(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कथाकथन ते ते ब्रँड रणनिती !

फॅशनच्या अत्यंत वेगवान आणि सतत बदलणाऱ्या जगात, फॅशन कम्युनिकेटरला फार महत्वाची भूमिका बजवावी लागते. सध्याच्या काळातील फॅशनच्या अनुषंगाने स्मार्ट जीवनशैली (लाइफस्टाइल) आणि ग्राहकांच्या वाढत्या आशा-आकांक्षा या कम्युनिकेटरला पूर्ण कराव्या लागतात.

कोणत्याही फॅशन ब्रँडची आयडेंटिटी’ (ब्रँडची ओळख) उत्पादनाइतकीच महत्वाची असते. भारतीय रिटेल क्षेत्रात वेगवेगळया कंपन्यांच्या अनेक ‘रेडी-टू-वेअर’  आणि लक्झरी ब्रँड्स सतत येत असल्याने,  स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, दृश्यमानता मिळवण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फॅशन कम्युनिकेशन तंत्राचा उपयोग केला जातो. या ब्रँड्सना त्यांची उत्पादने, मूल्ये आणि धोरणे ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून  देण्याची महत्त्वाची भूमिका फॅशन कम्युनिकेटर बजावतो.

    बहुआयामी कार्य 

          फॅशन कम्युनिकेटरची जबाबदारी बहुआयामी असते. त्याच्याकडून पुढील बाबी अपेक्षित असतात- (१) ब्रँड स्ट्रॅटेजी ब्रँडची सकारात्मक प्रतिमा बनण्यासाठी त्याला प्रमुख भूमिका वठवावी लागते, (२) व्हिज्युअल मर्चेंडायझिंग ग्राहकांना आकर्षून घेणाऱ्या दुकानां (रिटेल स्टोअर्स)च्या मांडणीचे  नियोजन आणि आरेखन करावे लागते, (३) स्टोरीटेलिंग (कथन किंवा आकर्षिकरित्या ब्रँडची माहिती देणे)- जाहिराती, समाज माध्यमे आणि नियतकालिकांच्या माध्यमातून प्रभावीपणे ब्रँडची माहिती द्यावी लागते. (४) इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन शो आणि प्रदर्शनांचे आयोजन करावे लागते. (५) डिझाइन ग्रॅफिक डिझाइन, फोटोग्राफी आणि व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधवा लागतो.

आवश्यक कौशल्ये

(१) सर्जनशीलता नावीन्यपूर्ण आणि हटके विचार करण्याची क्षमता, (२) संवाद कौशल्य प्रभावीपणे बोलणे आणि लिहिणे, (३) व्हिज्युअल सेन्स रंग, आकार आणि मांडणी यांची उत्तम जाण, (४) तांत्रिक ज्ञान ॲडोब फोटोशॉप, इलुस्ट्रेटर आणि इन-डिझाइन सारख्या सॉफ्टवेअर्सचे ज्ञान, (५) चिकित्सक विचारक्षमता बाजारातील फॅशनचे प्रवाह समजून घेण्याची क्षमता.

    अभ्यासक्रम

ही सगळी कौशल्ये प्रदान करणारा आपल्या देशातील सर्वात सर्वात दर्जेदार आणि महत्वाचा, ‘ बॅचलर ऑफ फॅशन कम्युनिकेशन’ हा अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) या संस्थेच्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये शिकता येतो. हा संपूर्ण अभ्यासक्रम उद्योगाच्या प्रत्यक्ष गरजा आणि भविष्यातील कल लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम कला, वाणिज्य, विज्ञान अशासारख्या कोणत्याही ज्ञानशाखेत १२ वी झालेले विद्यार्थी करु शकतात. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे.

काय शिकाल?

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ‘व्हिज्युअल डिझाइन स्ट्रॅटेजिस्ट (दृष्य आरेखन रणनितीकार)’ म्हणून विकसित करतो. त्याअनुषंगाने पुढील पाच मुख्य विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते.

) ग्रॅफिक डिझाइन या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना टायपोग्राफी, लेआउट, रंग आणि रचना  यांच्या माध्यमातून प्रभावी संवाद साधण्याचे तंत्र  आणि कौशल्य शिकवले जाते. ब्रँडची ओळख निर्माण करणे, लोगो डिझाइन आणि जाहिरात क्षेत्रातील दृश्य मांडणीवर भर दिला जातो.

