(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डिजिटल गेमिंगचे अद्भूत विश्व

भारतातील गेमिंग क्षेत्र आता केवळ खेळण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही.  या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी निर्माण झाल्या आहेत. तरुण डेव्हलपर्स या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत करताना दिसतात. गेमिंगच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावण्यात यांचा मोठा हातभार लागतोय. हे डेव्हलपर्स स्वतःच्या कल्पकतेने, ‘युनिटी’  आणि ‘अनरिअल इंजिन’  सारख्या प्रगत सॉफ्टवेअर्सचा सुलभतेने वापर करून उच्च दर्जाचे ग्रॅफिक्स आणि गेम्स विकसित करतात.  या नव्या डेव्हलपर्सचे वैशिष्ट म्हणजे ते भारतीय पौराणिक कथा, स्थानिक लोककथा आणि भारतीय पात्रांचा आपल्या गेम्समध्ये सर्जनशीलरित्या समावेश करतात. अशा गेम्सना जागतिक बाजारपेठेत मोठी पसंती मिळताना दिसते.

          या डेव्हलपर्सनी पारंपरिक मनोरंजनाच्या चौकटी मोडून गेमिंगला एक प्रगल्भ व्यावसायिक स्वरुप प्राप्त करुन दिलेय. अशाच काही प्रतिभावंतांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या एक्सबॉक्स गेम कॅम्प एशिया या उपक्रमात आपल्या नव्या गेम्सनी उपस्थितांना आश्चर्यचकित करुन सोडले. हा उपक्रम मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्सने आयोजित केला होता. या उपक्रमात भारत, सिंगापूर, मलेशिया यांसारख्या देशांतील तरुणांनी भाग घेतला.

    भारतात गेमिंग स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढताना दिसते. बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद ही शहरे गेम डेव्हलपमेंटची प्रमुख केंद्रे म्हणून नावारुपाला आली आहेत. गेल्या काही वर्षांत ‘गेम खेळणाऱ्या  देशापासून ‘गेम निर्मितीतील सर्जनशील देशापर्यंत’ भारताने विस्मयकारक प्रगती केली आहे. डिजिटल क्रांती आणि स्वस्त इंटरनेटमुळे हे क्षेत्र आता एक प्रतिष्ठित आणि उच्च वेतनश्रेणीचे करिअर क्षेत्र बनले आहे.

भारतात सध्या ९०० पेक्षा जास्त गेमिंग कंपन्या कार्यरत आहेत. ‘ई-स्पोर्ट्स’  आणि ‘फॅन्टसी गेम्स’च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या बाजारपेठेचा आकार अब्जावधी डॉलर्सवर पोहोचलाय. भारत आता जगातील सर्वात मोठी गेमिंग बाजारपेठ मानली जाते. जागतिक कंपन्या त्यांचे ‘डेव्हलपमेंट सेंटर्स’ भारतात उभारत असल्याने २०२६ मध्ये या क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय.         

चित्रकला, कथाकथन (स्टोरीटेलिंग), कोडिंग  किंवा गणिताची आवड असणारे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम करिअर करु शकतात. ‘नित्यूनतन आभासी (व्हर्च्युअल वर्ल्ड)  जगाची निर्मिती करण्यात रस आणि तांत्रिक कौशल्ये’ या दोन गुणांच्या बळावर या क्षेत्रात यश मिळणे सुलभ जाते.

या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मुलभूत गणिताच्या संकल्पना सुस्पष्ट असल्यास कोडिंग सोपे जाऊ शकते. मात्र,  गेमिंगचे डिझाइन (अभिकल्प) आणि आर्ट (कला) या क्षेत्रातील करिअर कोणत्याही ज्ञानशाखेचे विद्यार्थी करु शकतात.

