्च्युअल प्रॉडक्शन ऑपरेटर, एलइडी वॉल/व्हर्च्युअल स्टुडिओ स्पेशलिस्ट, फिल्म/ओटीटी प्रोजेक्ट्स

हे अभ्यासक्रम केल्यावर गुगल, यूट्यूब, ॲडॉब, मायक्रोसॉफ्ट, लक्ष्य डिजिटल, ग्रीनरेन यांसारख्या संस्थांमध्ये  रोजगार, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटची संधी मिळते.

संपर्क संकेतस्थळ- https://www.iict.org

(३) राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पु.ल.देशपांडे कला अकादमीने यंदापासून दृकश्राव्य माध्यमांसाठी कौशल्यनिर्मितीचे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम केल्यावर वेब सिरीज, टेलिव्हिजन, चित्रपट आदी दृकश्राव्य माध्यमांमध्ये, रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

    या अभ्यासक्रमांमध्ये (१) स्क्रीन रायटिंग, (२) फिल्म डायरेक्शन, (२) बेसिक सिनेमॅटोग्रॅफी, (३) फिल्म एडिटिंग, (४) साउंड इंजिनीअरिंग, (५) व्हाईसओव्हर आर्टिस्ट, (६) लाईव्ह साऊंड रेकॉर्डिंग, (७) असिस्टंट कोरिओग्रॅफर, (८) फिल्म प्रॉडक्शन असिस्टंट, (९) इव्हेंट प्रॉडक्शन ॲण्ड मॅनेजमेंट, यांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन महिन्यांचा आहे. कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हे अभ्यासक्रम करु शकतात.

    (१०) फिल्म प्रॉडक्शन ॲण्ड मार्केटिंग हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधर करु शकतो. या अभ्याक्रमाचा कालावधीही तीन महिन्यांचा आहे.

    हे अभ्यासक्रम या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आणि व्यावसायिकांडून शिकवले जातील. यामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर असेल. प्रात्यक्षिकांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री व उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील. या अभ्यासक्रमासाठी अर्थसाहाय्याची सुविधा सहकारी बँकांकडून केली जाते. तसे आदेश सहकार आयुक्तांनी संबंधित बँकांना दिले आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पु.ल.देशपांडे कला अकादमी आणि राज्य कौशल्य विकास विभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

    संपर्क- संकेतस्थळ-https://www.pldeshpandekalaacademy.org/ भ्रमणध्वनी -९८१९८२४९५४

सुरेश वांदिले