स्पेस डिझाइन हा विषय प्रत्यक्ष जागा किंवा वास्तूंना स्मार्ट स्वरुप देण्याशी निगडित आहे. ग्राहकांना अविस्मरणीय अनुभव मिळावा यासाठी रिटेल स्टोअर्स, प्रदर्शने आणि विविध कार्यक्रमांच्या जागांच्या मांडणीच्या तंत्राचे  ज्ञान प्रदान केले जाते.

) फॅशन क्रिएटिव्हज यात फॅशन स्टाइलिंग, फोटोग्राफी आणि फॅशन लेखनाचा समावेश होतो. ब्रँडसाठी एक विशिष्ट ‘व्हिज्युअल लँग्वेज’ (दृश्य भाषा) तयार करावी लागते. त्याद्वारे उत्पादनाचे सादरीकरण करण्याची कला शिकवली जाते.

) फॅशन थिंकिंग या विषयात डिझाइन आणि त्यामागील वैचारिक आणि सांस्कृतिक पैलूंच्या अभ्यासावर भर दिला जातो. नाविन्यपूर्ण विचार प्रक्रिया आणि धोरणात्मक नियोजनाचे कौशल्य शिकवले जाते.

) मीडिया डिझाइन डिजिटल युगाचा विचार करून, या विषयात फॅशन पत्रकारिता, जाहिरात आणि नवीन माध्यमांसाठी (उदा. समाजमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म) लागणारी कौशल्ये विकसित केली जातात.

या मुख्य विषयांव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार ‘मायनर (दुय्यम/ वैकल्पिक)’  विषय निवडता येतात. यामुळे त्यांच्या कौशल्यांमध्ये अधिक भर पडते. सेन्सरी डिझाइन, ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हीज्युअल एक्सपिरिअंस डिझाइन, आर्टिफि‍शिअल इंटेलिजन्स, या विषय घटकांचा समावेश नव्‍याने करण्यात आला आहे.या विषयांव्दारे विशिष्ट क्षेत्रात अधिक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करता येते. यामध्ये पुढील काही विषयघटकांचा समावेश आहे-

१) डिझाइनचा इतिहास: यामध्ये डिझाइनच्या उत्क्रांतीचा आणि विविध कालखंडातील त्याच्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ऐतिहासिक संदर्भातून भविष्यातील डिझाइन कसे असावे, याची दृष्टी याद्वारे मिळते. २) न्यू मीडिया कंटेंट: सध्याच्या डिजिटल युगाचा विचार करुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, ओ.टी.टी. आणि इतर डिजिटल माध्यमांसाठी प्रभावी मजकूर  कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण यात दिले जाते. ३) जनसंपर्क–  फॅशन उद्योगात ब्रँडची प्रतिमा जपणे आणि सतत उंचावण्यासाठी जनसंपर्काचे महत्त्व मोठे आहे. माध्यमांशी संवाद साधणे आणि ‘ब्रँड इमेज’ स्थापित करण्याचे कौशल्य यात शिकवले जाते, ४) स्टोरीटेलिंगकेवळ माहिती न देता ती एका प्रभावी ‘गोष्टी’च्या स्वरूपात ग्राहकांपर्यंत कशी पोहोचवायची, याचे कौशल्य यात शिकवले जाते. ब्रँडशी ग्राहकांचे भावनिक नाते जोडण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. ४) गेम डिझाइन आणि २ डी ॲनिमेशन: फॅशन आणि तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या विषयात टू डी ॲनिमेशनची मूळ तत्त्वे आणि गेमिंगच्या माध्यमातून ब्रँडचा अनुभव देण्याचे तंत्र शिकवले जाते, ६) व्हिज्युअल मर्चेंडायझिंग: ग्राहकांचे लक्ष वेधले जाईल अशा पध्दतीने उत्पादनांचे सादरीकरण करण्याचे तंत्र यात शिकवले जाते.

हे विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात अधिक सखोल ज्ञान घेण्याची आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी देतात.