या क्षेत्रात येण्यासाठी पुढील काही तंत्रकौशल्य आत्मसात केल्यास संधी लवकर मिळू शकते- (१) सी प्लस प्लस, जावा यासारख्या प्रोग्रॅमिंग भाषा, (२) युनिटी थ्रीडी किंवा अनरिअल इंजिनचे ज्ञान, (३) पात्रांची रचना,  संहिता लिहिणे आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, (४) तार्किक कारणमीमांसा करण्याचे कौशल्य, सांघिक कार्याची सवय .

अभ्यासक्रम आणि शिक्षण संस्था

(१) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी)  मधील  बॅचलर ऑफ डिझाइन इन अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाईन हा एक महत्वाचा अभ्यासक्रम. चित्रकलेतून कथा सांगण्याचे  आणि धावत्या चित्रांच्या (मुव्हिंग इमेजेस) माध्यमातून विद्यार्थ्यांना गोष्ट सांगण्याचे आणि विद्यार्थ्यांना भारतीय उपखंडातील कथा सांगण्याची परंपरा, विविध कलाप्रकार आणि संगीत-ध्वनी यांचा सुयोग्य वापराचे तंत्र शिकवले जाते. पारंपारिक चित्रकला  आणि अ‍ॅनिमेशनच्या मूलभूत कौशल्यांची सांगड घातली जाते. अत्याधुनिक डिजिटल अ‍ॅनिमेशनच्या तंत्रकौशल्याचे ज्ञान प्रदान केले जाते. यामुळे विद्यार्थी मूळ अ‍ॅनिमेशन कलाकृती आणि ग्रॅफिक कादंबऱ्यांची निर्मिती करु शकतात. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मिती संस्था, दूरचित्रवाहिन्या, स्वतंत्र अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग स्टुडिओ, युझर इंटरफेस/ युझर एक्सपिरिअंस (वापरकर्ता अनुभव डिझाईन) आणि ई-लर्निंग कंपन्या, यामध्ये रोजगाराच्या संधी मिळतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्टुडिओ सुरू केले आहेत.

या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. कला, वाणिज्य, मानव्यशास्त्र, विज्ञान अशासारख्या कोणत्याही शाखेतील १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. यासाठी गुणांची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. तंत्रशिक्षण मंडळाचा १० वीनंतरचा तीन वर्षे कालावधीचा, शासन मान्यताप्राप्त संस्थेतून पदविका अभ्यासक्रम आणि एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

(२) एनआयडी मधील मास्टर ऑफ डिझाइन इन ‘टॉय अँड गेम डिझाईन’ हा अभ्यासक्रम खेळ‘ (प्ले) या संकल्पनेवर भर देतो. शिक्षण, मनोरंजन आणि मानवी विकास या क्षेत्रांतील गरजा आणि संधी लक्षात घेऊन हे खेळ तयार केले जातात. हा विषय डिझाईनच्या विविध ज्ञानशाखांना एकत्र आणतो. त्याव्दारे खेळाच्या  सर्जनशील वापरातून वेगवेगळ्या समस्यांवरील उपाय शोधणे शक्य होते. सध्या ‘खेळ’ या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे खेळणी, खेळ आणि गेमिफिकेशन (खेळाचे तंत्र) यांचा वापर आता शिक्षण, तंत्रज्ञान, कॉर्पोरेट क्षेत्र, आरोग्य सेवा आणि हस्तकला अशा विविध क्षेत्रांत वाढला आहे.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांवर काम करण्यास प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबिंचा समावेश होतो- (१) डिझिटल आणि बोर्ड गेम्स संगणकावरील खेळ, (२) खेळणी आणि खेळण्याच्या जागा नाविन्यपूर्ण खेळणी आणि मुलांसाठी खेळण्याच्या जागांची निर्मिती, (३) शैक्षणिक साहित्यशिक्षणासाठी उपयुक्त खेळकर साधने, (४) परस्परसंवादी अनुभव तंत्रज्ञानाचा वापर करून अनुभव देणारे प्रकल्प, (४) क्रीडा साहित्य खेळांसाठी लागणारी उपकरणे. हा अभ्यासक्रम गांधीनगर कॅम्पसमध्ये करता येतो

() एनआयडी मधील मास्टर ऑफ डिझाइन इन  डिजिटल गेम डिझाईन हा विषय संगणकशास्त्र, ललित कला  आणि सामाजिक व मानवी वर्तनशास्त्राचा मेळ घालतो. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, सांघिक काम करण्याची वृत्ती आणि सर्जनशील विचार करण्याच्या क्षमतेवर विशेष भर दिला जातो.

