(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कृतीचा ओलावा

अधूनमधून तेजोमयी आणि तिच्या मैत्रिणी घराजवळील बागेत संध्याकाळी फिरायला जात. एके दिवशी त्यांना बागेत दोन-तीन मांजरी बागडताना दिसल्या. त्या छान गुबगुबीत, काळ्या-पांढऱ्या रंगांच्या मांजरी बघून त्यांना फार आनंद झाला. त्या कुठून आल्या, कोण जाणे! पण बागेत अगदी बिनधास्त वावरत होत्या. बागेत येणाऱ्या-जाणाऱ्यांना जराही न भिता त्या इकडे-तिकडे पळत होत्या. कधी त्या गवतावरून एकमेकींकडे धावत, तर कधी बाकड्यावर, तर लगेच बाकड्याच्या खाली जाऊन बसत, तर कधी रस्त्यातच डोळे मिटून पसरत. जणू काही त्यांच्याच मालकीचा तो रस्ता!

बागेत आलेल्या लहान मुलांना त्यांची फार गंमत वाटायची. ते त्यांच्या पाठीमागे धावत. त्याही या खेळात सामील होत. कंटाळा आला की, जिथे जागा मिळेल तिथे डोळे मिटून झोपी जात. मुलांना याची फार गंमत वाटे.

या मांजरींसाठी एक आजी दररोज काहीतरी खायला घेऊन येत, हे तेजोमयीच्या लक्षात आलं. त्यांना बघून आणखी कुणी-कुणी त्यांना खायला देऊ लागले. खाणं झाल्यावर पाणी तर हवंच ना! मग, कुणीतरी त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली. एक मोठं दगडी भांडं तिथे एका ठिकाणी आणून ठेवलं. त्यात मग कुणीतरी पाणी टाकलं. खाणं झालं की मांजरी जिभल्या चाटत पाणी पीत.

मांजरींच्या पाण्याच्या या भांड्याकडे तेजोमयीचं एके दिवशी लक्ष गेलं. ते पाणी तीन-चार दिवसांपासून कुणी बदललं दिसत नव्हतं. त्यात कचराही पडला होता. तिने जवळ जाऊन बघितलं, तर त्यात छोटे-छोटे जंतूही दिसत होते.

“बापरे, हे असं पाणी मांजरी पितात?” तेजोमयी मानसीला म्हणाली.

“पिऊ दे, त्यांना काही होत नाही,” मानसी म्हणाली.

“अगं, असं कसं म्हणतेस? त्यांनाही आपल्यासारखाच जीव आहे ना!”

“आपण पिऊ शकतो का असं पाणी?” कल्याणीने विचारलं.

“असं पाणी आपल्या पोटात गेलं तर आपण आजारीच पडू,” वैष्णवीने लक्षात आणून दिलं.

“हे पाणी पिऊन मांजरीसुद्धा आजारी पडू शकतात,” तेजोमयी म्हणाली.

“अगं, मग आपण काय करणार?” मानसीने विचारलं.

“काहीतरी करायलाच हवं.”

“म्हणजे?”

“हे बघ, इथे येणारे बरेच जण या मांजरींसाठी खायला काहीतरी आणतात. मी त्यांच्यासाठी चांगलं पाणी दररोज घेऊन येते.”

“कशात आणणार?”

“अगं, माझ्या घरी बाटलीची कमतरता आहे का? दोन बाटल्या आणल्या तरी पुरे.”

“आई-बाबा काय म्हणतील?”

“चांगल्या कामासाठी कोण काय म्हणणार? काही म्हणालेच तर या मांजरींना त्यांना आडवं जायला सांगेन,” तेजोमयी हसत-हसत म्हणाली.

०००

बागेतील मांजरींसाठी घरून पाणी नेण्याची कल्पना तिने आईला सांगितली.

“अगं, अभ्यासबिभ्यास सोडून हा उपदव्याप करायला कुणी सांगितलं तुला?” आई रागावली.

आईचं बोलणं ऐकून तेजोमयीला चांगलाच धक्का बसला. चांगल्या कामाला आई नाही म्हणणार नाही, या तिच्या विश्वासाला तडा गेला. तिने आश्चर्याने आईकडे बघितलं.

“मुक्या प्राण्यांची काळजी घेणं हे वाईट आहे का?” तेजोमयीनं भीत-भीत विचारलं.

“त्यांची काळजी करणारे आहेतच की दुसरे. तुझ्यासाठी अभ्यास महत्त्वाचा.”

“अगं आई, माझ्याच कोणत्या तरी अभ्यासाच्या पुस्तकात ‘मुक्या प्राण्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य असतं’, असं सांगितलंय ना! आता ती संधी मिळतेय तर तुझं आपलं ‘अभ्यास करण्याचं’ तुणतुणं!” तेजोमयी म्हणाली. हे ऐकून आई चपापली.

“मला तसं म्हणायचं नव्हतं तेजो. पण वेळ जातो ना आपला.”

“अगं आई, मुक्या प्राण्यांची काळजी घ्यायची म्हटल्यावर थोडा वेळ तर द्यावाच लागणार ना! शिवाय त्या मांजरींनी मला नाही सांगितलंय, दररोज चांगलं पाणी द्यायला.” तेजोमयी ठामपणे म्हणाली. आई निरुत्तर झाली.

 बहुतेक तिच्या लक्षात तिची चूक आली असावी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तेजोमयीसोबत आईही दोन बाटल्या घेऊन बागेत आली. आईने मांजरीच्या पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वच्छ धुतले. तेजोमयीने त्यात दोन बाटल्या पाणी टाकले. आपल्यासाठी पाणी आणणाऱ्या तेजोमयीसोबत मांजरींची चांगली मैत्री झाली.

०००

मांजरींची अशी काळजी घेणाऱ्या तेजोमयीचं कौतुक करायला, बागेतील मांजरींना खाऊ देणाऱ्या आजी तेजोमयीच्या घरी एके दिवशी आल्या.

“मोठी गुणाची हो तुमची पोर! चांगली शिकवण दिलीय तुम्ही तिला. मुक्या प्राण्यांना चांगलं खाणं तर गरजेचं, पण चांगलं पाणीही आवश्यक असतं, हे मलासुद्धा लक्षात आलं नाही,” आजींनी प्रतिक्रिया दिली.

आईचे डोळे पाणावले. कोरड्या शिकवणुकीपेक्षा कृतीचा ओलावा मोठा असल्याचा धडा आपल्याला लेकीने दिला, हे तिच्या लक्षात आलं.

सुरेश वांदिले