करिअर संधी

    (१) व्हिज्युअल डिझाइन स्ट्रॅटेजिस्ट: ब्रँडसाठी एकात्मिक डिझाइन धोरणे आखणारा तज्ज्ञ, (२) ग्रॅफिक डिझायनर: टायपोग्राफी, लेआउट आणि रंगसंगतीचा वापर करून प्रभावी दृश्य संवाद साधणारा तज्ज्ञ, (३) स्पेस डिझायनर रिटेल स्टोअर्स आणि प्रत्यक्ष जागांचे नाविन्यपूर्ण, आकर्षक आणि देखण्या स्वरुपात रूपांतर करणारा तज्ज्ञ, (६) फॅशन क्रिएटिव्ह आणि स्टायलिस्ट फॅशन स्टाइलिंग, फोटोग्राफी आणि इमेज- मेकिंगद्वारे ब्रँडची दृश्यभाषा तयार करणारा तज्ज्ञ, () फॅशन जर्न्यालिस्ट आणि लेखक फॅशन क्षेत्रासाठी मजकूर लेखन आणि पत्रकारिता करणारा तज्ज्ञ, () मीडिया डिझायनर  जाहिरात क्षेत्र, इंटरॲक्टिव्ह डिझाइन आणि नवीन माध्यमांसाठी डिझाइन तयार करणारा  तज्ज्ञ, () न्यू मीडिया तज्ज्ञसमाज माध्यमे, दूरचित्रवाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आशय  तयार करणारा तज्ज्ञ, (१०) इव्हेंट आणि प्रदर्शन डिझायनर फॅशन शो आणि प्रदर्शनांसाठी सेट डिझाइन करणारा तज्ज्ञ, (११) ब्रँडची जनसंपर्क धोरणे हाताळणारा समन्वयक, (१२) ॲनिमेशन आणि गेम डिझाइन फॅशन क्षेत्रातील वाढत्या ॲनिमेशन आणि गेमिंग गरजा पूर्ण करणारा तज्ज्ञ.

कुठे शिकाल?

पुढील एनआयएफटीमध्ये ‘फॅशन कम्युनिकेशन’ हा विषय शिकवला जातो- बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर ,चेन्नई, दिल्ली ,गांधीनगर, हैदराबाद , जोधपूर ,कांगडा, कन्नूर, कोलकाता, मुंबई, पाटणा, पंचकुला, रायबरेली,शिलाँग श्रीनगर

प्रवेश प्रक्रिया

    या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी ‘एनआयएफटी एन्ट्रन्स टेस्ट’ द्यावी लागते. यापरीक्षेचे तीन मुख्य टप्पे आहेत-           १) गॅट (जनरल ॲबिलिटी टेस्ट- सामान्य क्षमता चाचणी)- यात इंग्रजी, गणित, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल नॉलेजचे प्रश्न असतात. २) कॅट (क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट – सर्जशीलता क्षमता चाचणी)- यात विद्यार्थ्यांच्या रेखाटन  आणि कल्पनाशक्तीची चाचणी घेतली जाते, ३) सिच्युएशन टेस्ट / मुलाखतलेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक किंवा मुलाखत घेतली जाते.

करिअर संधी

    १) कॉर्पोरेट/ब्रँड्स: टाटा क्लिक, रिलायन्स ब्रँड, आदित्य बिर्ला फॅशन, लाइफस्टाइल, शॉपर्स स्टॉप, २) माध्यमे: व्होग, हार्पर्स बजार, फेमिना, टाइम्स ऑफ इंडिया, ३) जाहिरात कंपन्या: ओगिलव्ही ॲण्ड मॅथर, मॅककॅन एरिक्सन, ४) ई-कॉमर्स: मायंत्रा, नायका, ॲमॅझान फॅशन

         संपर्क(मुख्य कॅम्पस): (१) एनआयएफटी कॅम्पस, हौझ खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली – ११००१६, दूरध्वनी- ०११- २६८६७७०४, ईमेल- director.delhi@nift.ac.in, (२) मुंबई कॅम्पस प्लॉट नं. १५, सेक्टर ४, खारघर, नवी मुंबई – ४१०२१० दूरध्वनी- ०२२-२७७४७०००, ईमेल: nift.mumbai@nift.ac.in, संकेतस्थळ – www.nift.ac.in

सुरेश वांदिले