हा अभ्यासक्रम पुढील कौशल्ये विकसित करतो- (१) डिजिटल आर्ट्स आणि मीडिया डिजिटल माध्यमातून कलाकृती तयार करणे,  () खेळांचा इतिहास आणि सिद्धांत खेळांची रचना आणि त्यामागील विचार, () टूडी आणि थ्री डी ग्रॅफिक्स द्विमितीय आणि त्रिमितीय चित्रे व मॉडेल्स तयार करणे, () स्टोरीटेलिंग (कथा सांगण्याची कला) खेळातील पात्रांची मांडणी आणि कथेची गुंफण.

या क्षेत्रातील तज्ज्ञ गेम डिझाइनर्स आणि कलाकारांकडून मार्गदर्शन मिळते. ऑनलाइन आणि इंटरनेट-आधारित मल्टिप्लेयर (बहुखेळाडू) गेम्स, शैक्षणिक आणि धोरणात्मक  गेम्स, डिजिटल रेंडरिंग, लेखन, संगीत आणि ध्वनी निर्मिती, तसेच युजर-इंटरफेस  डिझाईन या विषयांचे शिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम गेम निर्मिती सोबतच गेम मॉनेटायझेशन (खेळातून उत्पन्न) वर लक्ष केंद्रित करतो. डिझाईन संशोधनाच्या वाटाही दाखवतो. गेम डिझाईन स्टुडिओचे कार्य, या उद्योगातील व्यवसाय प्रारुप आणि स्वतंत्रपणे काम करणाऱ्या  डेव्हलपर्सचे या क्षेत्रातील योगदान या विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्रदान केले जाते.

हा अभ्यासक्रम गांधीनगर कॅम्पसमध्ये करता येतो. एनआयडीतील दोन्ही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी करु शकतात. यासाठी कोणत्याही गुणांची अट ठेवण्यात आलेली नाही.

(५) एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन-  पुणे,  या संस्थेत गेम डिझाइन या विषयातील बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात गेम आर्ट, डिझाइन आणि प्रॉडक्शन (निर्मिती) आणि प्रोग्रामिंग हे विषय शिकवले जातात. कॉन्सेप्ट डिझाइन, एन्व्हायरमेंटल डिझाइन, टू डी आर्ट, थ्री डी आर्ट, स्ट्रॅटेजी (व्यूहरचना), गेम सायकॉलॉजी (मानसशास्त्र), लेव्हल डिझाइन आणि प्रोग्रामिंग यांचे ज्ञान प्रदान केले जाते.

संपर्क संकेतस्थळ: www.mitid.edu.in

(६) आयसीएटी डिझाइन अँड मीडिया कॉलेज, चेन्नई/ बेंगळुरू/ हैदराबाद – ही संस्था या क्षेत्रात १९९५ सालापासून शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. अभ्यासक्रम- (१) पदवीस्तरीय- गेम ॲण्ड आर्ट डिझाइन, गेम डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट, गेम प्रोग्रॅमिंग. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे, (२) पदव्युत्तर पदवी- गेम टेक्नॉलॉजी. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. (३) एक वर्ष कालावधीचे प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम- गेम टेक्नॉलॉजी, ग्रेम प्रोग्रॅमिंग आणि गेम डिझाइन या विषयात करता येतात.संकेतस्थळ www.icat.ac.in

सुरेश वांदिले